Tuesday, July 16, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखBEST: अचानक संप; हे ‘बेस्ट’ नव्हे...

BEST: अचानक संप; हे ‘बेस्ट’ नव्हे…

देशाची आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर हे सतत धावत असते. रेल्वेची लोकल सेवा आणि ‘बेस्ट’(BEST) ची बससेवा ह्या मुंबईच्या लाईफलाईन मानल्या जातात. तसेच या दोन्ही सेवा सर्वात सुरक्षित आणि स्वस्त म्हणजेच परवडणाऱ्या दरांत प्रवास देणाऱ्या अशा आहेत. मात्र बेस्ट(BEST) उपक्रमाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पगारवाढीसह अन्य विविध मागण्यांसाठी पुकारलेले कामबंद आंदोलन हे सलग तिसऱ्या दिवशी सुरू आहे. विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या या संपामुळे बससेवेवर मोठा परिणाम झाल्याने वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत. बेस्टच्या कंत्राटी कामगारांनी पुकारलेल्या या संपाचा फटका बेस्ट परिवहनासह चाकरमान्यांना बसला आहे. कारण सकाळी घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना कार्यालये किंवा आपापली कामाची ठिकाणे गाठण्यासाठी ‘बेस्ट’ची मोठी मदत होते, त्यात बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे चाकरमान्यांचे हाल सुरू झाले आहेत. दररोज हजारोंच्या संख्येने मुंबईकर प्रवासासाठी बेस्टलाच प्राधान्य देतात. अशात अचानकच कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. या संपात घाटकोपर, विक्रोळी, मुलुंडच्या कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले आहेत. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे बेस्ट परिवहनवर मोठा परिणाम झाला असून संपामुळे तीन दिवस नोकरदार मुंबईकरांचे हाल सुरू आहेत.

बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित आहेत. त्यात प्रमुख्याने पगारवाढीची मागणी आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना सध्या १६ हजार रुपये वेतन मिळत आहे. हे वेतन २५ हजार रुपयांपर्यंत वाढवावे, पगारवाढीसोबतच इतरही सुविधा मिळाव्यात, बेस्टचा(BEST) अर्थसंकल्प आणि पालिकेचा अर्थसंकल्प दोन्ही एकत्र करण्यात यावेत, खराब बसेस दुरुस्त होईपर्यंत त्या रस्त्यावर आणणे थांबवावे, बंद बसेस पूर्ववत सुरू करण्यात याव्यात अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या मागण्या प्रलंबित असल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन पुकारले आहे. घाटकोपर डेपोमधील साधारण २८० चालक या संपात सहभागी झाले आहेत. बेस्टमध्ये तीन कंत्राटदारांच्या बस सेवा-चालक आहेत. त्यातील एका कंत्राटदाराचा अखत्यारीत असलेल्या वेट लीज कर्मचाऱ्यांनी/चालकांनी हा संप पुकारला आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत संप सुरूच राहील असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. बेस्टच्या एकूण २७ पैकी १८ आगारांमध्ये ‘काम बंद’ आंदोलन सुरू झाले असून १,३७५ बसगाड्या आगारातच उभ्या आहेत. त्यामुळे बस स्थानक, आगारांमध्ये प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसल्या. परिणामी, कार्यालयांमध्ये पोहोचण्यासाठी विलंब होत असल्यामुळे विविध आस्थापनांमधील कर्मचारीही संतप्त झाले आहेत.

मात्र गेल्या काही दिवसांत बेस्ट(BEST) बसेसच्या दुर्घटनांमध्ये वाढ झालेली दिसत आहे. बेस्टच्या प्रतिमेला या दुर्घटना गालबोट लावणाऱ्या आहेत हे निश्चित. बस चालविणारे वाहक आणि चालक हेसुद्धा कंत्राटी कामगार आहेत. त्यामुळे दुर्घटनांची संख्या वाढत आहे. मात्र सतत दुर्घटना होत आहेत. पूर्वी वाहतूक अधिकारी हे बसची तपासणी करायचे. वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून चालक – वाहकांची आरोग्याची तपासणी व्हायची. आता तसे काहीच होत नाही. त्यामुळे अपघात वाढू लागले आहेत. बसवाहक आणि चालक यांच्यावर बेस्ट प्रशासनाचे नियंत्रण नाही. कंत्राटदारांकडून कोणतीही काळजी घेतली जात नाही. त्यामुळेच अपघात होऊ लागले आहेत. याचाही गांभीर्याने विचार व्हायला हवा.

विशेष म्हणजे मुंबईतील बेस्ट प्रशासनाने कॉन्ट्रॅक्टर्सकडून लीजवर बसेस घेतल्या आहेत. त्या कॉन्ट्रॅक्टर्सच्या बसचालकांनी संप पुकारला आहे. आता संपावर जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे आणि ह्याचा फटका थेट मुंबईकरांना बसत आहे. विशेष म्हणजे कॉन्ट्रॅक्टर्सच्या ह्या बसेस रस्त्यात बंद पडणे, त्यांची देखभाल नीट नसणे ह्या तक्रारी आहेतच. ह्या सगळ्यांवर बेस्ट प्रशासनाने कधीच कारवाई केल्याचे दिसलेले नाही आणि आता तर थेट ह्या कॉन्ट्रॅक्टर्सच्या बसचालकांनी संप पुकारला आणि मुंबईकरांना वेठीला धरले आहे. कंत्राटी कमर्चाऱ्यांमध्ये असंतोष खदखदत असल्याने हा संप होणार आहे हे ध्यानी घेऊन त्याबाबत आधीच संबंधितांशी चर्चा करून काही प्रश्नांवर तोडगा काढावा किंवा संप होऊ नये यादृष्टीने काही तयारी करावी असे बेस्ट प्रशासनाला का वाटले नाही? बेस्ट प्रशासनाला कॉन्ट्रॅक्टर्स वेठीस धरत असतील तर बेस्ट प्रशासनाची नाचक्की होत आहे ह्याचे भान प्रशासनाला असायला हवे होते.

आपल्या कर्मचाऱ्यांचा संप रोखण्यात जर कॉन्ट्रॅक्टर्सना अपयश आले असेल तर त्यांच्यावर नक्कीच कायदेशीर कारवाई करून, बेस्टला झालेल्या नुकसानीची भरपाई करून घ्यायला हवी. कारण अशा प्रकारे प्रशासनाला आणि पर्यायाने सामान्यजनांना लहान-सहान कारणांमुळे वारंवार वेठीस धरले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कॉन्ट्रॅक्टर्सबाबत आधीच कडक धोरण घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर राज्य सरकारनेही ह्यावर लक्ष ठेऊन नक्की काय पावले उचलली जात आहेत किंवा लवकरात लवकर काही तोडगा निघतो का? याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज दिसत आहे. तसेच या कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त असून बेस्ट प्रशासन, खासगी कंत्राटदार आणि राज्य सरकारसोबत चर्चा करून योग्य तो तोडगा काढण्याचा प्रयत्न करायला हवा. तसेच कर्मचाऱ्यांनीही असा अचानक संप पुकारून सर्वसामान्यांस वेठीस धरणे हे ‘बेस्ट’ नव्हे हे येथे नमूद करायलाच हवे. राज्यात आता तर ट्रिपल इंजिन सरकार आहे. त्यामुळे मुंबईकर त्रस्त असताना या अशा बाका प्रसंगांच्या वेळी या सरकारची ट्रिपल शक्ती नक्कीच दिसायला हवी.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -