मुळात उपवास करायचाच कशाला? आणि काय फरक पडतो चंद्रोदयाच्या आधी जेवलं तर? पण व्रतांच्या आचरणाने माणसांच्या आयुष्यात बराच मोठा फरक पडतो. व्रताचरण म्हणजेच स्वतःशीच केलेली प्रतिज्ञा. कोणतंही व्रत आचरणाऱ्या माणसाची एक विशिष्ट मनोधारणा बनते. संयमानं जीवन जगण्याची कला विकसित होते. मनोबल उंचावतं आणि पर्यायानं कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची धैर्यशक्ती प्राप्त होते.
स्वामी विवेकानंदांच्या बाबतीत एक गोष्ट सांगतात. स्वामीजींची आई भुवनेश्वरी देवी अत्यंत धार्मिक वृत्तीच्या आणि श्रद्धाळू स्त्री होती. चातुर्मासात त्या सूर्यव्रत करीत. सूर्यव्रत म्हणजे सकाळी उठून सूर्याचं दर्शन घ्यायचं, त्याला अर्घ्य अर्पण करायचं आणि नंतरच अन्नपाणी सेवन करायचं.
कुणी म्हणेल, ‘त्यात काय मोठसं? सकाळी उठायचं, सूर्याचं दर्शन घ्यायचं आणि नंतर खायचं प्यायचं… त्यात काय?’
पण वाटतं तेवढं हे व्रत सोपं नाहीये. चार्तुमास म्हणजे पावसाळ्याचे दिवस. अनेकदा आकाश इतकं अभ्राच्छादित असायचं की, दिवस मावळेपर्यंत ढगांच्या पडद्याआड लपलेला सूर्य बाहेरच येत नव्हता. अशा वेळी भुवनेश्वरी देवी दिवसभर उपाशी राहात. कधी कधी संध्याकाळी सूर्य थोड्या वेळासाठी ढगांतून बाहेर डोकावायचा. अशा वेळी स्वामी विवेकानंद म्हणजेच लहानगा नरेंद्र आणि त्याची भावंडं धावत धावत घरात जाऊन आईला ‘सूर्य आल्याची’ वर्दी देत. पण घरात माणसांचा राबता असल्यामुळे भुवनेश्वरी देवींना हातातलं काम टाकून लगोलग बाहेर येणं जमत नसे. काम संपवून त्या पाण्यानं भरलेला तांब्या घेऊन बाहेर यायच्या. पण तोवर सूर्यनारायणानं पुन्हा ढगात दडी मारलेली असायची. भुवनेश्वरी देवींना दिवसभर उपवास घडायचा.
शेजारपाजारचे आणि इतर अनेक नातेवाईक वेगवेगळ्या शब्दांत समजावून सांगत. काही बायका तर सांगत की, ‘आम्ही तर बाई दुपारपर्यंत आकाशात सूर्य दिसला नाही, तर कागदावर चितारलेली सूर्यप्रतिमा पाहतो आणि उपवास सोडतो.’
काहीजणांच्या मते हा अट्टहास होता, काहीजणांच्या मते हा अडाणीपणा होता.
काहीजण विचारत, ‘काय साधणार आहे हे व्रत आचरून? एक दिवस सूर्य नाही दिसला तर काय बिघडतं?’ भुवनेश्वरी देवी फक्त हसून हात जोडत. त्या कुणाशीच वाद घालत नसत. अगदी मरेपर्यंत त्यांनी हे व्रत सुरू ठेवलं होतं.
भुवनेश्वरी देवींसारखी व्रत आचरणारी माणसं आजही आपण पाहातोच की. महाराष्ट्रात अनेकजण संकष्टी चतुर्थीचा उपवास धरतात. चंद्रोदय झाल्यानंतर पूजा करूनच उपवास सोडण्याची प्रथा अजूनही पाळतात. कुणी विचारेल मुळात उपवास करायचाच कशाला? आणि काय फरक पडतो चंद्रोदयाच्या आधी जेवलं तर?
मला स्वतःलाही सुरुवातीला अशा प्रकारचे प्रश्न पडत असत. पण पुढे मानसशास्त्राचा अभ्यास केल्यानंतर आणि अनेक थोरा-मोठ्यांची चरित्रं अभ्यासल्यानंतर माझं मलाच उमगलं की व्रतांच्या आचरणाने माणसांच्या आयुष्यात बराच मोठा फरक पडतो.
कोणतंही व्रत आचरणाऱ्या माणसाची एक विशिष्ट मनोधारणा बनते. हे अमुक कार्य पूर्ण झाल्याशिवाय मी तमूक गोष्ट करणार नाही ही प्रतिज्ञा माणूस स्वतःशीच करतो. स्वतःच स्वतःला एक वचन देतो. स्वतःहून स्वतःवर एक बंधन घालून घेतो आणि त्यानुसार वागण्याचा कसोशीनं प्रयत्न करतो. यामुळे आयुष्याला एक शिस्त लागते. संयमानं जीवन जगण्याची कला विकसित होते. मनोबल उंचावतं आणि पर्यायानं कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची धैर्यशक्ती प्राप्त होते.
