
मुंबई : बोरिवली येथील राजेंद्र नगरमधील एकता भूमी या उच्चभ्रू इमारतीत ७८ वर्षीय ज्येष्ठ महिलेचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळून आला आहे. त्या घरात आजारी पती सोबत राहत होत्या. या प्रकरणी कस्तुरबा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. सुलोचना भास्कर शेट्टी असे मयत महिलेचे नाव आहे.
एकता भूमी या इमारतीच्या के विंग मधील पाचव्या मजल्यावरील सुलोचना यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याची तक्रार येथील रहिवाशांनी केली. ही माहिती मिळताच बोरिवली पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी त्यांच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला तेव्हा सुलोचना यांचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळला आणि त्यांचे पती आजारी स्थितीत आढळून आले.
सुलोचना यांना मुलगी असून तिला कळविल्याचे पोलिसांनी सांगितले. सुलोचना भास्कर यांचा मृत्यू दोन दिवसांपूर्वी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यांच्या अंगावर काहीही खूना नसल्यामुळे त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. फ्लॅटमध्येही काही संशयास्पद वस्तू आढळून आलेल्या नाही. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनाच्या अहवालानंतर स्पष्ट होईल, असेही पोलिसांनी म्हटले आहे. याप्रकरणी कस्तुरबा पोलीस अधिक तपास करत आहेत.