
जयंत पाटील यांनी विधानसभेत काढले प्रशंसोद्गार
मुंबई : ‘विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी नारायण राणे साहेब जेव्हा होते, त्यावेळी त्यांचा सभागृहात वेगळाच प्रभाव आणि दरारा होता. त्यांनी नुसते डावीकडे वळून बघितले तरीही अर्ध्या सेकंदात विरोधी पक्षातले सगळे आमदार खाली बसत होते. राणेसाहेबांचा एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास असायचा. त्यांची भाषणे सुद्धा अभ्यासपूर्ण असायची,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी गुरुवारी विधानसभेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली.
काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांची विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेता कसा असावा, हे सांगताना नारायण राणे यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. जयंत पाटील म्हणाले, राणे साहेब विरोधी पक्षनेता असताना मी राज्याचा अर्थमंत्री होतो. सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाकांवरील सदस्यांवर राणे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा मोठा प्रभाव होता. प्रत्येक विषयावर त्यांचा सखोल अभ्यास होता. त्यामुळे मंत्री म्हणून आम्हालाही त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी नीट अभ्यास करून यावा लागत होता. या सभागृहात बसून त्यांनी अनेक अभ्यासपूर्ण भाषणे केली आहेत.
अर्थसंकल्प सादर झाल्यांनतर त्यांची प्रतिक्रिया असायची, जयंत पाटील यांनी काय अर्थसंकल्प मांडला व तो सगळा कसा चुकीचा आहे, असे ते सांगत होते. त्यांची भाषणे अभ्यासपूर्ण आणि उत्कृष्ट असायची. जोरात बोलण्याची त्यांची वेगळीच ढब होती. राणे यांच्याप्रमाणेच एकनाथ खडसे देखील जोरात बोलणारे विरोधी पक्षनेते होते, अशी आठवण जयंत पाटील यांनी सभागृहात सांगितली.
नारायण राणेसाहेबांचा कोट...
जयंत पाटील म्हणाले की, ‘विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाचा संबंध नेहमी सौहार्दपूर्ण असायला पाहिजे. याचे उदाहरण त्यांनी सांगितले. ‘मी एकदा अर्थसंकल्प मांडणार होतो, क्रिकेटची मॅच ४ वाजता होती, अरुण गुजराथी सभापती होते, त्यांना विनंती केली की, मला उद्या अर्थसंकल्प लवकर म्हणजे एक किंवा दोन वाजता मांडण्याची परवानगी द्यावी, कारण ४ वाजता मॅच सुरू झाली तर अर्थसंकल्प कोणी बघणार नाही. ते म्हणाले की विरोधी पक्षनेत्यांशी बोलले पाहिजे. तेव्हा राणेसाहेबांना फोन केला. ते म्हणाले जयंत तू म्हणशील ती वेळ, पण कपडे काय घालणार ते सांग. मी म्हणालो, कपडे काय, शर्ट आणि पँट. ते म्हणाले नाही, नाही, महाराष्ट्राचा अर्थमंत्री सुटाबुटातच आला पाहिजे. आदल्या दिवशी मी माझ्या दालनात आलो, तिथे टेलर हजर. मी म्हटलं अंगाला हात लावायचा नाही, मी काही माप देणार नाही. तो म्हणाला आम्हाला साहेबांनी सांगितलेय. बळजबरीने माप घेऊन, दुसऱ्या दिवशी मी नारायण राणेसाहेबांचा कोट घालून अर्थसंकल्प मांडला.