Sunday, July 14, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखकलाकार आणि भावनिक शहाणपण...

कलाकार आणि भावनिक शहाणपण…

डॉ. राजेंद्र बर्वे: प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अतुलनीय यश संपादन करणारे कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनाने शोककळा पसरली. एक सचोटीचा कलाकार आत्महत्येसाठी का प्रवृत्त होतो याचे अवलोकन होणे ही काळाची गरज आहे. सिनेसृष्टीमधील वाढते तणाव आज अनेक कलाकारांच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम करत आहेत. कलाकारांच्या आत्महत्यांच्या वाढत्या घटनांमागील कारणे आणि उपाययोजनांचा हा आढावा…

नुकत्याच समोर आलेल्या नितीन देसाई यांच्या दुःखद निधनाच्या वृत्ताने काही समस्यांवर विचार करण्यास भाग पाडले. मराठी आणि हिंदी अशा दोन्ही चित्रपटसृष्टींमध्ये नाव कमावणाऱ्या कलाकाराला आत्महत्येसारखे पाऊल उचलावेसे वाटणे ही खिन्न करणारी बाब आहे. पडद्यावरील कलाकारांचे भावविश्व आपल्याला वरकरणी परिचित असते. पण पडद्यामागील कलाकारांच्या मानसिक हिंदोळ्यांचा आढावा घेताना अनेकविध बाबी समोर येतात. कलाकाराचे आयुष्य उत्तेजक घटनांनी ओतप्रोत भरलेले असते. कलाकार मंडळी कोणत्याही घटनेशी भावनिकरीत्या वेगाने जोडली जातात. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे पडसाद कलाकारावर अधिक तीव्रतेने उमटतात. पडद्यावरील कलाकार असो वा पडद्यामागचा कलाकार असो, कलाकृतीचा गाभा जाणूनच काम करावे लागते. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी कौशल्यांचा कस लागतो तसाच भावनांचाही कस लागतो. मुळातच अधिक भावनिक असल्यामुळे कलाकृतीचा गाभा गाठणे कलाकारांना सोपे जाते. कलाकारांच्या मानसिक स्वास्थ्यावर याचा कळत-नकळत परिणाम होत असतो. पण भावनिक तीव्रता अधिक असली तरी कलाकारांचे ‘इमोशनल इंटेलिजन्स’ कमी असते. कलाकारांच्या भावनिक आलेखाचा अभ्यास केल्यावर हे समोर येते. इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे भावना ओळखून, त्यांची तीव्रता जाणून योग्य प्रकारे केलेले अवलोकन. आपल्या मनात एखादा विचार आल्यावर त्यामागचे समर्पक कारण शोधण्यासाठी ‘इमोशनल कोशंट’ महत्त्वाचा असतो. कलाकारांमध्ये हा इमोशनल कोशंट थोडा कमी आढळतो. भावनांचे सूज्ञपणे अवलोकन करण्याच्या ताकदीपेक्षा कलाकार भावनाप्रधानतेला जास्त आपलेसे करतात.

कलाकारांच्या भावनांची तीव्रता इतर माणसांपेक्षा अधिक असते. कलाकारांमध्ये काम करण्याची जिगर प्रचंड असते. कलाक्षेत्रात टिकून राहण्यासाठी ही जिगर गरजेचीही असते. पण त्यामुळे येणारा तणावही तितक्याच ताकदीचा असतो. इतर क्षेत्रांमध्येही कामाच्या तणावाचे प्रमाण दखलपात्र असते; पण ऑफिसमधून बाहेर पडल्यावर, लॅपटॉप बंद केल्यावर या क्षेत्रातील लोकांना कामापासून विलग होता येते. या क्षेत्रामधील कामाचे स्वरूप भावनारहित असल्यामुळे तणावाचे स्वरूपही वेगळे असल्याचे जाणवते. याउलट, कलाकार एखाद्या कलाकृतीसाठी अभ्यास करताना भावनिकरीत्या झोकून देतात. कलाकृतीशी एकरूप व्हायचा प्रयत्न करतात. त्याचा एक परिणाम म्हणून आपल्यासमोर अत्यंत प्रभावी कलाकृती उभ्या राहतात. पण दुसऱ्या बाजूला सबकॉन्शियसली कलाकारांवर प्रत्येक कलाकृतीचा चांगला-वाईट परिणाम होत असतो. कारण भावना तीव्र होत जातात तशा अधिक अस्थिर होत जातात. त्यामुळे भावनाप्रधान कलाकारांनी भावनिक स्थैर्यासाठी प्रयत्नशील राहायला हवे.