इसवी सन पूर्व साडेतीनशे वर्षे… म्हणजे साधारण अडीच हजार वर्षांपूर्वी धनानंद नावाच्या एका जुलमी राजाने भर दरबारातून एका विद्वान ब्राह्मणाचा अपमान करून त्याला हाकलून दिलं होतं. दरबारातून बाहेर पडताना त्या ब्राह्मणाने आपले केस मोकळे केले आणि प्रतिज्ञा केली. या नंदराजाची जुलमी सत्ता मी उलथून टाकीन. नंद घराण्याचा पूर्ण नायनाट करीन आणि नंतरच मी शेंडीची गाठ मारीन…
त्यानंतरची कथा तुम्हाला सर्वांना नक्की ठाऊक असेल. त्या ब्राह्मणाने-आर्य चाणक्याने आपल्या बुद्धिचातुर्याने आणि साम-दाम-दंड-भेद राजनीती वापरून धनानंदाचा पुरता बीमोड केला आणि मगध साम्राज्याच्या गादीवर प्रजाहितदक्ष आणि कर्तव्यपरायण अशा चंद्रगुप्त मौर्याची स्थापना केली. चंद्रगुप्त मौर्यानंतरच्या काळात भारताच्या सुवर्णयुगाला खऱ्या अर्थानं प्रारंभ झाला.
त्या आधीच्या कालखंडात अगदी महाभारतातही अशा प्रकारची अनेक उदाहरणं आढळतात. अभिमन्यूला चक्रव्यूहात अडकवून ठार मारल्यानंतरही त्याच्या कलेवराला लाथेनं तुडवणाऱ्या जयंद्रथाला दुसऱ्याच दिवशी सूर्यास्ताच्या आत यमसदनी पाठवीन अशी प्रतिज्ञा अर्जुनानं केली होती. धर्मराज द्यूतात हरल्यानंतर द्रौपदीच्या केसांना धरून तिला भर सभेत फरफटत आणणाऱ्या दुःशासनाची छाती फोडून त्याच्या रक्तानं द्रौपदीचे केस धुवून काढीन अशी प्रतिज्ञा भीमाने केली होती.
पुराणातही अशा प्रकारच्या अनेक कथा सापडतात.
‘ज्या जागेवरून मला कुणीही उठवणार नाही अशी जागा मिळवीन.’ अशी प्रतिज्ञा करून तपश्चर्येला बसलेला धृवबाळ आणि पुढे त्याला मिळालेलं अढळपद… आजही आकाशात उत्तर दिशेला धृवाचा तारा दिमाखात चमचमताना दिसतो.
दाराशी आलेल्या अतिथीला विन्मुख परत जाऊ द्यायचं नाही या निश्चयाला जागणाऱ्या सती अनसूयेनं साक्षात ब्रह्मा, विष्णू, महेश तिन्ही देवांना बालक बनवून ठेवल्याची कथा आपल्याला ठाऊक आहे.
अगदी अलीकडच्या इतिहासातही अशी अनेक उदाहरणं सापडतात. हिंदू हितदक्ष महाराणा प्रतापने मुसलमान राजा अकबराचं मांडलिकत्व नाकबूल केलं होतं. मेवाड स्वतंत्र होईपर्यंत सर्व भौतिक सुखांचा त्याग केला होता. शिवाजी महाराजांनी आणि निष्ठावंत मावळ्यांनी रोहिडेश्वरच्या शिवलिंगावर करंगळीतून रक्ताभिषेक करून स्वराज्यस्थापनेची शपथ घेतली होती.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी पेटत्या समयीवर तळहात ठेवून मातृभूमीच्या मुक्तीसाठी प्राणपणानं झुंजण्याची प्रतिज्ञा केली होती.
अशी असंख्य उदाहरणं सांगता येतील. प्रतिज्ञा करणं किंवा एखादं व्रत स्वीकारणं म्हणजे स्वतःच स्वतःवर घालून घेतलेलं एक बंधन असतं. या प्रतिज्ञापूर्ततेच्या जिद्दीमुळे एक शिस्त अंगी बाणते. सहनशक्तीची कसोटी लागते.
बाहेरून कुणाचीही सक्ती नाही तरीही एक उद्दिष्ट मनाशी ठरवायचं आणि ते ध्येय पूर्ण होईपर्यंत न थांबता प्रयत्न करायचे. मानसशास्त्रज्ञांनी अनेक प्रयत्न करून सप्रमाण सिद्ध केलं आहे की, कोणत्याही माणसाची मनोधारणा बाहेरून बदलणं अवघड आहे.
पण जेव्हा ती व्यक्ती स्वतःहून एखादी गोष्ट स्वेच्छेनं स्वीकारते त्यावेळी त्या माणसाला एक वेगळ्या प्रकारचं आत्मिक बळ प्राप्त होतं. केवळ अवघड नव्हे, तर अशक्य वाटणारी कामं श्रमसाध्य होतात.
शारीरिक क्षमता तर वाढतेच वाढते, पण स्वभावातही सकारात्मक बदल घडतात. कोणत्याही प्रसंगाला सामोरं जाण्याचं बळ प्राप्त होतं.
शारीरिक शक्ती वाढवण्यासाठी जसा व्यायाम किंवा आरोग्यासाठी योगासनं आणि वेगवेगळे प्राणायाम तसंच मनाची शक्ती वाढवण्यासाठी व्रताचरण…
मन सुदृढ असलं की, त्या मनात निर्माण होणारे विचार हे सु-विचारच असतात. जिथं सुविचार असतात तिथं विकारांना थारा नसतो. मनातील विकार नष्ट झाले की, सत्कर्म करण्याची इच्छा जागृत होते. सत्कर्मामुळे सदाचार आणि सदाचारातून आन्मोन्नती… अशा या पायऱ्या आहेत. त्यापैकी पहिली पायरी म्हणजेच व्रताचरण, स्वतःशीच केलेली प्रतिज्ञा. स्वतःच स्वतःला दिलेलं वचन म्हणजे व्रत.
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…