अश्विनी पब्लिसिटीचे जनसंपर्क अधिकारी दिवंगत अजय बने यांचा सुपुत्र श्रवण अजय बने याची ‘गुड वाइब्स ओन्ली’ ही वेबफिल्म एमएक्स प्लेअर व प्लॅनेट मराठी ओटीटीवर पाहायला मिळत आहे. सध्या श्रवणच्या नैसर्गिक अभिनयाचे कौतुक होत आहे.
श्रवणचे महाविद्यालयीन शिक्षण अंधेरीच्या भवन्स कॉलेजमध्ये झाले. तिथून त्याने बी.एम.एम. (मास मीडिया)ची पदवी घेतली. त्यावेळी काही एकांकिकांमध्ये त्याने कामे केली होती. अगदी आय.एन.टी. स्पर्धेतदेखील त्याने भाग घेतला होता.
नृत्य, अभिनय व लिखाणाची आवड त्याला होती. त्यानंतर त्याने एमिटीमधून जाहिरातीचा कोर्स केला. त्यानतंर त्याने जाहिरातीचे लेखन केले. एका मित्राने सांगितले की, “रेडिओवर जॉकीचे काम आहे, करणार का?” श्रवणला रेडिओवरचं संगीत ऐकायला आवडत होतं, बोलायला आवडत होतं व सिनेमा आवडायचा. त्यामुळे त्याच्या आवडीचे क्षेत्र मिळाल्यामुळे त्याने रेडिओवर जॉकीचे काम स्वीकारले. त्याने ९४.३ एफ.एम.वर प्रोड्यूसर म्हणून काम केले. फिवर एफ.एम.वर टॉक शो केला. ‘लय भारी विथ मराठी मुलगा श्रवण’ हा टॉक शो खूप लोकप्रिय झाला. ९२.७ बिग एफ.एम.वर प्रोड्यूसर म्हणून काम केले. तेथे सुहाना सफर विथ अन्नू कपूर, संगीतकार अनू मलिक शो केला.
यादरम्यान त्याची दिग्दर्शक जुगल राजाशी भेट झाली. त्यांना त्याची पर्सनालिटी खूप आवडली. त्याला घेऊन काहीतरी प्रोजेक्ट करण्याचे दिग्दर्शक जुगल राजानी ठरविले. गेल्या चार वर्षांपासून श्रवण सर्फिंग करीत होता. त्याबद्दल माहिती मिळवून, त्या ठिकाणी जाऊन, त्यावर दिग्दर्शक जुगल राजाने कथा लिहिली व श्रवणला त्यात नायकाची भूमिका दिली. हा त्याच्या जीवनातला टर्निंग पॉइंट ठरला.
दोन भिन्न स्वभावाच्या व्यक्ती सर्फिंग कॅम्पच्या निमित्ताने एकत्र येतात. सुरुवातीला सतत खटके उडणाऱ्या या दोघांमध्ये हळूहळू मैत्री निर्माण होते. त्यामध्ये भावनिक बंध निर्माण होतो. सर्फिंग या वॉटर स्पोर्ट्सभोवती फिरणाऱ्या या कथेत मैत्रीची एक तरल भावना अतिशय हलक्या-फुलक्या पद्धतीने मांडण्यात आली आहे. आरजे श्रवण व गायिका आरती केळकर यांनी या वेबफिल्मच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे.
कॅमेऱ्यासमोर अभिनय करताना दडपण आले का? असे विचारले असता श्रवण म्हणाला की, सुरुवातीला दडपण आले होते; परंतु मी कॉलेजमध्ये एकांकिका केल्याने माझ्यात आत्मविश्वास आला होता. मी रेडिओवर जॉकीचे काम करताना अभिनय करीतच होतो. फक्त तो चार भिंतीच्या आत होता. लाखभर लोक मला ऐकत होते. रेडिओवर मी वेगवेगळी नाटके सादर केली, त्याचा उपयोग मला येथे झाला.
विरारच्या रजोडी बीचवर या वेबफिल्मचे शूटिंग झाले. दिग्दर्शक जुगल राजाने त्याच्याकडून नैसर्गिक अभिनय करून घेतला. नैसर्गिक प्रकाशामध्ये, योजनाबद्ध रितीने कमी कालावधीत हा चांगला चित्रपट तयार केला.
श्रवणला बाईकवरून फिरण्याची आवड आहे. तो अगदी गोव्यापर्यंत बाईकने गेलेला आहे. गिटार वाजवायला आवडते. व्हॉइस ओव्हर द्यायला आवडते. ९१.९ एफ.एम.वर रेडिओ नशा हा जुन्या गीतांचा कार्यक्रम विक्रम व वेताळ सादर करायचे. त्यामध्ये विक्रमचा आवाज श्रवणचा असायचा. त्याच्या स्वप्नाच्या लाटेवरचा अभिनयाच्या सर्फिंगचा प्रवास असाच पुढे पुढे जात राहो, हीच शुभेच्छा!
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…
मुंबई: इमरान हाश्मीचा नवा चित्रपट 'ग्राउंड झिरो' सध्या चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा प्रीमियर झाला.…