Tuesday, April 29, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

'अखेर पावसाळ्यातच हा वृक्ष उन्मळून पडला'

'अखेर पावसाळ्यातच हा वृक्ष उन्मळून पडला'

शरद पवारांकडून ना. धों. महानोर यांना श्रद्धांजली

मुंबई : ज्येष्ठ कवी साहित्यिक ना. धों. महानोर यांचे आज पुण्यात निधन झाले. त्यांच्या निधनामुळे साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे. राजकीय क्षेत्रातील नेत्यांनीही त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार महानोर यांच्या निधनाने व्यथित झाले आहेत. त्यांनी अत्यंत भावपूर्ण शब्दांत या निसर्गकवीला श्रद्धांजली वाहिली.

"माझे जवळचे मित्र आणि महाराष्ट्राचा रानकवी ना. धो. महानोर यांच्या निधनाने मला अतिशय दुःख झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड खेड्यात गरीब शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या ना. धों. चे बालपण कष्टात गेले, पण कष्ट झेलताना त्यांचे संवेदनशील मन रानात रमले. तिथेच त्यांच्या सर्जनशीलतेला धुमारे फुटले. ना. धो. च्या कवितांनी रानातल्या कविता, पावसाळी कवितांनी, जैत रे जैत सारख्या अनेक चित्रपट गीतांनी मराठी माणसांच्या मनावर गारूड केले. ना. धों ची विधान परिषदेतील भाषणे देखील माणसाच्या काळजाचा ठाव घेत. ना. धो. खूपच हळवे, त्यात पत्नीच्या निधनाने ते आणखी खचले. मी, प्रतिभा त्यांच्या खचलेल्या मनाला उभारी देत राहिलो. पण अखेर हा वृक्ष उन्मळून पडला. ना. धो. चे निधन देखील पावसाळ्याच्या दिवसांत व्हावा हा योग मनाला चटका लाऊन जाणारा आहे. मी आणि माझ्या कुटूंबांतर्फे या मृदू मनाच्या निसर्ग कवीला श्रद्धांजली अर्पण करतो.”, असे ट्विट करत शरद पवार यांनी महानोर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
 
Comments
Add Comment