रानकवी हरपल्याने निसर्गही नि:शब्द…

Share

सध्या पावसाने सर्वदूर हजेरी लावली असून त्याच्या येण्याने निसर्ग बहरला असून अवघी धरती हिरवा शालू परिधान करून नटली आहे. अशा रम्य वातावरणात महाराष्ट्राचे निसर्गकवी ना. धों. महानोर यांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या निधनाने साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे. ज्याला निसर्ग समजला… त्याला आयुष्याचा अर्थ उमगला… असे म्हटले जाते आणि ही बाब तंतोतंत खरी ठरविली ती कवी ना. धों. महानोर यांनी. महानोर म्हणजे महाराष्ट्राला पडलेले निसर्गस्वप्नच जणू. महानोर हे तरल निसर्ग काव्यासाठी ओळखले जायचे. आपल्या गीतांतून मातीचा गंध पेरणारे महानोर यांच्या शब्दांतूनच निसर्ग बोलतो, डोलतो आणि नाचतोही. त्यांच्या निसर्गकवितांनी आजवर महाराष्ट्राला रानभूल घातली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड खेड्यात गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या ना. धों. यांचे बालपण कष्टात गेले, पण कष्ट झेलताना त्यांचे संवेदनशील मन राना-वनांत रमले. तिथेच त्यांच्या सर्जनशीलतेला धुमारे फुटले. त्यांच्या कवितांनी रानातल्या कविता, पावसाळी कवितांनी, ‘जैत रे जैत’सारख्या अनेक चित्रपट गीतांनी मराठी माणसांच्या मनावर गारूड केले. त्यांनी मराठी साहित्याला मातीचा गंध दिला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे जीवन, ग्रामीण संस्कृतीचे वैभव त्यांनी मराठी साहित्यात आणले. ‘रानातल्या कवितां’नी वाचकांना निसर्गाची सहल घडवली. मराठवाडी बोलीतल्या ‘पानझड’, ‘तिची कहाणी’, ‘पळसखेडची गाणी’सारख्या लोकगीतांनी मराठी साहित्य समृद्ध केले. कवयित्री बहिणाबाई, बालकवींचा वारसा पुढे नेत त्यांनी साहित्यक्षेत्रात अढळ स्थान निर्माण केले.

त्यांच्या गीतांमधून-कवितांमधून निसर्गाचे खऱ्या अर्थाने दर्शन घडायचे. त्यांनी जशी निसर्गाची वर्णन करणारी गीते लिहिली, तशा ठसकेबाज लावण्याही लिहिल्या. श्रावणातल्या उन्हाचा कोवळेपणा आणि स्त्रीचा नाजूकपणा एकत्रितपणे दर्शवणारी कवी ना. धों. महानोर यांची ‘श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना’ ही आशा भोसले यांनी ‘एक होता विदूषक’ या चित्रपटासाठी गायलेली लावणी खूप लोकप्रिय झाली. आम्ही ठाकरं ठाकरं, चिंब पावसानं रान झालं आबादानी, नभ उतरू आलं, जांभूळ पिकल्या झाडाखाली, जाई जुईचा गंध, किती जीवाला राखायचं, बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती अशी एकाहून एक सर गाणी ना. धों. महानोर यांनी लिहिली.

एक किस्सा ते नेहमी सांगत. त्यांच्या ‘रानातल्या कविता’ सर्वत्र गाजत असतानाच एके दिवशी मंगेशकर कुटुंबीयांकडून त्यांची निर्मिती असलेल्या ‘जैत रे जैत’ या चित्रपटातील गाणी लिहिण्याचा प्रस्ताव त्यांच्याकडे आला. या चित्रपटाचे दिग्दर्शन जब्बार पटेल करणार होते, तर मोहन आगाशे, स्मिता पाटील असे मोठे कलाकार त्यात काम करणार होते. सिनेमाचे संगीत हृदयनाथ मंगेशकर देणार होते आणि अर्थातच गाणी लता मंगेशकर गाणार होत्या. हृदयनाथ आणि लताबाईंनी हा चित्रपट संगीतमय करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यासाठी त्यांना तब्बल १६ गाणी हवी होती. ती जबाबदारी त्यांनी महानोरांवर टाकली होती. पण दिग्गजांची नावे पाहूनच, हे आपल्याला जमणार नाही, असे सांगून महानोरांनी त्यांना नम्रपणे नकार कळवला होता. मात्र गाणी ना. धों.नीच लिहावीत यावर हृदयनाथ आणि लताबाई ठाम होत्या. मग त्यांनी महानोरांना त्यांच्या घरी ‘प्रभुकुंज’मध्ये तीन दिवस कोंडून ठेवले. तेव्हा आपल्यावरील त्या जबाबदारीच्या भानातून महानोरांनी तब्बल १६ गाणी लिहिली, जी पुढे खूप गाजली. त्यानंतर ‘एक होता विदूषक’, ‘सर्जा’ यांसह तब्बल ११ चित्रपटांसाठी त्यांनी गाणी लिहिली.

