Tuesday, April 22, 2025
Homeसंपादकीयरविवार मंथनमराठी कवितेतला हिरव्या ऐश्वर्याचा राजा...

मराठी कवितेतला हिरव्या ऐश्वर्याचा राजा…

मायभाषा: डॉ. वीणा सानेकर

झाडे, पाखरे, निसर्ग यांच्याशी चैतन्यशील संवाद साधणारा कवी म्हणजे ना. धों. महानोर. त्यांची हिरवी काव्यबोली मन शांतवते. ही बोली कितीतरी नाजूक गोष्टी टिपते.पंखांवर पिवळे ऊन घेऊन रानात भटकणारा पक्षी, केळीच्या बनात उतरणारे चांदणे, आपल्या कानात काहीतरी सांगत राहणारी पाने, पिकांतले निळे कवडसे, उतराई आभाळ, गडदगर्द गहिरा मदमस्त पाऊस, पक्षी उडून गेल्यानंतर हलत राहणारी लयबद्ध एकटी फांदी, लपक-झपक झाडांतील किलबिल असे विविध संदर्भ त्यांच्या कवितेतून विखुरले आहेत.

जैत रे जैत चित्रपटातील महानोर यांची गाणी आजही रोमांचित करतात. जांभूळ पिकल्या झाडाखीली, नभ उतरू आलं, मी रात टाकली, आम्ही ठाकरं ठाकरं, कोण्या राजानं शेवडी खंदली, हा पाय शेणाचा-हा पाय मेणाचा ही सर्व अस्सल लोकगीतांच्या बाजातली गीते ऐकताना नकळत पाय ताल धरतात. जैत रे जैत मधली स्मिता पाटील नि तिचा सर्वांगसुंदर अभिनय महानोरांच्या कवितेला जिवंत करतो. रानातल्या कविता, वही, पावसाळी कविता हे महानोरांचे कवितासंग्रह स्वत:च्या शब्दसामर्थ्याने मराठी कवितेत उठून दिसतात.

‘पळसखेडची गाणी’ हा त्यांचा संपादित लोकगीतसंग्रह. गावची माती उपजतच लोकपरंपरेतील शब्दांची पुण्याई लेवून असते. ओवी, झोपाळ्याची गाणी, ढोलकी खंजेरीचे गाणे, भारुड अशा रचनाबंधाची पन्नास गीते या संग्रहात आहेत. अजिंठ्याच्या पायथ्याजवळचे हे खेडे या गीतांमधून साकारते.विशेषत: स्त्रीमनाचे उद्गार या गीतांमधून व्यक्त होतात.बाईचा हा जन्म नका घालू सख्या हरी,रात्रना दिवस परक्याची ताबेदारी… आमच्याकडे स्त्रियांना पुरुषप्रधान व्यवस्थेतील त्यांच्या स्थानाची व अन्यायाची लख्ख जाणीव होती, यात शंका नाही.खानदेशातला ‘वही’ हा काव्यप्रकार. महानोरांच्या संपादित संग्रहात आध्यात्मिक आशयाची वहीगीते आहेत. उदाहरणार्थ -आत्मा कुडीचे झाले भांडण, कुडी म्हणते निघ माझ्यातून…… लोकगीतांची शैली, विविध बोलींचा ठेवा हा मायभाषेचा पारंपरिक खजिना आहे. तो कशा प्रकारे जपावा याचा उत्तम आदर्श महानोरांनी घालून दिला.

भाषेचे कोणतेही अवडंबर या लोकगीतांनी दाखवले नाही. मानवी जीवनातील सुखदु:खांचा गोफ या गीतांतून सहजपणे विणला गेला आहे. या गीतांना आपसूकच एक लय आहे. गावखेडे म्हणजे केवळ हिरवे वैभव नव्हे, तर खेड्यांतील माणसांना गरिबीशी झुंजावे लागते. दारिद्र्याचा, तर कधी पावसापाण्याचा दुष्काळ या माणसांची आयुष्य झाकोळून टाकतो. त्यांच्या व्यथा-वेदनांचे वास्तव महानोरांच्या कवितेतून दिसते नि पुन्हा पुन्हा त्यांची कविता माणसांसाठी हिरव्या वैभवाचे देणे मागते.
मराठी मातीत चैतन्याची बाग रुजवणाऱ्या ना. धों. महानोरांना विनम्र आदरांजली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -