
सभागृहातच बच्चू कडूंचा आदित्य ठाकरेंसह सरकारवर जोरदार 'प्रहार'
मुंबई : विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांचा प्रस्ताव मांडण्याच्या शेवटच्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी प्रहार संघटनेचे बच्चू कडू (Bacchu Kadu) आक्रमक भूमिकेत पाहायला मिळाले. यावेळी बच्चू कडू यांनी आदित्य ठाकरेंसह सरकारवर जोरदार 'प्रहार' केला.
बच्चू कडू (Bacchu Kadu) सभागृहात पोटतिडकीने जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर बोलत असताना आदित्य ठाकरेंसह ठाकरे गटाचे आमदार गप्पा मारण्यात दंग झाले होते. या आमदारांना तुम्ही जुगाराच्या अड्ड्यावर बसले आहात का? असा खोचक सवाल करीत बच्चू कडू यांनी विधानसभा अध्यक्षांकडे त्यांची तक्रार केली.
बच्चू कडू म्हणाले, अध्यक्ष महोदय, मी बोलत असतांना काही लोक गप्पा मारत आहेत. हे सभागृहात बसले आहेत की सभागृहाच्या बाहेर? जुगार अड्ड्यावर बसले आहेत की काय? आदित्य ठाकरे, जाधव साहेब, वायकर हे आपसात बोलत आहेत. अध्यक्ष महोदय, यांना सभागृहाचे नियम सांगा. तुमचा प्रभाव पडत नसल्याचं बच्चू कडू म्हणाले आहेत.
तसेच विरोधी पक्षाचा अंतिम आठवडा प्रस्ताव असून खरेतर विरोधी पक्षच राहणार नाही असे दिसतेय. कदाचित ती जबाबदारी आमच्यावरही येऊ शकते, असा टोला सुरुवातीलाच कडू यांनी लगावला. राज्यातल्या ग्रामीण भागातील विजेच्या मुद्द्यावरुन कडू यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. ‘तुम्ही आम्ही सगळे ग्रामीण भागातले आहोत. २४ तासांचे वीज बिल घेतात, ८ तासच वीज देतात.
विजेच्या मुद्द्यावरुन राज्यात जे चाललंय, ते थांबवायला हवे. विजेच्या वायर घराच्या हातभर उंचावरून जातात. जेवढे धर्माच्या नावाने मेले नाहीत तेवढे या व्यवस्थेने मारले आहेत. अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही. चार-पाच लाखाची मदत देऊन तोंड गप्प केले जाते. गरीबाचा मृत्यू एवढा स्वस्त केला आहे. आमदार खासदाराचं पोरगं मरत नाही ना म्हणून तिकडे लक्ष दिले जात नाही’, अशी सडकून टीका कडू यांनी केली.