
अजय तिवारी
आपली अनेक दैनंदिन कामे सोपी करणाऱ्या स्मार्टफोनच्या दुष्परिणामांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. लहान मुलांना स्मार्टफोनच्या धोक्यांबद्दल पुरेशी माहिती नसते. फोनच्या अतिवापराचा धोका समजण्याइतके ते हुशार नसतात; परंतु पालक सुज्ञ असतात. त्यामुळे आपल्या मुलाला फोनपासून अधिकाधिक लांब ठेवणे पालकांना जमले पाहिजे. त्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या अहवालात दिलेला ताजा इशारा समजून घेतला पाहिजे.
अलीकडेच राजस्थानमधील अलवरमध्ये घडलेल्या घटनेमधून प्रत्येक पालकाने धडा घ्यायला हवा. राजस्थानमधील एका घटनेत ऑनलाइन गेमिंगच्या सवयीमुळे एका १४ वर्षांच्या मुलाचे मानसिक संतुलन इतके बिघडले की त्याला सुधारगृहात पाठवावे लागले. जास्त वेळ स्मार्टफोन वापरल्याचा वाईट परिणाम मुलावर होऊ नये, याची खबरदारी घेतली पाहिजे. गेल्या काही वर्षांपासून ऑनलाइन क्लासमुळे मुलांचा ‘स्क्रीन टाईम’ वाढला आहे. आज आपल्याला घराघरांमध्ये स्मार्टफोन पाहायला मिळतो. कोरोनाकाळात शिक्षणाचा काही पर्याय नसल्याने ऑनलाइन क्लास सुरू झाले आणि तेव्हापासून मुले अतिप्रमाणात मोबाइल फोन वापरू लागले. मुले घरी बसून अनेक तास मोबाइल स्क्रीन पाहून अभ्यास करू लागले. परिणामी, त्यांचा स्क्रीन टाईम वाढला. स्मार्टफोन हे मनोरंजनाचेही उत्तम साधन आहे आणि त्यामुळेच मुले अभ्यासासोबत ऑनलाइन गेमिंगच्या कचाट्यातही सापडले.
आता कोरोनाचा धोका टळला असला तरी अभ्यासासाठी फोन वापरतोय, हे मुलांचे कारण काही संपत नाही. त्यामुळे मोबाइल फोन वापरण्यासाठी ठरावीक वेळ नेमून देण्याची गरज वाढली आहे. सोप्या भाषेत सांगायचे, तर २४ तासांपैकी लहान मुले किती तास टीव्ही, लॅपटॉप, टॅबलेट आणि मोबाइल फोन वापरतात, याला स्क्रीन टाईम म्हणतात. जागतिक आरोग्य संघटनेने स्मार्टफोनचा वापर करणाऱ्या मुलांशी संबंधित धोके ओळखण्यास सुरुवात केली आहे. डिजिटल शिक्षणाचे मुलांवर होणारे शारीरिक आणि मानसिक परिणाम लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या मानव विकास संसाधन मंत्रालयाने ‘प्रगत’ नावाची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यात ऑनलाइन वर्गांची संख्या आणि वेळ मर्यादित करण्याच्या सूचना जारी केल्या आहेत.
आतापर्यंत मधुमेह, अतिताण, कर्करोग अशा घातक आजारांबद्दल आपण ऐकले आहे; मात्र आता स्मार्टफोन नावाचा विकारही फोफावतो. हा विकार गंभीर आजाराप्रमाणे धोकादायक आहे. स्मार्टफोनच्या अतिरेकी वापरामुळे ‘युनेस्को’ने चिंता व्यक्त केली आहे. इतकेच नाही, तर शाळांमधून स्मार्टफोन हद्दपार करा असा अहवालच दिला आहे. स्मार्टफोन हा तुमच्या आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. हातात स्मार्टफोन नसलेली व्यक्ती आज अभावानेच पाहायला मिळते. आपल्याकडे शाळा, कॉलेजमध्ये स्मार्टफोन वापरावर बंदी असली तरी लपून-छपून स्मार्टफोनचा वापर करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी नाही. डिजिटल शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना खूप फायदा होत असला तरी त्याचे अनेक दुष्परिणाम असल्याचे मत ‘युनेस्को’ने आपल्या अहवालात मांडले. डिजिटल शिक्षणात अफाट क्षमता असली तरी ते शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातल्या प्रत्यक्ष संवादाची जागा घेऊ शकत नाही. कोणतेही तंत्रज्ञान शिक्षकांची जागा घेऊ शकत नाही. शिक्षण हे मानवकेंद्रीत असायला हवे.
