- गुलदस्ता : मृणालिनी कुलकर्णी
जगातील प्रत्येकाच्या आयुष्यातील सुंदर नातं म्हणजे मैत्री… कोणतेच बंधन नाही. वयाची मर्यादा नाही. जन्मासोबत मिळणाऱ्या नातेसंबंधांपेक्षा मैत्रीचे नाते वेगळे असते. वंश, जात, धर्म, प्रांत, राष्ट्रीयता या साऱ्या सीमारेषेच्या पलीकडले नाते म्हणजे मैत्री. मित्र परिवार जेवढा मोठा तेवढे जग, अनुभव मोठा!
पी. व्ही. सिंधू, अंजली भागवत यांच्या त्यांच्याच खेळातील कट्टर प्रतिस्पर्धकांशी अतूट मैत्री आहे. हीच आंतरराष्ट्रीय मैत्री! मैत्रीतून जगाचा शोध घ्या. शिक्षणासाठी परदेशांत गेलेली मुलगी सांगते, ज्यावेळी मी दक्षिण आफ्रिकेत शिक्षणासाठी गेले, तेव्हा भिन्न संस्कृतीतील अनेकांशी माझी मैत्री झाली. अनुभवातून खूप शिकले. चांगल्या मैत्रीची गुरुकिल्ली आदर! सहमत न होताही ती मैत्री स्वीकारू शकलात, तर ती मैत्री अविनाशी होते. एकमेकांना समजून घेणे आणि विश्वासार्हता ही मैत्रीची मुख्य बाजू.
मैत्री! जगातील प्रत्येकाच्या आयुष्यातील सुंदर नातं! कोणतेच बंधन नाही. वयाची मर्यादा नाही. जन्मासोबत मिळणाऱ्या नातेसंबंधांपेक्षा मैत्रीचे नाते वेगळे असते. वंश, जात, धर्म, प्रांत, राष्ट्रीयता या साऱ्या सीमारेषेच्या पलीकडले नाते. संस्कृती हा मैत्र बंधाचा एक जागतिक उत्सव! मुख्यतः प्रत्येकाची सांस्कृतिक परंपरा वेगळी! मैत्रीमुळे देवघेवीतून दुराग्रह दूर होऊन विविध संस्कृतीविषयी आत्मीयता वाढते. पूर्ण कुटुंब सहभागी होते. दृष्टिकोनाचा परिघ वाढतो. त्यातूनच जग जवळ येते. मित्र परिवार जेवढा मोठा तेवढे जग, अनुभव मोठा!
समव्यवसायाची, छंदाची, विचारांची मैत्री एकमेकांना समृद्ध करते. एकाच जीवनशैलीतील कम्फर्ट झोनमधील ही मैत्री सोपी असते. मैत्रीचे सामर्थ्य समानतेत नाही तर फरकांमध्ये आहे. आज खेळांत, कलेत, साहित्यांत, राजकारणांत अनेक विरोधकांची मैत्री मजबूत आहे. आयुष्यात मित्राची भूमिका खूप महत्त्वाची, तशी गरजेची असते. खरा मित्र आपल्या यशात आनंदी होतो, अपयशात दुःखी होतो, तत्त्वाशी भांडतो, पुढच्या सेकंदाला मिठी मारतो. विभक्त कुटुंबामुळे मित्रत्वाचे महत्त्व विशेषत्वाने वाढले.
आंतरराष्ट्रीय मैत्रीला प्रोत्साहन देण्यासाठी, सन्मान करण्यासाठी, ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी ‘आंतरराष्ट्रीय मैत्री दिन’ साजरा केला जातो. हा दिवस सोबतीला समर्पित असून प्रत्येकाच्या जीवनात मैत्रीचे महत्त्व अधोरेखित करतो. मैत्रीची कल्पना मुक्त आणि व्यापक आहे, ती एक दिवसाच्या उत्सवात बंदिस्त होऊ शकत नाही.
बालपणीचा राहता परिसर, शाळा, कॉलेज, हॉस्टेल, खेळ, नोकरी… अशा आयुष्याच्या विविध टप्प्यांवर कुठेही कोणीही भेटते. मैत्री का होते, कुणाशी होते, केव्हा होते याचे गणित मांडता येणार नाही. मैत्री ठरवून होत नाही. चांगले मित्र मिळणे ही आयुष्यातील जमेची बाजू. ज्यांना मित्र नाही ते एकाकी पडतात.
मैत्रीची काही उदाहरणे –
१. ‘मैत्रीला कसं जागावं : सांगलीतील तासगांवच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत एका गरीब मुलाच्या अंगावर पुरळ उठले होते. पैशाअभावी तो औषध घेत नव्हता. पाचवीत शिकणाऱ्या ८/१० मुलांनी खाऊच्या पैशातून केमिस्टकडून त्याला औषध दिले. विशेष म्हणजे गुण आला. पण नंतर एका पालकाच्या लक्षात आले. त्या गावातील डॉक्टरांनीही मुलांचे कौतुक करून औषध दिले.
२. शाळेतील भिन्न गुणवतेच्या तीन मित्रांची सत्यकथा : शालेय जीवनापासून कायम अव्वल क्रमांक मिळविणारे कोकण रेल्वेचे शिल्पकार, दिल्ली मेट्रोचे मेट्रोमॅन ई. श्रीधरन; शाळेत अभ्यासात सर्वसामान्य. पुढे आयएएस अधिकारी झालेले भारतीय निवडणूक आयोगाचे अधिकारी टी. एन. शेषन आणि त्यांचा तिसरा मित्र शाळेत मस्तीखोर, तिघांची घनिष्ठ मैत्री. पुढचे शिक्षण न घेता समाजकार्यातून ५ वेळा निवडून आलेले, आपल्या जीवलग मित्राच्याच खात्याचे कॅबिनेट मंत्री के. पी. उम्मीकृष्णन!
३. मैत्रीची सुरुवात सखोल स्नेहातून होते. कॉलेजमध्ये नव्याने मिळालेली मैत्रीण, तिच्या सोबतीची सवय झालेली मी. माझ्या मैत्रिणींशिवाय मी कोणालाच ओळखत नव्हते. काही कारणाने कॅम्पला मी शेवटच्या दोन दिवस आधी सहभागी होताच, “तू आहेस होय ती…?” माझ्या मत्रिणीमुळे आधीच साऱ्यांना मी माहीत होते. किती सुखद गोड प्रसंग…
४. एक सुंदर – दुसरी चारचौघींसारखी, बऱ्याच वर्षांच्या दोन जीवलग मैत्रिणी. मैत्रीच्या काही काळानंतर दुसरीने आपले दोन दात पुढे असल्याची आपली खंत बोलताच, तिला थांबवत पहिली म्हणाली, “मॅडम, आपल्या मैत्रीत हे माझ्या कधी लक्षातच आले नाही.”
५. इंजिनीअरचे शिक्षण घेत असताना, हौस आणि आवड म्हणून नाटक करताना, एकत्र आलेल्या तिघांनी व्यवसाय सुरू केला.
६. संदीप वासलेकरांना पदवी परीक्षेऐवजी आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील निबंधाचे महत्त्व मैत्रिणीने सांगितल्यामुळे, संदीप वासलेकरांचे जीवनच बदलले.
आपण समाजात अनेकांना ओळखतो, जो आपल्याला समजून घेतो त्याच्याशी मैत्री होते. १. आजी-आजोबांची नातवंडाबरोबरची मैत्री! आज समाजात ज्येष्ठ नागरिक तसेच एकेकट्या महिलांची मैत्री! २. शाळेत एकाच वर्गातील मुलांचे पालक म्हणून असलेली ओळख, आयुष्याच्या तिसऱ्या टप्प्यात एकीचा आधार होते. हेलन केलर म्हणतात, ‘मी प्रकाशात एकटे राहण्यापेक्षा अंधारात मित्रांसोबत राहणे पसंत करेन.’
गोष्टीतील मैत्रीचे गुण – १. कोणत्याही परिस्थितीत न विसरणारी श्रीकृष्ण सुदामाची बालमैत्री. २. संकटात असताना नव्हे नेहमीच कर्णाने दुर्योधनाला दिलेली साथ. ३. सिंह आणि उंदीर : मैत्रीत कोणास लहान समजून कमी लेखू नये. ४. मुंगी व कबुतर : संकटकाळी जो मदत करतो तोच खरा मित्र!
मनोरंजन क्षेत्रांत – १. वेगळ्या व्यक्तिमत्त्वाचे मैत्रबंध : थ्री इडियट. २. ये जवानी है दिवानीत ट्रेकदरम्यान फुललेली मैत्री. ३. क्वीनमध्ये वेगळ्या संस्कृतीतील मैत्रीण कंगनाला आधार देते, आत्मविश्वास जागवते. ४. शोले : ये दोस्ती. ५. पूर्णतः वेगळी व्यक्तिमत्त्वे : दिल चाहता हैं. ६. रोड ट्रिपमध्ये जुनी मैत्री साजरी करताना : जिंदगी ना मिलेगी दोबारा. ७. दुनियादारी : नव्या पिढीतील कॉलेजचे प्रतिनिधित्व… ८. बालक-पालक : पालकांनी आपल्या मुलासोबत मैत्री करा.
एक खेकडा समुद्रकिनारी आपल्या तिरप्या चालीने वाळूवर काही रेखाटत होता. समुद्राची लाट आली नि त्याने खेकड्याचे रेखाटन पुसले. खेकड्याने लाटेला विचारले, “मी मेहनतीने काढलेली सुंदर नक्षी तू क्षणांत येऊन पुसली!” लाट काहीशी मागे सरकली, क्षणभर थांबून म्हणाली, “या किनाऱ्यावर एक कोळी सावज शोधण्यासाठी फिरत आहे म्हणून मी तुझी नक्षी पुसली. दोस्ता, मला तुला दुखवायचे नाही नि कायमचे गमावयाचेही नाही.”
नवीन मित्र तयार करा आणि तुमच्या आयुष्याचा पुरेपूर आनंद घ्या. मैत्री दिनाच्या शुभेच्छा!
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.