पुणे : ज्येष्ठ साहित्यिक व कवी नामदेव धोंडो महानोर यांचे आज सकाळी निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते. गेल्या काही दिवसांपासुन ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते. प्रकृती ढासळल्याने ते व्हेंटिलेटरवर होते. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्य विश्वातून शोक व्यक्त केला जात आहे.
महानोर यांनी काव्यसंग्रहांबरोबरच अनेक चित्रपटांसाठीही गीते लिहिली. त्यांच्या या गीतांना त्यांच्या कवितांप्रमाणेच मराठी प्रेक्षकांची पसंती मिळाली. शुक्रवारी पळसखेड या त्यांच्या गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसस्कार करण्यात येणार आहेत.
महानोरांचा जन्म १६ सप्टेंबर १९४२ रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेडच्या शेतकरी कुटुंबात झाला. आई-वडील दुसऱ्याच्या शेतात राबत असत. महानोरांना चार भाऊ आणि तीन बहिणी. महानोर सगळ्यांत थोरले. पळसखेडला प्राथमिक शिक्षण झालं. पुढे वयाच्या दहाव्या वर्षी पुढील शिक्षणासाठी ते ८-१० कि.मी. अंतरावर असलेल्या शेंदुर्णीच्या शाळेत दाखल झाले.
शेंदुर्णीच्या शाळेतच त्यांची कवितेशी सुरुवातीला ओळख झाली. आणि त्यांना कवितेची गोडी लागली. शाळेत असताना शाळेच्या नाटकांमधून त्यांनी कामं केली. मॅट्रिक झाल्यानंतर महानोर जळगावच्या मूळजी जेठा महाविद्यालयात आर्ट्स शाखेत दाखल झाले. परंतु घरातल्या अडचणींमुळे वर्ष पूर्ण होण्याच्या आतच शिक्षण सोडून त्यांना गावी जाणं भाग पडलं. त्यांच्या वडिलांनी स्वत:ची पाच एकर कोरडवाहू जमीन विकत घेतली होती आणि शेतीच्या कामांसाठी वडिलांना मुलाची गरज होती.
महानोरांचं शिक्षण थांबलं आणि ते शेतीत रमले. पण याच शेतीने अथवा निसर्गाने त्यांच्यातला कवीला प्रेरणा दिली. ना. धों. यांच्या अद्भुत निसर्गकवितांनी वाचक-रसिकांना वेड लावलं आहे.
ना.धों. महानोर यांच्या कविता इतक्या बोलक्या होत्या की, ते निसर्गाशी संवाद साधत आहेत आणि त्याच कागदावर उमटवत आहेत असा भास व्हायचा.
ना. धो. महानोर यांनी आपल्या साहित्यात काहीवेळा बोलीभाषांचा वापर केला आहे. गेली ६० वर्षाहून अधिक काळापासुन साहित्यक्षेत्रात कार्यरत होते. मराठी काव्यविश्वात निसर्गकवी म्हणून महानोरांना ओळखले जाते. महानोर यांच्या कवितांनी बालकवी व बहिणाबाईंचा वारसा समृद्ध केला.
ना. धों. महानोर यांचे अनेक कवितासंग्रह वाचकांच्या पसंतीस उतरले. त्यात अजिंठा या दीर्घ काव्यसंग्रहाचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. त्याचबरोबर गंगा वाहू दे निर्मळ, जगाला प्रेम अर्पावे, दिवेलागणीची वेळ, पावसाळी कविता, रानातल्या कविता असे त्यांचे कवितासंग्रह लोकप्रिय ठरले. यासह गपसप, गावातल्या गोष्टी हे कथासंग्रह देखील वाचकांच्या पसंतीस उतरले.