स्मार्टफोनच्या अतिवापराचा शैक्षणिक कामगिरीवर थेट परिणाम होत असल्याने शैक्षणिक कामगिरी खालवल्याचेही या अहवालात म्हटले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कोणत्याही प्रकारच्या डिजिटल तंत्रज्ञानाकडे शिक्षणातील सहाय्यक घटक म्हणून पाहायला हवे, अशा परखड शब्दांमध्ये ‘युनेस्को’ने आपले मत मांडले. शिवाय बरीच मुले ऑनलाइन अभ्यास करता करता ‘सोशल मीडिया’ आणि रिल्समध्ये घुसखोरी करतात. त्यामुळे अभ्यासाची लिंक तुटून जाते. आता ‘युनेस्को’चा अहवाल प्रत्येक देश किती गांभीर्याने घेतो आणि त्यानुसार शिक्षणपद्धतीत बदल करतो हे पाहावे लागेल. मोबाइलमुळे लहान मुलांमध्ये चिडचिडेपणा, अतिताण यासारखे आजार वाढले आहेत. उलट, मोबाइल न दिल्यासही मुलांमध्ये वाढणारा चिडचिडेपणा पालकांसाठी डोकेदुखी होऊन बसला आहे. यामुळे डोळ्यांचा त्रास आणि इतर आजारांना आमंत्रण देण्याचे काम हा मोबाइल करत आहे. वॉशिंग्टनमधील ‘सेपियन लॅब्स’ या स्वयंसेवी संस्थेने जागतिक स्तरावर केलेले एक संशोधन सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे. मोबाइल, स्मार्टफोन, टॅब याचा वापर आता इतका वाढला आहे की, लहान मुलांनाही सर्रास स्मार्टफोन वापरायला दिले जातात. पालकांनाही लहान मुलांना वेळ देता येत नाही. त्यामुळे स्मार्टफोन मुलांच्या हातात दिला जातो. परिणामी, मुले त्यात गुंतून राहतात आणि पालकांनाही आपापले सोपस्कार पार पाडता येतात.
लहान मुले काही काळातच ‘स्मार्टफोन युजर फ्रेंडली’ बनतात, याचेही कौतुक अनेक पालकांना असते. आपला पाल्य लहान असून मोबाइल उत्तमरीत्या हाताळतो, असे काही पालक अभिमानाने सांगतात; पण ही अभिमानाने सांगण्याची गोष्ट नाही, असे ‘सेपियन’च्या संशोधनातून समोर आले आहे. जेवढ्या उशिरा मुलांच्या हातात स्मार्टफोन द्याल, तेवढे त्यांचे मानसिक आरोग्य स्मार्ट राहू शकते. कमी वयात लहान मुलांच्या हातात स्मार्टफोन दिला गेल्यास मोठे झाल्यानंतर या मुलांना गंभीर स्वरूपाचे मानसिक आजार जडू शकतात. त्यातही पुरुषांपेक्षा महिलांच्या मानसिक आरोग्यावर अधिक परिणाम होत असल्याचे ‘सेपियन’च्या संशोधनातून समोर आले आहे. ‘एज ऑफ फर्स्ट स्मार्टफोन अँड मेंटल वेलबिइंग आऊटकम्स’ या नावाने हे संशोधन १४ मे रोजी प्रकाशित करण्यात आले. आता १८ ते २४ या वयोगटातल्या मुला-मुलींना लहानपणी कितव्या वर्षी स्मार्टफोन देण्यात आला आणि त्याचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर काय परिणाम झाला, याबाबत संशोधन करण्यात आले. ‘ग्लोबल माइंड प्रोजेक्ट’ या अभियानांतर्गत ‘सेपियन लॅब्स’ने हे संशोधन केले. या संशोधनासाठी या वर्षी जानेवारी ते एप्रिलदरम्यान १८ ते २४ या वयोगटातील २७ हजार ९६९ मुलांच्या मानसिक आरोग्याचा अभ्यास केला गेला. उत्तर अमेरिका, युरोप, लॅटिन अमेरिका, दक्षिण आशिया आणि आफ्रिकेमधील ४१ देशांमधून हा सर्व्हे केला गेला. भारतामधील चार हजार युवकांचा या संशोधनात समावेश करण्यात आला होता.