कलाकारांच्या मानसिक अस्थैर्यामागे आणखी एक गोष्ट महत्त्वाची असल्याचे जाणवते. कलाकार कलाकृतीच्या बाबतीत, पात्राच्या बाबतीत, इतर कलाकारांप्रती अतिशय संवेदनशील असतात. पण हीच संवेदनशीलता स्वतःसाठी दाखवत नाहीत. अनेक कलाकार ‘कितीही संकटे आली तरी बिनधास्त सामना करू शकतो’ हे पालुपद मिरवण्याच्या आहारी जातात. याउलट, समस्यांनी ग्रासलेले असण्यात काही गैर नाही, हे समजून कलाकारांनी बोलते व्हायला हवे. खरे तर सामान्य माणसांसाठीसुद्धा बोलते होणे ही अतिशय अवघड बाब असते. स्वाभाविकच, स्वतःच्या इमेजला जपणारे कलाकार तर मोकळे होण्यासाठी अधिक कचरतात. सामान्य जनतेसमोर असणाऱ्या इमेजला धक्का पोहोचेल असे मानून कलाकार मन मोकळे करत नाहीत. अनेक भावनिक, आर्थिक समस्या मनात दाबून ठेवल्यामुळे एके दिवशी त्यांचा डोंगर तयार होतो. साहजिकच समस्येशी दोन हात करण्याची ताकद कमी होते. अशा वेळी समस्यांविषयी बोलल्याने भार हलका होऊ शकतो, हे समजून घ्यायला हवे.

मध्यंतरी दीपिका पदुकोण हिने असा प्रयत्न केला होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून आयुष्यातील समस्यांविषयी ती मोकळेपणाने बोलली होती. हे कृत्य तिला साहजिकच अवघड गेले, पण तिला चाहत्यांचा, आप्तेष्टांचा पाठिंबा मिळाला. तेव्हा तिने एक महत्त्वाची बाब निदर्शनाला आणून दिली. एखाद्या कलाकाराच्या दुर्दैवी मृत्यूनंतर ‘त्याने मन मोकळे करायला पाहिजे होते’ अशी वक्तव्य केली जातात. पण अशी विधाने करण्याऐवजी स्वतःहून सहकलाकारांची चौकशी करण्याच्या महत्त्वाबद्दल ती बोलली होती. एकदा-दोनदा विचारपूस केल्यावर फक्त कलाकारच काय, इतरही कोणी समस्यांविषयी चर्चा करत नाही. त्यामुळे सातत्याने विचारपूस करत राहा. एकदा विचारपूस केल्यावर जबाबदारी संपल्याच्या आविर्भावात राहू नका. ‘आस्क अगेन अँड अगेन अँड अगेन’ अशा आशयाचे आवाहन तिने केले होते. स्वतःसोबत सहकलाकारांच्याही मानसिक स्वास्थ्याची जबाबदारी घेता यायला हवी, हेदेखील तिच्या वक्तव्यामधून स्पष्ट होते. याचीच दुसरी बाजूही विचारात घेण्यासारखी आहे. कलाकारांभोवती असलेल्या वलयामुळे विश्वासार्ह मित्रपरिवार लाभायला बराच वेळ लागतो. अनेकदा एखाद्या कलाकाराला बोलायची इच्छा असली तरी आजूबाजूला विश्वासार्ह व्यक्ती नसतात. यावर तोडगा काढणे अवघड असले तरी अशक्य नाही. कलाकारांनी मानसशास्त्रज्ञांची मदत घेणे विचारात घ्यायला हवे.

फक्त कलाकारांच्या मानसिक आरोग्यासाठी प्रयत्नशील संस्थांचा उदय व्हायला हवा. भावनिक आणि आर्थिक समस्यांमुळे वाढणारा तणाव आटोक्यात आणण्यासाठी एखादी संस्था कार्यरत असेल तर फायदेशीर ठरेल. मात्र अशा संस्थांना, कलाकारांची ओळख आणि समस्या जनतेसमोर येणार नाहीत, यासाठी खबरदारी घ्यावी लागेल. कलाकारांना असा मदतीचा हात मिळाला, तर आत्महत्येचे प्रमाण नक्कीच कमी होईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -