एकदा अकोला येथील शिवजयंतीच्या उत्सवाकरिता बाळ गंगाधर टिळक यांना बोलावणे केले गेले. त्या काळात स्वातंत्र्याची चळवळ जोर धरू लागली होती. लोकमान्य टिळक हे जहाल मतवादी होते. त्यामुळे त्यांची व्याख्याने ही राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत असा जाज्वल्य तेजाचा हुंकार असत. संत कवी दासगणू महाराजांनी कमी शब्दांत पण अत्यंत समर्पक असे टिळकांचे वर्णन केले आहे :
टिळक बाळ गंगाधर ।
महाराष्ट्राचा कोहिनूर ।
दूरदृष्टीचा सागर ।
राजकारणी प्रवीण जो ।। १०।।
निज स्वातंत्र्यासाठी ।
ज्याने केल्या अनंत खटपटी ।
ज्याची धडाडी असे मोठी ।
काय वर्णन तिचे करू ।। ११।।
करारी भिष्मासमान ।
आर्य महीचे पाहून दैन्य ।
सतीचे झाला घेता वाण ।
भीड न सत्यात कोणाची ।।१२।।
तर अशा या टिळकांनी शिवजयंती उत्सवाकरिता अकोल्यास येण्याची अनुमती दिली. त्यामुळे अकोल्यात चैतन्य आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. उत्सवाची तयारी सुरू झाली. टिळक येणार म्हणून मोठमोठाल्या विद्वानांची गडबड उडून गेली. विदर्भ प्रांतामधील महत्त्वाच्या व्यक्ती जसे दामले, कोल्हटकर, अमरावतीचे खापर्डे आणि असेच बडे बडे विद्वान अकोल्यात जमले. टिळकांचे व्याख्यान ऐकावयास मिळणार म्हणून अवघी वऱ्हाडी मंडळी आनंदून गेली होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष निवडले. स्वयंसेवक तयार झाले. कशी लोकांचे असे मत पडले की, या कार्यक्रमाला शेगवीच्या श्री गजानन महाराजांना आणावे म्हणजे दुधात साखर पडेल. ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांच्या राष्ट्रोद्धाराला समर्थांचा आशीर्वाद होता. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला गजानन महाराजांचे आशीर्वाद लाभू देत. ही सूचना अनेकांना पसंत पडली. पण काही लोकांना नाही आवडली. ते लोक उघड उघड बोलले की, “तो शेगावच्या अवलिया इथे काढला आणता. तो काहीतरी करून सभेचा विक्षेप करील. एखादे वेळी लोकमान्यांना मारेल.” यावर काही लोक म्हणाले, “हे म्हणणे योग्य नाही. गजानन महाराजांची पाऊले सभेला लागलीच पाहिजेत. त्यांचे जे वेडेपण आहे ते वेड्याकरिता आहे. जेवकोनी विद्वान सज्जन आहेत त्यांच्यासोबत वेड्यासारखे नाहीत बोलत ते.” काही मंडळी शेगाव येथे महाराजांना सभेचे आमंत्रण देण्याकरिता आली. ते तिथे येताच दादा खापर्डे यांना महाराज म्हणाले, “आम्ही तुमच्या शिवाजी उत्सवाच्या सभेला येऊ. एका जागी बसून मौन धरू. आम्ही सुधारकांचा कधीच मनोभंग करणार नाही. टिळक हेच राष्ट्रोद्धार करण्याकरिता योग्य आहेत. असे राष्ट्रपुरुष पुन्हा होणे नाही. टिळक आणि त्यांचे स्नेही अण्णा पटवर्धन या दोघांना पाहण्याकरिता आम्ही नक्की अकोल्यास येऊ.” महाराजांचे असे बोलणे ऐकताच खापर्डे यांना खूप आनंद वाटला. श्री महाराजांना वंदन करून ते आकोल्यास परत आले. शके अठराशे तीस वैशाख मासात अक्षय्य तृतीया या तिथीला वऱ्हाड प्रांतात अकोला येथे ही सभा होती. टिळकांना पाहण्याकरिता तसेच श्री गजानन महाराज सभेला येणार म्हणून लोकांना माहिती मिळाल्यामुळे मंडपात प्रचंड गर्दी झाली होती.
लोक विचार करत होते की, महाराज अजून कसे आले नाहीत? पण महाराज सभा सुरू होण्यापूर्वीच मंडपात येऊन बसले होते. सभेत महाराजांना उच्चासन देण्यात आले होते. महाराज गादीवर लोडाला टेकून विराजमान झाले होते. सिंहासनाच्या अग्रभागी टिळकांची बैठक लावली होती. त्यांचे बाजूलाच त्यांचे स्नेही अण्णासाहेब पटवर्धन हे बसले होते. गणेश श्रीकृष्ण खापर्डे हे टिळकांच्या एका बाजूला बसले होते. खापर्डे यांच्या जवळच दामले, कोल्हटकर, भावे, व्यंकटराव देसाई ही सभेची पुढारी मंडळी बसली होती. तसेच अजूनही काही विद्वान व्याख्याते बसले होते. सभा सुरू झाली. टिळक बोलण्याकरिता उठले आणि त्यांनी व्याख्यान देण्यास सुरुवात केली.
सुरुवातीला ते म्हणाले, “आजचा दिवस धन्य आहे. स्वातंत्र्याकरिता ज्यांनी आपले प्राण खर्च केले अशा विर धनुर्धर योद्ध्याची आज जयंती आहे. याकरिता आपण इथे जमलो आहोत. रामदास स्वामींनी त्यांना हाताशी धरले. तद्वतच आज आपल्या सभेला श्री गजानन महाराज आशीर्वाद देण्याकरिता आले आहेत. त्याच्या आशीर्वादाने आपली सभा यशस्वी होवो. सांप्रत अशाच सभेची राष्ट्राला जरुरी आहे. स्वातंत्र्यसूर्य मावळला आहे. राष्ट्रात सध्या दास्यत्वाचा काळोख पसरलेला आहे. ज्या समाजाला (लोकांना) स्वातंत्र्यच उरले नाही, असा समाज मृतवतच आहे. यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. ज्या शिक्षणामुळे राष्ट्रप्रेम वाढेल असे शिक्षण दिले गेले पाहिजे. असे शिक्षण हा भूपती (राजा, म्हणजेच इंग्रज) मुलांना देईल का? असे टिळकांनी म्हणताच महाराज उठून उभे राहिले आणि त्रिवार “नाही नाही नाही” असे गर्जून बोलले.
आवेशाच्या भरात टिळक जे बोलले ते राजाला किंचित बोचणारे, टोचून बोलणे होते. समर्थांनी त्या भाषणाचा रोख जाणला आणि असे बोलले “अरे अशानेच दोन्ही दंडात काढण्या पडतात.” असे बोलून महाराज “गण गण गणात बोते” असे भजन करू लागले. सभा निर्विघ्नपणे पार पडली. टिळकांची वाहवा झाली. त्याच वेळी समर्थांचे भाकित खरे ठरले. इंग्रज सरकारने टिळकांना एकशे चोवीस कलमाखाली अटक केली आणि टिळकांवर शिक्षेचा प्रसंग आला.
क्रमशः
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…