Sunday, August 31, 2025

राहुल गांधींना खासदारकी परत मिळणार!

राहुल गांधींना खासदारकी परत मिळणार!

नवी दिल्ली : मोदी आडनावाच्या मानहाणीप्रकरणी दोषी ठरवण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे राहुल गांधी यांना त्यांची खासदारकी पुन्हा मिळणार आहे.

मोदी आडनावाची मानहानी केल्याप्रकरणी राहुल गांधी यांना गुजरातच्या न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली होती. या निर्णयाच्या विरोधात राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

दरम्यान, संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून विरोधकांनी मोदी सरकारवर अविश्वास प्रस्ताव आणला आहे. अशा वेळी राहुल गांधी यांना त्यांची खासदारकी परत मिळणार असल्याने विरोधकांचा आत्मविश्वास दुणावला आहे.

१३ एप्रिल २०१९ रोजी लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान कर्नाटकात राहुल गांधी यांनी भाषण करताना मोदी आडनावाबाबत भाष्य केले होते. 'सगळ्या चोरांचं आडनाव मोदी का आहे?' असे राहुल गांधी म्हणाले होते. यावरुन भाजपचे नेते पूर्नेश मोदी यांनी सुरत कोर्टात त्यांच्या विरोधात मानहानीची तक्रार दाखल केली होती. त्याप्रकरणी सुरतमधील न्यायदंडाधिकारी न्यायालयाने मार्च महिन्यात निकाल देताना राहुल यांना दोषी ठरवले. त्यांना दोन वर्षे तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यामुळे त्यांची खासदारकी रद्द झाली होती.

Comments
Add Comment