नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते रविवारी देशभरातील अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत (ABSS) एकाच वेळी ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास प्रकल्पांचे भूमीपूजन होणार आहेत. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी या पुनर्विकास प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. पुनर्विकास करण्यात येणाऱ्या ५०८ स्थानकांमध्ये महाराष्ट्रातील ४४ स्थानकांचा समावेश आहे. त्यात मुंबईतील १५ रेल्वे स्थानकांचा समावेश आहे.
रेल्वे स्थानक पुनर्विकासात महाराष्ट्रातील एकूण १२३ रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. त्यापैकी ४४ स्थानकांच्या प्रकल्पाची पायाभरणी रविवारी, ६ ऑगस्ट रोजी होणार आहे.
सार्वजनिक वाहतुकीचे माध्यम म्हणून देशभरातील नागरिकांची रेल्वेला पसंती असल्याचे लक्षात घेऊन सरकारने रेल्वे स्थानकांमध्ये जागतिक दर्जाच्या सुविधा पुरवण्याच्या आवश्यकतेवर भर दिला आहे. देशभरातील १३०९ स्थानकांच्या पुनर्विकासाकरता अमृत भारत स्थानक योजना (Amrit Bharat Station Scheme (ABSS)) ही पंतप्रधानांच्या दृष्टीकोनावर आधारित असलेली योजना सुरू करण्यात आली आहे.
या योजनेचा भाग म्हणून पंतप्रधान ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. २४,४७० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाने या रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जाणार आहे. शहराच्या दोन्ही बाजूंपासून योग्य अंतरावरील ‘सिटी सेंटर्स’ म्हणून या स्थानकांचा विकास करण्यासाठी एक बृहद आराखडा तयार करण्यात येत आहे. शहराच्या एकंदर नागरी विकासाच्या समग्र दृष्टीकोनाच्या आधारे या रेल्वे स्थानकांच्या विकासाबाबत एकात्मिकतेवर भर दिला जात आहे.
२७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये या ५०८ रेल्वे स्थानकांचा विस्तार आहे, ज्यामध्ये उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील प्रत्येकी ५५, बिहारमधील ४९, महाराष्ट्रातील ४४, पश्चिम बंगालमधील ३७, मध्य प्रदेशातील ३४, आसाममधील ३२, ओदिशातील २५, पंजाबमधील २२, गुजरात आणि तेलंगणामधील प्रत्येकी २१, झारखंडमधील २०, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूमधील प्रत्येकी १८, हरयाणातील १५ आणि कर्नाटकमधील १३ रेल्वे स्थानकांचा आणि इतरांचा समावेश आहे.
या योजनेअंतर्गत विविध अद्ययावत सोयी सुविधा प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत. स्थानक प्रबंधक ऑफिस, पार्सल ऑफिस, हेल्थ ऑफिस, टीसी ऑफिस, एमसीओ ऑफिस यांचे पूर्णपणे नूतनीकरण केले जाणार आहे. नवीन कोच डिस्प्ले बोर्ड बसवण्यात येणार आहे. विकास कामांमध्ये स्थानकाच्या दर्शनी भागाचा विकास, लँडस्केपिंग, मॉडल टॉयलेट, प्लॅटफॉर्म सरफेस केबल ट्रेज, अत्याधुनिक फर्निचर भरपूर प्रकाश योजनेसाठी एलईडी, नाम फलक, पार्किंग व्यवस्था, प्रतिक्षागृह, स्वच्छतागृह, नवीन फूटओवर ब्रीज, दोन्ही प्लॅटफॉर्मवर लिफ्ट व्यवस्था, नवीन कोच डिस्प्ले, सीसीटीव्ही कॅमेरे आदींचा समावेश असणार आहे.
मुंबईतील या स्थानकांचा समावेश
भायखळा, चिंचपोकळी, परळ, माटुंगा, कुर्ला, विद्याविहार, विक्रोळी, कांजूरमार्ग, मुंब्रा, दिवा, शहाड, टिटवाळा, इगतपुरी, वडाळा रोड, सँडहर्स्ट रोड
नाशिक जिल्ह्यातील या स्थानकांचा समावेश
मनमाड, चाळीसगाव, शेगाव, बडनेरा, मलकापूर, नेपानगर
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra