
- कोकणी बाणा : सतीश पाटणकर
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले शहरात पुरातन सातेरी मंदिर आहे. सुमारे ५०० वर्षांपूर्वीचे हे मंदिर प्रशस्त आवारात आहे. ५० फूट रुंद व १५० फूट लांबीचे संपूर्ण जांभ्या दगडाने ते बनविण्यात आले आहे. या पांडवकालीन मंदिराची बांधणी वास्तुकलेचा एक सुंदर नमुना आहे. सातेरीचे मंदिर या शहराचे वैभव आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला हे तालुक्याचे मुख्य ठिकाण व अरबी समुद्रकिनाऱ्यावरील एक बंदर. हे सावंतवाडीच्या पश्चिमेस ३३ कि.मी. वर आहे. इ. स. १६३८ मध्ये डचांनी फिंगेर्ला नावाने याची स्थापना केली. डचांची मुख्य व्यापारी वसाहत येथे होती. १६६० च्या सुमारास याचा मिंगेर्ला (मिंग्रेला) असाही उल्लेख आढळतो. याच वर्षी शिवाजी महाराजांनी येथे आपले सैन्य ठेवले होते. त्या काळात येथून बंगाल, सूरत याशिवाय बटेव्हिया, जपान, श्रीलंका, हॉर्मझ (इराण), बसरा (इराक) व तांबड्या समुद्रालगतचे प्रदेश यांच्याशी व्यापार चालत असे. अतिशय उत्तम प्रतीच्या वेलदोड्याच्या उत्पादनासाठी वेंगुर्ल्याचा परिसर त्या काळी प्रसिद्ध होता. १६७५ मध्ये मोगलांनी या शहराची जाळपोळ केली. १६९६ मध्ये ते सावंतवाडीच्या सावंतांकडे आले. पूर्वी वेंगुर्ल्यास चाचे लोकांचे वास्तव्य असे. १८१२ साली सावंतवाडीच्या संस्थानिकांनी वेंगुर्ला हे इंग्रजांस दिल्यामुळे चाचे लोकांचा बंदोबस्त झाला. ब्रिटिशांच्या कारकिर्दीत हे एक भरभराटीस आलेले नगर होते.
वेंगुर्ल्याच्या परिसरात फणस, काजू, नारळ व आंब्याच्या बागा आहेत. शहरात आंबा व काजू संशोधन केंद्र असून काजू प्रक्रियेचे कारखाने आहेत. नारळाच्या झाडापासून वेगवेगळ्या वस्तू तयार करण्याचा व्यवसायही येथे चालतो. येथील समुद्रात मासेमारी चालते. वेंगुर्ले हे नाव या भागास पडण्यास कारण, अशी एक दंतकथा या भागात प्रचलित आहे. त्या कथेचा संबंध थेट श्री देवी सातेरीशी आहे. श्री देवी सातेरी ही मूळ अणसूर या गावची. वेंगुर्लेपासून हे गाव ६ मैल अंतरावर आहे. त्या काळी सुभ्याचे प्रमुख गाव म्हणून प्रसिद्ध होते. वेंगुर्ले हे शहर त्याकाळी अस्तित्वात नव्हते. अणसूर या गावात श्री देवी सातेरीचे मंदिर आहे. आज त्या मंदिरास मूळ भूमिकेचे मंदिर म्हटले जाते. त्या मंदिराचे परब आणि गावडे हे दोन प्रमुख मानकरी आहेत. त्या काळातील परब कुळातील एक पुरुष (सध्याच्या वेंगुर्लेच्या परब कुळाचा मूळ पुरुष) नित्यनेमाने वेंगुर्लेहून ६ मैल चालत अणसूर येथे जाऊन श्री देवीची पूजाअर्चा करत असे. पुढे वृद्धापकाळाने चालत जाणे अशक्य होऊ लागल्याने त्याने देवीची मनोभावे करूणा भाकली. श्री देवीच्या दर्शनाची व्याकुळता आणि उत्कट निस्सीम भक्तीमुळे त्या पुण्यपुरुषास एके दिवशी दृष्टांत झाला. देवीने प्रसन्न होऊन सांगितले की, मी तुझ्याजवळ येईन. तुझ्या गाईने ज्या जागी पान्हा सोडलेला असेल त्या जागी मी आहे. त्या दृष्टांताप्रमाणे शोध घेतला असता त्याला गाईने पान्हा सोडलेल्या पाषाणावर मातीचे वारुळ झरझर वाढत आहे, असे दृश्य दिसले. ते पाहून त्या पुण्यपुरुषाने अति उत्कट भक्तिभावाने त्या मातीच्या वारुळास मिठी मारली आणि सांगितले, ‘आई, आता तू येथेच थांब” आणि त्याचबरोबर त्या वारुळाची वाढ थांबली. मिठी म्हणजे वेंग हा शब्द त्या काळी प्रचलित होता. वारुळ वेंग मारून उरले यावरूनच वेंग मारून उरले ते वेंगुर्ले, असे या नगरीचे नामकरण झाले. श्री देवी सातेरी वारुळाच्या रूपाने प्रकट झाल्यावर कालांतराने तिला एक आकार देऊन मुखवटा तयार केला गेला. श्री देवी सातेरी मंदिरात असलेल्या मूर्तीखाली ते स्वयंभू पाषाण आहे. तीन-चार वर्षांनी मूर्ती बदलून तिची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येते, त्याला मळलेपण कार्यक्रम असे म्हणतात. देवीच्या जागरूकतेचा पडताळा आजही लोकांना येतो.
श्री देवी सातेरी देवस्थान, वेंगुर्ला हे कोकणातील जागृत देवस्थान असून नारळ, तांदळाची ओटी भरणारा गरीब व सोन्या-चांदीच्या वस्तू अर्पण करणारा धनवान दोघेही एकाच भक्तिभावाने देवीसमोर नतमस्तक होतात. ग्रामदेवता असलेल्या श्री देवी सातेरीसमोर प्रत्येक वेंगुर्लेवासीय भक्तिभावनेने नतमस्तक होतो. सातेरीचे मंदिर या शहराचे वैभव आहे. सुमारे ५०० वर्षांपूर्वीचे हे मंदिर प्रशस्त आवारात आहे. ५० फूट रुंद व १५० फूट लांबीचे संपूर्ण जांभ्या दगडाने ते बनविण्यात आले आहे. प्राचीन वास्तुस्थापत्य शास्त्राचा अजोड नमुना म्हणून प्रसिद्ध असलेले ४ ते ५ फूट रुंदीच्या भिंतीवर पूर्णपणे दगडी कमानींवर व जुन्या घाटणीच्या, पण वैशिष्ट्यपूर्ण बांधकामावर उभे आहे. दरवाजा सोडल्यास लाकडाचा वापर न करता बांधलेले पूर्ण दगडी मंदिर म्हणून कुतूहलाने मंदिराकडे पाहिले जाते. बांधकामात उठून दिसणारा माडीचा भाग व त्यामागे मंदिराच्या सौंदर्यात वाढ करणारा गोल घुमटाकार कळस आहे. मंदिराच्या सौंदर्याला साजेशी सुबक दगडी दीपमाळा व तुळशी वृंदावन खास आकर्षण आहे. श्री देवी सातेरी मंदिरात असलेल्या मूर्तीखाली ते स्वयंभू पाषाण आहे. दर तीन-चार वर्षांनी मूर्ती बदलून पुन्हा प्राणप्रतिष्ठापना करण्यात येते, त्याला मळलेपन कार्य असे म्हणतात. देवीच्या जागरूकतेचा पडताळा आजही असंख्य लोकांना येतो. नवरात्रीत नारळ, तांदळाची ओटी भरणारा गरीब व सोन्या-चांदीच्या वस्तू अर्पण करणारा धनवान दोघेही एकाच भक्तिभावाने देवीसमोर नतमस्तक होताना दिसतात.
(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत)