
खारघर सेक्टर-३० भागात बेकायदेशीरीत्या वास्तव्यास असलेल्या तीन बांग्लादेशी नागरिकांना दहशतवाद विरोधी पथकाच्या नवी मुंबई युनिटने बुधवारी अटक केली आहे. बादल मोईनुद्दीन खान (३८), कमल अहमद खान (३६) आणि अलीम युनूस शेख (४०) अशी या तिघांची नवे असून मागील काही महिन्यापासून हे तिघेही सदर ठिकाणी बेकायदेशीरीत्या वास्तव्यास असल्याचे आढळून आले आहे.
या कारवाईत अटक करण्यात आलेले तिघेही बांग्लादेशातील असून ते खारघर सेक्टर-३० ओवे गावच्या मागील भागात बेकायदेशीररीत्या राहत असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाच्या नवी मुंबई युनिटला मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे दहशतवाद विरोधी पथकाने बुधवारी खारघर सेक्टर-३० ओवे गावच्या मागील भागात साई पूजा सोसायटीत छापा मारला असता इथे तीन बांग्लादेशी नागरिक बेकायदेशीररीत्या राहत असल्याचे आढळून आले.
त्यानंतर पोलिसांनी या तिघांकडे चौकशी केली तेव्हा त्यांनी काही महिन्यांपूर्वी बांग्लादेशातून विनापासपोर्ट आणि वैध कागदपत्रांशिवाय बेकायदेशीररीत्या भारतात प्रवेश केल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी तिघा विरोधात खारघर पोलीस ठाण्यात विदेशी व्यक्ती अधिनियम तसेच पारपत्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल त्यांना अटक केली आहे.