Wednesday, April 30, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

राज्यात आरटीईच्या १९ हजार ३९४ जागा रिक्त

राज्यात आरटीईच्या १९ हजार ३९४ जागा रिक्त

मोठ्या प्रमाणात जाहिरात करूनही प्रतिसाद कमी

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील खासगी इंग्रजी शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना २५ टक्के जागा आरक्षित असून त्यासाठी राबविण्यात आलेल्या प्रवेश प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी करण्यात आली होती. मात्र यंदा देखील मोठ्या प्रमाणात जागा रिक्त असल्याचे यावेळी निदर्शनास आले आहे. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत यंदा १९ हजार ३९४ जागा रिक्त राहिल्या आहेत. प्रवेश प्रक्रियेद्वारे नियमित प्रवेश जाहीर झालेले विद्यार्थी आणि प्रतीक्षा यादीतील विद्यार्थी अशा एकूण ८२ हजार ४५३ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला.

प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. यंदा ८ हजार ८२३ शाळांतील १ लाख १ हजार ८४६ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी एकूण ३ लाख ६४ हजार ४१३ अर्ज दाखल झाले. प्रवेशासाठीच्या सोडतीतून ९४ हजार ७०० नियमित प्रवेश जाहीर करण्यात आला. नियमित विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाल्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी तीन फेऱ्या राबवण्यात आल्या. त्यात पहिल्या फेरीत १३ हजार ६६०, दुसऱ्या फेरीत ३ हजार ५८३, तिसऱ्या फेरीत एक हजार २५९ आणि चौथ्या फेरीत १८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्यामुळे एकूण उपलब्ध जागांपैकी १९ हजार ३९४ जागा रिक्त राहिल्याचे संकेतस्थळावरील आकडेवारीवरून दिसून येत आहे.

Comments
Add Comment