भाजप आमदार नितेश राणे यांचाही सक्रिय सहभाग
छत्रपती संभाजीनगर : सकल हिंदू समाजाच्या वतीने आज छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar) राहुरी येथे जनआक्रोश मोर्चाचं आयोजन केलं गेलं होतं. गेल्या काही दिवसांपासून लव्ह जिहाद (Love jihad) आणि धर्मांतराचा (Conversion) आरोप करत हिंदू संघटनांनी या मोर्चाचं आयोजन केलं. भाजपचे आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) देखील या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. या मोर्चासाठी वाय एम. सी. मैदानावर प्रचंड गर्दी जमली होती. राहुरी शहरासोबतच राहुरी तालुक्यात कडकडीत बंद पाळ नागरिकांनी मोर्चात सहभाग नोंदवला.
वाय. एम. सी. मैदानावरुन या मोर्चास प्रारंभ झाला. यावेळेस मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांच्या नाश्त्याची देखील सोय करण्यात आली होती. कोपरगाव, श्रीरंगपूर, संगमनेर या शहरांमध्ये यापूर्वी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यानंतर आता राहुरी येथे जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चेकरांच्या हातात ‘तू दुर्गा बन, तू काली बन, पर तू लव्ह जिहाद का शिकार ना बन’, अशा अनेक घोषणांचे बॅनर्स होते.
‘हिंदू बांधवांची जी एकात्मता आहे ती टिकवून ठेवण्यासाठी आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत. कुणाबद्दलही द्वेष नाही, मात्र हिंदूंची जनजागृती होणे ही काळाची गरज आहे’, अशी प्रतिक्रिया एका मोर्चेक-याने दिली. मोर्चात सहभागी झालेल्या प्रत्येकाच्या डोक्यावर भगवी टोपी व हातात भगवे झेंडे होते. या मोर्चामुळे वाय. एम. सी. मैदानावर भगवं वादळ निर्माण झालं होतं.