
मुंबई : मुलाच्या लग्नानंतर घरातील सासू – सुनेचे नाते हे प्रत्येक कुटुंबांमध्ये महत्वाचे असते. मात्र अनेकदा लग्नानंतर सासू-सुनेमध्ये काही कारणाने खटके उडतात आणि त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होतो. तर कधी-कधी हा वाद तर विकोपाला जातो. परंतु कांदिवलीत मात्र सासू- सुनेच्या नात्यामध्ये एक अनोखे प्रेम दिसून आले. एका सासूने तिच्या सुनेला किडनी दान केली आहे. या अवयवदानानंतर सुनेला जीवनदान मिळाले आहे. मोठ्या मनाच्या या सासूचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कांदिवली पुर्वकडील ठाकूर व्हिलेज येथील सत्यम टॉवर सोसायटीमध्ये राहणारे मोटा परिवारातील सून अमिषा जितेष मोटा (४३) यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या, अशावेळी कुटुंबांमध्ये आई समान असलेल्या प्रभा कांतीलाल मोटा (७०) या त्यांच्या सासूची किडनी जुळली व सासूने आनंदाने सूनेला किडनी दान केली. मंगळवारी मुंबईतील नानावटीला रूग्णालयात यशस्वी शास्रक्रिया पार पडली. सून अजून रूग्णालयात आहे. सासूचे घरी आगमन झाले त्यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले.
काँग्रेस नेते सचिन सावंत यांच्या इमारतीमधील असलेल्या मोटा कुटुंबियांविषयी त्यांनी ट्वीट करत याबाबत सांगितले की, जगातील सर्व सासूंनी याचा आदर्श घ्यावा, “देशातील अतिशय दुर्मिळ घटना आमच्या इमारतीमध्ये घडली आहे. मोटा परिवाराने विशेषतः प्रभाजींनी घालून दिलेला आदर्श विश्वातील समस्त सासूंनी अनुसरावा. प्रभाजींचे मनःपूर्वक अभिनंदन!,” असे ट्वीट त्यांनी केले आहे.
अनेकवेळा दोन्ही किडन्या निकामी झाल्याने प्रत्यारोपण हा एकाच मार्ग रुग्णासमोर उरतो. किडनी मिळाली नाही तर रुग्णांना कायमस्वरूपी डायलिसिस करावे लागते. त्यामुळे माणसाचे आयुष्य कमी होते. मात्र अशा रुग्णाला किडनी मिळाली की, त्याचे आयुष्य वाढू शकते. मात्र राज्यात ५८३२ रुग्ण किडनी मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत. यासोबत इतर अवयवांच्या प्रतिक्षेत अनेक रुग्ण आहेत.