Sunday, July 14, 2024
Homeसाप्ताहिककोलाजNitin Desai Death : विझले स्वप्नांचे पलिते...

Nitin Desai Death : विझले स्वप्नांचे पलिते…

  • विशेष : मृणाल कुलकर्णी

आजच्या काळामध्ये मोठी स्वप्ने बघणे, ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे आणि मिळालेले यश टिकवून राखणे ही अजिबात सोपी राहिलेली बाब नाही. नितीनदादांच्या निधनामुळे हे प्रामुख्याने अधोरेखित झाले आहे. अतिशय कष्ट करणे आणि मेहनत घेणे हे त्यांच्या कामाचे ठळक वैशिष्ट्य भावलेच. पण त्यांचा भव्य-दिव्य दृष्टिकोन प्रकर्षाने जाणवत राहिला. त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रकल्पांमध्ये मोलाची जबाबदारी पेलली.

नितीनदादांच्या अनपेक्षित निधनामुळे चित्रसृष्टीची अपार हानी झाली आहे. खरे पाहता एखाद्याच्या निधनाने हानी होणे, हे आता सरधोपट विधान असल्यासारखे वाटू लागले आहे. आताच्या काळामध्ये स्वप्न बघणे, ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे, त्याला यश येणे आणि बराच काळ ते टिकवून राखणे ही अजिबात सोपी राहिलेली बाब नाही. नितीनदादांच्या निधनामुळे हे प्रामुख्याने अधोरेखित झाले आहे. दादांची आणि माझी भेट ‘राजा छत्रपती’च्या वेळी झाली. त्या आधीही आम्ही एकमेकांना ओळखत होतो. मात्र ‘राजा छत्रपती’मध्ये निवड कमिटीने जिजाबाईंच्या भूमिकेसाठी माझी निवड केली आणि त्यांच्याबरोबर काम करण्याचा योग आला. खरे पाहता इतकी वर्षे आणि इतके मोठे काम करूनही त्यांनी कलाकारांची निवड करताना एकट्याच्या निर्णयाने नव्हे, तर अनेक जाणकारांनी एकत्र येऊन निवडणे, ही बाबही अनोखी म्हणायला हवी. कलाकारांना भूमिकेतील पैलू सांगायचे, प्रशिक्षण द्यायचे, सोयी-सुविधा उपलब्ध करून द्यायच्या… या सगळ्यांतून त्यांच्यातील वेगळेपण ठळकपणे जाणवले.

आजही आठवतेय, दादांनी शिवाजी महाराजांवर छापला गेलेला प्रत्येक शब्द आमच्यासाठी तयार ठेवला होता. शिवाजी राजांविषयी किती वाचावे, काय वाचावे याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले होते. कामाची ही पद्धत बघायला मिळणे आता कठीण झाले आहे. तुम्हीच अभ्यास करा आणि व्यक्तिरेखा साकारा, असा अनेकांचा विचार असतो. मात्र दादांची स्टाईलच वेगळी होती. त्यामुळेच ते टेलिव्हिजनवर ‘राजा छत्रपती’सारखा मराठीतील भव्य शो साकारू शकले. शिवाजी महाराजांवरील ही पहिलीच मालिका रसिकमान्य झाली. अतिशय कष्ट करणे व मेहनत घेणे हे नितीनदादांच्या कामातील वैशिष्ट्य मला भावलेच. पण त्यांचा भव्य-दिव्य दृष्टिकोन प्रकर्षाने जाणवत राहिला. त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रकल्पांमध्ये मोलाची जबाबदारी सांभाळली होती. मुख्य म्हणजे हा सतत कामात रमणारा माणूस होता. त्यांना कामाचीच नशा होती.

प्रत्येक फ्रेमबाबत अत्यंत जागरूक आणि आग्रही राहणे ही त्यांची ओळख होती. ‘पानिपत’मध्ये पेशवाई काळातील सेट उभा करताना त्यांनी घेतलेली मेहनत कौतुकास्पद होती. तेव्हाचा कालखंड तसाच्या तसा उभा करण्याची ताकद त्यांच्या कामामध्ये होती. मार्केटिंगसाठी केलेल्या ‘जाणता राजा’च्या छोट्याशा फिल्मचे सेट्सही नितीनजींचेच होते. ते भव्य शिवकालीन सेट्स आजही आठवतात. त्यांनी कलादिग्दर्शन केलेल्या हिंदी चित्रपटांना प्रचंड यश आणि प्रसिद्धी मिळाल्याचे आपण पाहिले आहे. सर्वोत्तम अभिनय, उत्तम संवाद, उत्तम गाणी, उत्तम दिग्दर्शन याबरोबरच उत्तम कलादिग्दर्शनामुळेही चित्रपट भव्य-दिव्य यश मिळवू शकतो, हे या चित्रपटांनी सिनेजगताला दाखवून दिले. म्हणूनच आपल्या क्षेत्रात नितीनदादा सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय कलाकार होते, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. दुर्दैवाने आता हे नाव काळाच्या उदरात गेले आहे. दादांना भावपूर्ण श्रद्धांजली…

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -