एकाचा मृत्यू, एक बेपत्ता, एक बचावला
मुंबई (प्रतिनिधी) : वर्सोवा वेसावे गावातील देवाचीपाडा येथील समुद्रात शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास मासेमारी करून परतत असलेली होडी बुडाली. या होडीत तिघे जण होते, त्यापैकी एकाला पोहोता येत असल्याने त्याने समुद्र किनारा गाठल्याने बचावला. तर एकाचा मृतदेह रविवारी दुपारी लाईफ गार्डना आढळला असून शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर तिसऱ्याचा शोध सुरू असल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.
वेसावे गावातील देवाचीवाडीमधील विजय बमानिया (३५), उस्मानी भंडारी (२२) आणि विनोद गोयल (४५) हे मासेमारीहून शनिवारी रात्री ८ च्या सुमारास परतत असताना त्यांची होडी वर्सोवा किनाऱ्यापासून ३ किलोमीटरवर बुडाली. यातील विजय बमानियाने पोहत येऊन मढ किनारा गाठला आणि झालेला प्रकार ग्रामस्थांना सांगितला. ग्रामस्थांनी तत्काळ याची माहिती पोलीस आणि अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर अग्निशमन दल, जीवरक्षक, स्थानिक मच्छीमारांनी बुडालेल्या उस्मानी भंडारी आणि विनोद गोयल यांचा शोध सुरू होता. दरम्यान, दुपारी यातील विनोद गोयल यांचा मृतदेह जीवरक्षकांच्या हाती लागला. शवविच्छेदनासाठी तो कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला. दरम्यान, विनोद गोयल यांचा मृत्यू झाल्याचे कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांनी सांगितले.
शनिवारी रात्रीपासून अग्निशमन दल, जीवरक्षक आणि स्थानिक मच्छीमारांकडून तसेच नौदलाच्या हेलिकॉप्टरमधूनही शोध सुरू होता. दोरखंड, हूक आणि विविध प्रकारच्या साहित्याचा वापर करण्यात आला. मात्र, समुद्राला आलेल्या भरतीमुळे रविवारी दुपारी १ वाजता शोधमोहीम थांबवण्यात आली.