मराठी चित्रपटसृष्टी नव्हे, तर बॉलिवूडच्या दुनियेत स्वत:चा वेगळा ठसा उमटविणाऱ्या सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई(Nitin Desai) यांची अशी एक्झिट अपेक्षित नव्हती. त्यांनी आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली. कलाक्षेत्रात स्वतःच्या हिमतीवर आपली ओळख निर्माण केली होती. त्यांच्या कलादिग्दर्शनामुळे अनेक चित्रकलाकृतींनी वेगळी उंची गाठली. त्यांचा कलाकृतीला स्पर्श म्हणजे मिडास स्पर्श होता. असा हा हरहुन्नरी कलावंत आपल्याला अचानक सोडून जाईल, अशी कल्पनाही कोणीही केली नव्हती. मात्र त्यांच्या आत्महत्येमुळे चित्रपटसृष्टीसह सर्वच क्षेत्रांत शोककळा पसरली. हिंदी चित्रपटसृष्टी आणि कलेच्या क्षेत्रात नितीन देसाईंसारख्या मराठी तरुणाने आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले, याचा महाराष्ट्राला अभिमान होता.
हिंदी चित्रपटसृष्टीसारख्या झगमगाटात राहूनही विनम्र स्वभाव आणि त्यांचे वागणे साधे अनेकांना भावत होते. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी सर्जनशीलतेची छाप उमटवणाऱ्या नितीन देसाईंच्या जाण्याने भारतीय कलासृष्टीचे अन् महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. नितीन देसाई(Nitin Desai) यांनी २००५ मध्ये मुंबईलगतच्या कर्जत येथे ५२ एकर (२१ हेक्टर) परिसरात एनडी स्टुडिओ उभारला होता. सध्या ते आर्थिक अडचणीत होते आणि त्यांच्या कर्जतमधल्या एनडी स्टुडिओवर जप्तीच्या कारवाईची शक्यता होती, असे बोलले जात होते. देसाई यांनीवित्तीय संस्थेकडून १८० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते; परंतु कर्जाची वसुली होत नव्हती. त्यामुळे ते कर्ज २४९ कोटी रुपयांवर गेले होते. आर्थिक अडचणींचा सामना करावा लागल्याने त्यांच्या आत्महत्या मागचे कारण असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
नितीन देसाई यांचा जन्म कोकणातील दापोलीतील एका मराठी मध्यमवर्गीय घरात झाला होता. त्यांनी मुंबईतील जे. जे. स्कूलमधून फोटोग्राफीचे शिक्षण घेतले होते. एकदा ते चित्रपटाच्या सेटवर गेले आणि ते त्या क्षेत्राच्या प्रेमात पडले. कलादिग्दर्शक, प्रॉडक्शन डिझायनर, निर्माता असा त्यांचा प्रवास थक्क करणारा होता. अनेक चित्रपटांच्या निर्मितीत त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. १९८७ सालापासून त्यांची सिनेमा कारकीर्द सुरू झाली. ‘१९४२ अ लव्ह स्टोरी’ या सिनेमामुळे ते खऱ्या अर्थाने चर्चेत आले होते. त्यानंतर ‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’, ‘लगान’, ‘जोधा अकबर’, ‘प्रेम रतन धन पायो’ यांसारख्या सिनेमांचे त्यांनी कला दिग्दर्शन केले होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक हिंदी, मराठी चित्रपटांमध्ये, इतिहासकालीन मालिकांमध्ये कलादिग्दर्शनाचे काम केले आहे.
भव्यदिव्य सेट, अनोखे कलादिग्दर्शन यासाठी त्यांची ओळख निर्माण झाली होती. मुंबईतल्या प्रसिद्ध लालबाग राजा गणपतीचा देखावा ते साकारायचे. त्यांच्या उत्तुंग कारकिर्दीमध्ये त्यांना चार वेळा सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता, तर ३ वेळा सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शनाचा फिल्मफेअर पुरस्कार त्यांच्या नावावर आहे. ‘तमस’ या दूरदर्शनवरच्या मालिकेपासून त्यांचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर त्यांनी चाणक्य मालिकेसाठी कला दिग्दर्शन केले होते. ‘१९४२ अ लव्ह स्टोरी’ या चित्रपटाने त्यांना खऱ्या अर्थाने ब्रेक दिला आणि त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. मराठमोळ्या माणसाने जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून शिक्षण घेऊन आपल्या उपजत प्रतिभेच्या जोरावर बॉलिवूडच्या कलादिग्दर्शनाच्या विश्वात मोठे नाव कमावले, हे कौतुकास्पद वाटत होते. किंबहुना चित्रपटाच्या निर्मितीत आणि यशात कलादिग्दर्शनाचा वाटा किती मोठा असतो हे त्यांनी जगासमोर आणले. त्यांच्या या प्रवासाबद्दल सह्याद्रीला त्यांनी एक मुलाखत दिली होती. त्यातून त्यांनी मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातील आठवणी आणि सांगितलेले किस्से कायम लक्षात राहणारे आहेत. “मी ज्या घरात मोठा झालो, त्यावेळी सगळ्यांना वाटायचे की, आपल्या पोरांनी इंजिनीअर, डॉक्टर व्हावे. त्या काळात कला क्षेत्रात आणि त्यातही चित्रपट क्षेत्रात जायचे म्हणजे एक मोठे आव्हान होते. मात्र माझ्या आई-वडिलांनी मला पाठिंबा दिला. बीडीडी चाळीत लहानाचा मोठा झालो.” ही त्यातील एक आठवण.
आपल्या कर्तृत्वाचा आलेख वाढवत प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाही पाय जमिनीवर ठेवणाऱ्या या माणसाचा मराठीजनांनाही अभिमान वाटत होता. देसाईंनी कर्जतच्या ज्या स्टुडिओत एकाहून एक सरस भव्यदिव्य सेट उभारले, तिथेच त्यांनी मृत्यूला जवळ करून आपला जीवनप्रवास संपवला. सध्या त्यांनी एवढे टोकाचे पाऊल का उचलले? याचा तपास केला जात आहे. त्यांनी एकाएकी स्वतःला असे का संपविले माहीत नाही; परंतु लोक कष्टाने, स्वयंप्रतिभेने स्वतःचे असे एक विश्व निर्माण करतात. पैसा, प्रसिद्धी त्यांच्या पायाशी लोळण घेते. पण एवढे सर्व ऐश्वर्य, वैभव प्राप्त झाल्यानंतर एकाएकी जगाचा निरोप घेतात, हे खरेच अनाकलनीय आहे.