महानोर यांना बोलीभाषेचा सार्थ अभिमान होता आणि त्याची अविट गोडी त्यांनी ओळखली होती. त्यामुळेच आपल्या साहित्यात बरेचवेळा ते मराठीच्या बोलीभाषांचा वापर करीत असत. त्यामुळेच अगदी सर्वसामान्यांपर्यंत बोलीभाषांचा गंध सर्वदूर पसरला व त्यांजी गोडी कळली. त्यांच्या कवितांनी बालकवी आणि बहिणाबाईंचा वारसा समृद्ध केला. ना. धों. महानोरांचे ‘पानझड’, ‘तिची कहाणी’, ‘पळसखेडची गाणी’ म्हणजे मराठवाडी लोकगीतांचा खजिनाच म्हटला पाहिजे. आपल्या काव्यलेखनाला त्यांनी प्रत्यक्ष कृतीची जोड दिलेली दिसली. केवळ निसर्गकविता न लिहिता शेतीतले, शेतातले काही प्रयोगही यशस्वीपणे राबविले. पळसखेडला साहित्यविषयक लेखन सुरू असताना त्यांच्यातील प्रयोगशील शेतकरीही हा जागा होता. शेती, पाणी, पर्यावरण हे त्यांचे आवडीचे विषय. पळसखेडला शेतावर ते अनेक प्रयोग करत होते. लेखन सुरूच होते. अनेक नामवंत लेखक त्यांना पळसखेडला जाऊन भेटत.त्यांची पळसखेडची शेती ही साहित्यिकांचे पर्यटन स्थळ व गप्पांचा अड्डा झाला होता.

जलसंधारण, ठिबक सिंचन, फळबागा यावर महानोरांचे विशेष प्रेम होते. खरं म्हणजे ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ या संकल्पनेचे महानोर हे जनक. विधान परिषदेत दोन वेळा सदस्य राहिलेल्या महानोरांनी शेतीतील अनुभव जलसंधारण यावर शासनाला वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यांना आलेल्या अनुभवातून शेतीसाठी पाणी, सीताफळ बागेची गोष्ट, ‘या शेताने लळा लाविला’चे लेखन केले. सरकार कुठलेही असो, त्यांचे लक्ष कृषिधोरणाकडे असायचे. पंचेचाळीस वर्षांपूर्वी हजार लोकसंख्या असलेले पळसखेडे हे गाव महानोरांच्या कवितांमुळे जगाच्या नकाशावर आले. या गावाची माती आणि शेती म्हणजे त्यांचा प्राणच होता. तिचा त्यांनी कायम अभिमान बाळगला. ते कुठेही गेले तरी पळसखेड हे त्यांचे आनंदनिधान ठरले आहे. आपल्या या कर्मभूमीत त्यांनी महात्मा फुले यांच्या नावाने वाचनालय सुरू केले असून तेथील सामाजिक-सांस्कृतिक चळवळीचे ते प्रमुख केंद्र ठरले आहे. असा रानावनांत रमणारा आणि आयुष्याचा अर्थ सामान्यजनांना सहजसोप्या शब्दांत लीलया समजावून सांगणारा रानकवी हरपल्याने निसर्गही जणू नि:शब्द झाला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Recent Posts

LSG vs DC, IPL 2025: ऋषभ पंत घरच्या मैदानावर दिल्लीला रोखणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…

15 minutes ago

Heat wave: उष्णतेच्या लाटेपासून असा करा बचाव…जाणून घ्या या टिप्स

मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…

48 minutes ago

कोकण रेल्वेने प्रवास करण्याआधी हे जरूर वाचा…

कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…

1 hour ago

‘चला वाचू या! सुट्टीतील वाचनालय’, मुंबई महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम

येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…

2 hours ago

चंद्रपूर: येत्या २४ एप्रिल पर्यंत उष्णतेचा ‘येलो अलर्ट’

चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…

3 hours ago

KKR vs GT, IPL 2025: गुजरातविरुद्ध घरच्या मैदानावर कोलकत्त्याचा लाजिरवाणा पराभव

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…

10 hours ago