Wednesday, July 24, 2024
Homeसंपादकीयरविवार मंथनचला मनाच्या चौकटी मोडूया, मोकळं होऊया!

चला मनाच्या चौकटी मोडूया, मोकळं होऊया!

दृष्टिक्षेप: अनघा निकम-मगदूम

एकटेपणा… आपल्या माणसांच्या सान्निध्यात राहूनसुद्धा येणारा एकटेपणा… आजूबाजूला आनंदाचे गाणे वाजत असतानाही भैरवी ऐकायला लावणारा एकटेपणा… जग जगत असताना, सूर्य उगवत असताना, चंद्र झळकत असताना, वारा गाणं गात असताना, पक्षी उंचच उंच उडत असताना, समुद्र सतत किनाऱ्याकडे झेपावत असताना, सरी मुसळधर बरसत असतानाही येणारा हा एकटेपणा… किती खोल, किती खोल, किती गहन, किती मिट्ट, किती दाट… किती हा एकटेपणा…

एकटेपणा… आधुनिक काळात सर्व सोयी-सुखांनी परिपूर्ण असलेल्या माणसाला लागलेला मोठा शाप… एकटेपणाचा शाप… अनेक प्रश्न अनुत्तरित ठेवत आयुष्याला काळोख्या, शेवटच्या टोकापर्यंत नेणारा एकटेपणा…

प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी गळफास घेऊन आपलं आयुष्य, त्यांनीच आयुष्य पणाला लावून उभारलेल्या एनडी स्टुडिओत, त्यांच्याच स्वप्नील दुनियेत संपवलं. प्रचंड मोठं कर्ज आणि त्यामुळे झालेली आर्थिक कोंडी ही कारणे समोर येतं आहेत. व्यवहारात तेच मृत्यूचे कारण म्हणून पक्कं होणार आहे. पण जो माणूस आपल्या कलेमुळे जगविख्यात आहे, मराठी-हिंदी चित्रपटात ज्याचा दबदबा होता, (त्यांनीच एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे, ज्यांनी कमळापासून हात, धनुष्यबाण, घड्याळ, रेल्वे इंजिनपासून प्रत्येकासोबत दोस्ती केली) ते नितीन देसाई, एक दिग्गज व्यक्तिमत्त्व जेव्हा आत्महत्येसारखं भयंकर टोकाचं पाऊल उचलतात, तेव्हा हा माणूस शेकडो जणांच्या गरड्यात असूनसुद्धा किती एकटा होता हे प्रकर्षाने जाणवतं.

नितीन देसाई यांच्यासारख्या मोठ्या माणसाच्या आशा पद्धतीने अकाली जाण्याने पुन्हा एकदा माणसातील एकटेपणा अधोरेखित झाला आहे आणि हा आजार इतर भयंकर आजारापेक्षा अधिक भयंकर आहे.शरीराला कॅन्सरसारख्या गंभीर आजाराने ग्रासलं, अगदी ताप सर्दी झाली तरीही काळजीने, आपुलकीने विचारणारे अनेकजण भेटतात. पण “काय रे टेन्शनमध्ये आहेस का? काळजी करू नको होईल सगळं नीट” असं बोलणारे कितीजण असतात? पूर्वीच्या काळातील एकत्र कुटुंब पद्धतीत असे एकटेपणाचे आजार फार गंभीर नव्हते. पण कुटुंबव्यवस्था बदलली, राहणीमान बदलले, माणसाच्या कामाच्या व्यवसायाच्या पद्धती बदलल्या आणि तेव्हापासून कदाचित कॅन्सर आटोक्यात येऊ लागला. पण एकटेपणाचा आजार अधिक बळावला.

आज कुटुंबा-कुटुंबात तणाव आहेत, शिक्षण घेताना यश एका अपेक्षित उंचीपर्यंत गाठण्याचं टेन्शन आहे, प्रेम मिळवण्याचं, ते टिकवण्याचं टेन्शन आहे, नोकरीतलेताण-तणाव, वाढत्या स्पर्धेत निभाव लागण्याचं टेन्शन आहे, आजूबाजूच्या प्रचंड वेगाने बदलणाऱ्या वातावरणचं टेन्शन आहे… टेन्शन सगळीकडे आहे, पण ते समजून त्याचा सामना करताना सोबत मात्र कोणीच नाही. तणावातून येणाऱ्या एकटेपणात लढण्याचं बळ निघून जातं, आपल्याच लोकांना किती त्रास द्यायचा या विचारात ‘सगळ्यावर उपाय आहेत’ हे सांगणारं कोणीच राहत नाही आणि मग एकटेपणा आधी माणसाच्या विचार करण्याला संपवतो आणि नंतर माणसाला!

अत्यंत वेल फर्निश्ड फ्लॅटमध्ये दरवाजाआड एखादी आई, एखादे बाबा परदेशात गेलेल्या मुलासाठी अश्रू गाळत असतात, नवरा सोबत नाही म्हणून बायको घुसमटलेली असते, पटत नाही म्हणून जोडपी एका घरात दोन स्वतंत्र चौकटीत राहत असतात, आई-बाबांना वेळ नाही म्हणून मुलं सोशल मीडियाचा आधार घेऊ पाहतात. पण तरीही अनेकदा टोकाचं घडून जातं आणि घडून गेल्यावर त्यावर क्षणभर बोलून आपण पुन्हा आपल्या कोषात निघून जातो. पण हा एक एकांत घालावायचा असेल, तर सोबत असणं महत्त्वाचं आहे, एकमेकांचं ऐकून घेणं आवश्यक आहे, कधी कुणी मनाच्या कुठल्या कोपऱ्यात एकटे असतील, बोलायला, मोकळं व्हायला कचरत असतील त्यांना सोबत घेणं महत्त्वाचं आहे, तरच त्यांचा आणि आपलाही एकटेपणा दूर होऊन आभाळ मोकळं होणार आहे.

anagha8088@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -