Cunning Cat : लबाड मांजर


  • कथा : रमेश तांबे



लबाड एकदा मांजर देवळातले प्रवचन ऐकून उंदीर कधी खाणार नाही असा ‘पण’ करते, तेव्हापासून मांजर दूध-चपाती खाते. मग उंदरांना वाटते, मांजरीने ‘पण’ केलाय देवळात, करणार नाही उंदरांचा घात! पण लबाड मांजर डोळे मिटून गुपचूप बसायची अन् हळूच पटकन उंदीर मटकवायची. बिचाऱ्या उंदरांना नाही कळायचे, आपले मित्र कुठे गायब व्हायचे!



एक होती मांजर. घाऱ्या घाऱ्या डोळ्यांची, पांढऱ्याशुभ्र रंगाची. गल्लीबोळातून फिरायची, दोन घास मिळवायची. कधी दूध, चपाती, कधी पाव. कधी काहीच मिळायचं नाही राव! पण एक दिवस असा यायचा की, दिवसभर उपवास घडायचा. मग मांजरीचं खरं रूप दिसायचं. बिळाच्या बाहेर डोळे मिटून बसायची. हळूच एखादा पिटुकला उंदीर पकडायची. घालायची त्याला तोंडात चटकन, खायची मटकन. उंदीर तिला आवडायचे खूप, पण लागायचे तिला खाताना तूप!



एके दिवशी काय घडलं मांजरीने उंदराचं पिल्लू पकडलं. म्हणाली उंदीर खाऊ तुपासोबत, मग झोप काढू घोरत घोरत. पहिल्या घरात मांजर शिरली. तुपाचा डबा शोधू लागली. तेवढ्यात मोठा आवाज झाला. कुणी तरी चेंडू फेकून मारला. मांजर पळाली धुमचकाट, कसेबसे वाचले तिचे पेकाट. मग मांजर गेली दुसऱ्या घरात. तिथं होती मोठी परात. परातीत होतं भरपूर तूप. मांजरीने मारल्या उड्या खूप! परात उचलली ठेवली डोक्यावर, तेवढ्यात झाडू बसला पायावर. तिथंच टाकून तुपाची परात मांजर शिरली तिसऱ्या घरात. तिथं बसली होती पंगत मांजर गेली रांगत रांगत! कुणीतरी तिला दिली चपाती, पण तिला हवी होती तुपाची वाटी. वाटीला तिने तोंड लावले, दुधाने तिचे तोंडच भाजले! बिचारी मांजर तिथून निघाली जवळच्याच एका देवळात पोहोचली. तिला वाटले तूप मिळेल इथे, आता मी इथेच बसते.



देवळात प्रवचन होते सुरू, बुवा सांगत होते हत्या नका करू. दुसऱ्याला मारणे आहे पाप, बुवांची पडली मांजरीवर छाप! मांजर म्हणाली, खरे आहे बुवा कुणाला मारणे पाप आहे देवा! मग मांजरीने केला देवळात पण, असू दे मोठा कुठलाही सण. या पुढे उंदीर खाणार नाही कधी, जरी मिळाली तुपाची वाटी! मांजरीची घोषणा उंदरांनी ऐकली, बातमी लगेच सगळ्यांना कळाली. मग मांजर पुन्हा आली आपल्या घरी, पकडलेल्या उंदराला सोडले दारी.



उंदीर म्हणाला, काय झालं ताई, तू मला का गं खात नाही. मांजर म्हणाली, बुवा म्हणतात पाप असते जे दुसऱ्यांना मारतात. तेव्हापासून मांजर, दूध चपाती खाते. बाकीच्या वेळी डोळे मिटून बसते. मग काय सगळे उंदीर बिनधास्त झाले. मांजरीच्या अवतीभवती फिरू लागले. त्यांना वाटले मांजरीने केलाय देवळात पण, घेणार नाही उंदरांचे प्राण! पण मांजर होती मोठी लबाड, डोळे मिटून गुपचूप बसायची. मग हळूच डोळे उघडून पटकन उंदीर मटकवायची. पुन्हा डोळे बंद करायची. बिचाऱ्या उंदरांना नाही कळायचे, आपले मित्र कुठे गायब व्हायचे! अशी लबाड मांजर आजही घरात डोळे मिटूनच बसते. एखाद्या गरीब गायीसारखी!



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.


Comments
Add Comment

खरे धाडस

कथा : रमेश तांबे पावसाळ्याचे दिवस होते. भरपूर पाऊस पडत होता. ओढे-नाले-नद्या दुथडी भरून वाहत होत्या. सारे जंगल

बोलल्याप्रमाणे वागावे

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर “माणसाला त्याच्या बोलण्यावरून नव्हे तर कृतीवरून ओळखले जाते” असे आपण

मनाचा मोठेपणा

कथा : रमेश तांबे शाळेत भाषण स्पर्धेचे आयोजन केले होते. विद्याधरने नेहमीप्रमाणे आपले नाव स्पर्धेसाठी दिले होते.

सहकार्य

कथा : प्रा. देवबा पाटील आदित्यने आधीपासूनच सुभाषला काहीतरी मदत करण्याचा आपल्या मनाशी ठाम निश्चय केलेला होताच.

प्रार्थना

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, अध्यात्मिक, कला-क्रीडा अशा संस्थांमध्ये

फुलासंगे मातीस वास लागे

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर माणसाच्या आयुष्यात संगतीचे महत्त्व फार मोठे असते. एखाद्या व्यक्तीचा