या संशोधनात समोर आलेली महत्त्वाची बाब म्हणजे मुलांच्या हातात स्मार्टफोन जेवढ्या उशिरा पडला, तेवढा त्यांच्यातील आत्मविश्वास वाढला, इतरांशी सकारात्मकतेने संबंध ठेवण्याची क्षमता वाढली. तसेच आयुष्यात उशिरा स्मार्टफोन वापरायला सुरुवात करणाऱ्या मुलींच्या स्वभावातील मूड, दृष्टिकोन, अनुकूलता आणि लवचिकता अधिक असल्याचे लक्षात आले. याव्यतिरिक्त मुलांना अतिशय लहान वयात स्मार्टफोन हाताळण्यास मिळाल्यामुळे त्यांच्यात आत्महत्येचे विचार, इतरांच्या प्रती आक्रमकतेची भावना, वास्तवापासून दूर राहणे, कल्पकतेमध्ये घट अशा अनेक मानसिक समस्या दिसून आल्या. भारतातून केवळ चार हजार मुलांचा या संशोधनात सहभाग असला तरी हे प्रमाण सावधानतेचा इशारा देण्यासाठी पुरेसे आहे.
भारतात दहा ते १४ वयोगटातील ८३ टक्के मुलांच्या हातात स्मार्टफोन आहे. आंतरराष्ट्रीय प्रमाणापेक्षा ही संख्या ७६ टक्क्यांनी अधिक आहे. हे संशोधन कमी वयात तंत्रज्ञानाच्या होत असलेल्या वापरावर नियंत्रण आणण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते. भारतात १५ ते २५ या वयोगटातील मुलांची संख्या २० कोटी एवढी आहे, त्या अानुषंगाने या संशोधनातील निष्कर्ष शाळा, पालक आणि इतरांसाठी दिशादर्शक ठरतील. सलग दोन ते तीन तासांपेक्षा जास्त काळ मोबाइलचा वापर केल्याने मुलांच्या एकाग्रतेवर परिणाम हेात आहे. वागण्यात बदल, चिडचिडेपणा, डेाळ्यांचे आजार वाढत आहेत. तसेच ‘सोशल मीडिया’च्या वापरामुळे २० ते ३० टक्के मुलांमध्ये मानसिक आजार जडत आहेत. आता ‘ऑनलाइन एज्युकेशन’साठी मोबाइलचा वापर वाढला आहे. परिणामी, डेाळ्यांचे आजार, चिडचिडेपणाही वाढल्याच्या तक्रारी पालक करत आहेत. केस स्टडीजनुसार पाच वर्षांपासून वयोवृद्धांपर्यंत मानसिक आजार वाढल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यात मुलांचे प्रमाण तब्बल २० ते ३० टक्क्यांपर्यंत आहे. आजच्च्या काळात स्मार्टफोन वापरणे टाळता येणार नाही, हे वास्तव आहे, मात्र त्यात तारतम्य आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत हे खरेच.