Wednesday, March 26, 2025
Homeताज्या घडामोडीBest Strike : सलग दुसऱ्या दिवशी 'बेस्ट'च्या कंत्राटी कामगारांचा संप सुरूच

Best Strike : सलग दुसऱ्या दिवशी ‘बेस्ट’च्या कंत्राटी कामगारांचा संप सुरूच

घाटकोपर डेपोतून सुरू झालेल्या कंत्राटी कामगारांच्या संपाचे लोण वाढले
देवनार, मुलुंड, मुंबई सेंट्रल, मागाठाणे, गोराई, शिवाजी नगर, बॅकबे ,प्रतीक्षा नगर, धारावी, सांताक्रुज आणि मजास या आगारांमधील कंत्राटी चालकही आज संपावर
बेस्टच्या संपात नऊ हजार कंत्राटी कर्मचारी

मुंबई : बेस्टच्या घाटकोपर डेपोमधील कंत्राटी चालक सलग दुसऱ्या दिवशी संपावर गेले आहेत. पगारवाढ, सुविधा, ओव्हर टाईम अशा विविध मागण्यांसाठी त्यांनी हा संप पुकारला आहे. हा संप आता अनेक आगारांमध्ये पसरला असून तब्बल नऊ हजार कंत्राटी कर्मचारी बेस्टच्या संपात सहभागी झाले आहेत. देवनार, मुलुंड, मुंबई सेंट्रल, मागाठाणे, गोराई, शिवाजी नगर, बॅकबे ,प्रतीक्षा नगर, धारावी, सांताक्रुज आणि मजास या आगारांमधील कंत्राटी चालकही आज संपावर गेले आहेत. याचा फटका मात्र सर्वसामान्य मुंबईकरांना बसतो आहे.

पगारवाढ आणि बेस्टच्या सुविधा अशा विविध सुविधा देण्यासाठी प्रज्ञा खजुरकर या सहकुटुंब आझाद मैदानात उपोषणाला बसल्या आहेत. त्यांना समर्थन देण्यासाठी आणि आझाद मैदानात त्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी हे कंत्राटी कामगार संपावर गेले आहेत. आपल्या मागण्यांवर हे सर्व कर्मचारी ठाम आहेत, तसेच जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत हा संप सुरुच राहिल, असा आक्रमक पवित्राही कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.

सध्या बेस्टमध्ये सुमारे नऊ हजार कंत्राटी कर्मचारी आहेत. हे नऊ हजार कर्मचारी संपावर असल्याचा दावा कर्मचारी संस्थेने केला आहे. यामध्ये एसएमटी एटीपीएल असोसिएटचे दोन हजार कंत्राटी कर्मचारी, मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्टचे तीन हजार कंत्राटी कर्मचारी, हंसा ग्रुपचे दीड हजार, टीएमएल ग्रुपचे दोन हजार, ओलेक्ट्रा ग्रुपचे ५०० इतके खासगी कंत्राटी कर्मचारी आहेत.

याआधीही कर्मचाऱ्यांनी अनेक वेळा आंदोलन केले आहे. प्रशासनाने आपला आर्थिक भार कमी करण्यासाठी बस आणि चालकांची कंत्राटदारांकडून नियुक्ती केली आहे. या कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये मागील काही महिन्यांपासून असंतोष निर्माण झाला आहे. यामध्ये वेळेवर पगार न होणे, नियुक्तीपत्र न देणे आदींसारखे मुद्दे आहेत. सलग दोन दिवस काम बंद आंदोलन सुरू असल्याने मुंबईकर प्रवाशांची गैरसोय होत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -