मेघ झुकती झुकती
गच्च भरून वाहती
सरी श्रावणाच्या ओल्या
धरणीत रुजवती
गर्द हिरव्या पताका
स्वच्छ न्हाऊन निघाल्या
कळ्या सोवळ्या होऊन
हळू मनात लाजल्या
थेंब टपोरा मोत्याचा
खेळ पागोळ्या खेळती
वारा दिशाभूल करे
तृणपाती शहारती
फुले तेरडा रानात
आघाड्याला साथ देतो
घेऊ श्रावण टिपून
दान व्रताचे मागतो
ऊन-पावसाचा खेळ
कधी लंगडी-फुगडी
एका क्षणात पाऊस
कधी डोंगरात दडी
– सुप्रिया हळबे
ये रे गड्या, ये रे गड्या
आनंदघना कृपाळा,
रंग नवा, गंध नवा
दे, संजीवन विश्वाला!…१
दुडुदुडू, ये सर सर सर
धावुनी तू अंगणी,
शेत-शिवार, रानोमाळ
तृषार्त अधिर अवनी!…२
मृद्गंधित पवनामृत
अंतरात झिरपू दे,
नाद मधुर खळ खळ खळ
भरून दिठी वाहू दे!…३
स्वप्न नवे, ध्यास नवा
हिरवाईतुनी फुलू दे,
कण-कण, तो अणुरेणू
कृतार्थ जन्म होऊ दे!… ४
अशी धरा असे गगन
एकरूप होऊ दे,
दयाघना विश्वसदन
आनंदात न्हाऊ दे!!…५
– प्रा. डाॅ. प्रकाश पांडुरंग गोसावी, खडकपाडा, कल्याण (प.)
निसर्गाकडून शिकावं प्रेम कसं करावं
ढगातून पडणाऱ्या जलधारांना भूमातेने सामावून घ्यावं…
जोडावी नि:स्वार्थी नाती फुला पानांसारखी
कोणत्याही प्रसंगात एकमेकांचे सखे सोबती…
वहावे निरंतर नदीप्रमाणे खळखळ
बरसावे हलकेच श्रावणधारांनी अवखळ…
पक्ष्यांच्या पिल्लांकडून शिकावे स्वावलंबन
ऋतूप्रमाणे अनुभवावे त्यांचे सीमोल्लंघन…
निसर्गाने देताना अविरत देत राहावे
आपण मात्र घेताना त्यास जपावे…
जपणूक करता सर्वांनी मिळून त्याची
मिळेल शिदोरी आयुष्यभराची…
निसर्गाविना कोणी ना इथे सगे सोयरे
आचरणात आणावे मंत्र उच्चार
‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’…
– वैशाली गायकवाड, ठाणे.
प्रेम आहे तरी कुठे?
आईचं खरं प्रेम मुलावर
मुलाचे खरे प्रेम मालमत्तेवर
प्रेम शब्दाने नाहीतर नजरेने समजणारे
प्रेम सावलीवर नाही तर उन्हात साथ देणारे
प्रेम म्हणजे आयुष्यभर कोणासाठी तरी थांबणे
प्रेम म्हणजे कोणीतरी असल्याचा आनंद
प्रेम म्हणजे आठवणीतले हसू
प्रेम म्हणजे रात्रभर भावनांनी जागून राहणे
प्रेम म्हणजे जीवापाड काळजी घेणारे
प्रेम म्हणजे व्यक्तीच्या विचारांवर करणारे
प्रेम म्हणजे कुणासाठी तरी रडणारे
प्रेम म्हणजे कुणाशिवाय तरी मरणारे
प्रेम म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत न विसरता येणारे
प्रेम सुखातच नाही तर दुखातही साथ देणारे
प्रेम करणं सोपं नसतं
ते निभावता येणे म्हणजे प्रेम…
– रसिका मेंगळे, मुलुंड.
श्रावण आला, श्रावण आला, आनंदी आनंद घेऊनी आला।
फुलांनी सजले डोंगर, क्षणार्धात अंत पाणगळीचा झाला।। १।।
मोहरीचे शेत फुलांनी बहरले, बोर, आंब्याला मोहर आले।
सुगंध वाऱ्याने सर्वत्र पसरवले, नाच गाण्याने मन मोहरले।। २।।
सूर्याची लाली आवडते सर्वांना, बघ श्रावणा! वृक्षाने हलवले फांद्यांना।
मोकळे नीळे आकाश खुशी देते पक्षांना, नाचायला उद्युक्त करते मोरांना।। ३।।
गोंधळ घालतात चिमण्या आणि खारी, जोशात येते त्यांची स्वारी।
आनंदाने फिरतात आकाशात घारी, वाटते त्यांना लय भारी।। ४।।
भवरे गुणगुणू लागले, कोकिळेने घेतली तान।
सगळ्या जीवांचे सुखी झाले प्राण, वाटते किती छान।। ५।।
वाहण्याचा नवा मार्ग मिळतो नद्यांना, हिरवळ मिळते बघायला चोहोबाजूंना।
दिसते थंडी छू मंतर होताना, श्रावण आपले रंगबेरंगी रंग दाखवताना।। ६।।
दिसू लागले सुंदर घर अंगण, मधुरता गोडव्याला मिळाले निमंत्रण।
जेव्हा येतो श्रावण, तेव्हा बहरते प्रांगण, गाऊ नाचू साजरा करू श्रावण महिन्याचा सण।। ७।।
– स्मिता शाम तोरसकर, ठाणे
आठवतंय मला आपलं
ते पहिल्या पावसात भिजणं,
गारव्यात शहारताना तुझं
नकळत मला बिलगणं…
धुंद होऊन पावसामध्ये
चिंब चिंब भिजायचीस,
मोहरताना सृजनाची
स्वप्ने मनी रुजवायचीस…
झिम्माड पावसामध्ये आपलं
ते एकाच छत्रीतून फिरणं,
गालावरून तुझ्या पावसाचं
ते थेंब थेंब ओघळणं…
मनसोक्त भिजून झाल्यावर
मग घरी आपण परतायचो,
तुझ्या हातचा मस्त चहा अन् भजीची
चव चाखायचो…
तू, मी अन् पाऊस
आपल जगंच किती न्यारं होतं,
याहून सुख वेगळं नसतं
हे तुझ्या संगतीत कळत होतं…
नव्या नव्हाळीच्या दिवसांत
सुख असं ओसंडून वाहायचं,
चिंब पाऊस बरसताना
मन सुखस्वप्नांत रमून जायचं…
आजही तो तसंच मला
चिंब चिंब भिजवतोय,
तुझ्या आठवांचा पाऊस
आता डोळ्यांमधून ओघळतोय…
– प्रणाली म्हात्रे, विक्रोळी, मुंबई.
खिडकीमधुनी पाऊस इतका सुंदर दिसतो नाही
सांगत असतो चातक बहुधा गुज हृदयीचे काही…
इंद्रधनूचे सात रंगही विस्मयकारी दिसती
सुबक मधुरशी ओली नक्षी शोभे धरणीवरती…
विद्युलता ही कडाडुनी मग आनंद व्यक्त करते
मेघाच्छादित आभाळाचे मन थरारुनी जाते…
बरसत आल्या जलधारा की मयूर पिसारा फुलवी
पारंबीसह खेळत मुलगी अपुले मनही झुलवी…
फांदीवरूनी मल्हार गात कोकीळ कवी रमतो
दाणे टिपण्या शेतामधले थवा चिमुकला जमतो…
दिडधा दिडधा करीत येते धरणीवरती पाणी
मेघगर्जना करीत पाऊस गाऊ लागतो गाणी…
निळ्याजांभळ्या आभाळाला किनार तांबूस असते
लावण्यखणी अवनी हिरवा शालू नेसून सजते…
पाऊस जेव्हा अधीर होऊन धरणीवर कोसळतो
मोहरुनी मग कोंब धरेचा फुलण्यासाठी रुजतो…
– नंदू सावंत, लालबाग
आम्हा गरिबांचीच घर दिसतात का रे तुला?
निसर्ग तर आम्हीच सांभाळला…
तुझी लेकरं होऊन…
पूजा केली तुझी, झोपडीचा राखणदार म्हणून
तर तूच कशी गाडलीस, लहान लेकरंबाळं…
तू पण न कमाल आहेस देवा…
श्रीमंतांची, अन्याय करणाऱ्यांची..
घर तुला दिसत नाहीत…
निसर्ग उद्ध्वस्त करणाऱ्यांचे इमले तू राखतोस
त्यांच्यावर कृपादृष्टी लक्ष्मीसह धरतोस…
लेकरबाळं त्यांची राजी खुशीत जगतात…
रात्रीच्या निसर्गात रेव्ह पार्टी करतात…
काय बरं चुकलं माह्या देवा बापा…
कशाला तू कावलास इतका मायबापा…
आकांताने फुटला ऊर, डोळे गेले सुकून…
बघता बघता आमचं, घर गेलं वाहून…
डोंगर बापानं पोरक केलं, कसं एका क्षणात..
गुरढोर निजली बघ, मातीच्या या ढिगात..
कुणाला करू तक्रार, कुणाला मागू जाब…
नाही उरला आता आम्हाला कोण मायबाप…
काडी काडी करून, संसार केला होता गोळा…
माणसाच्या पापान झाला, त्याचा चोळा मोळा…
रानाच्या या माणसाने आता जगावं तरी कसं..
पुन्हा नव्याने नव्या मातीत रुजावं तरी कसं..
वाडी पडली ओस, नाही जगण्याचा सोस…
उरला गाडा रेटावा म्हून, जगावं लागलं कसंबसं…
कळेल का ओ तुम्हा सत्तेतल्या मायबापा…
विकासाच्या नावाखाली, नका मारू निसर्गराजा..
एवढंच मागणं… काय आणि मागू…
जगा तुम्ही शहरात… राहू द्या आम्हाला आमच्या निसर्गात…
जगू द्या आम्हाला, आमच्या मातीच्या मठात…
– तृप्ती राणे, सिंधुदुर्ग
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…