
जाणून घ्या कोणते रस्ते कधी सुरु राहणार...
पुणे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी १ ऑगस्टला लोकमान्य टिळक पुरस्काराच्या निमित्ताने पुणे शहराला भेट दिल्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) पुण्याच्या दौर्यावर आहेत. आज आणि उद्याच्या दिवशी ते पुण्यात असणार आहेत. उद्या ६ ऑगस्टला पुण्यामध्ये ते केंद्रीय सहकार संस्थेने निर्माण केलेलं पोर्टल लाँच करणार आहेत. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि सहकार मंत्री देखील उपस्थित राहणार आहेत.
पिंपरी चिंचवडमधील रामकृष्ण मोरे सभागृहात अमित शहांचा हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी पुण्यातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. तसं नियोजनही पोलिसांकडून केलं जात आहे. मुख्यतः महावीर चौक, दर्शन हॉल लिंक रोड, रिव्हर व्ह्यू चौक या रस्त्यांवरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
कोणते रस्ते कधी सुरु राहणार?
महावीर चौक : महावीर चौकाकडून चिंचवडगावाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे. त्यामुळे पर्यायी मार्गावरून ही वाहने महावीर चौकाकडून खंडोबा माळ चौक येथून इच्छित स्थळी जातील.
दर्शन हॉल लिंक रोड : लिंकरोडकडून अहिंसा चौकाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. ही वाहने मोरया हॉस्पिटल चौकाकडून इच्छित स्थळी जातील.
रिव्हर व्ह्यू चौक: अहिंसा चौक बाजूकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आली असून ही वाहने या चौकाकडून वाल्हेकरवाडी, बिजलीनगरमार्गे इच्छित स्थळी जातील.
हा सर्व बदल उद्या रविवारी सकाळी आठ ते दुपारी तीन पर्यंत असणार आहे, असे पोलीस आयुक्त काकासाहेब डोळे यांनी स्पष्ट केले.