Sunday, March 23, 2025
Homeताज्या घडामोडीसुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांना मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली!

सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांना मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली!

मुंबई : सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी कर्जतमधील एनडी स्टुडीओमध्ये गळफास घेत वयाच्या ५८व्या वर्षी आयुष्य संपवले. देसाईंच्या आत्महत्येने हिंदी आणि मराठी सिनेसृष्टी हादरली आहे. नितीन देसाई हे लोकप्रिय कलादिग्दर्शक, निर्माता दिग्दर्शक आणि अभिनेते देखील होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते महाराष्ट्रातील सर्व राजकारण्यांपर्यंत नितीन देसाई यांचे चांगले संबंध होते. नितीन देसाई यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्यक्तिगत संबंध होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा पहिल्यांदा मुंबईत आले होते तेव्हा कमळातून मोदींना भाजपाच्या कार्यकत्यांसमोर पेश केलं गेलं होतं. ती कल्पनाही नितीन देसाई यांची होती. त्यानंतर नरेंद्र मोदी नितीन देसाई यांच्या प्रेमातच पडले.

संवेदनशील प्रतिभावंत आपण गमावला – मुख्यमंत्री

ख्यातनाम कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांचा अकस्मात मृत्यू वेदनादायी आहे. त्यांच्या जाण्याने एक व्यापक कलादृष्टी असलेला संवेदनशील प्रतिभावंत आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. ‘कला क्षेत्रात नितीन यांनी स्वतःच्या हिंमतीवर ओळख निर्माण केली. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी सर्जनशीलतेची छाप उमटवणा-या नितीन यांची अशी एक्झिट अपेक्षित नव्हती. त्यांच्या जाण्याने देसाई कुटुंबींयावर आघात झाला आहे. त्यांना हा आघात सहन करण्याची ताकद मिळावी. नितीन देसाई यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असे ही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

अनाकलनीय, अविश्वसनीय, मनाला चटका लावणारं, ऐकून धक्का बसला – अजित पवार

“कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्येची बातमी ऐकून धक्का बसला. महाराष्ट्राच्या कला, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेकांशी निकटचे, मित्रत्वाचे संबंध असलेल्या नितीन देसाईंचं अशा पद्धतीनं अचानक निघून जाणं अनाकलनीय, अविश्वसनीय, मनाला चटका लावणारं आहे. नितीन देसाई कलादिग्दर्शनाच्या क्षेत्रात सर्वोच्चस्थानी होते. कलादिग्दर्शक असण्याबरोबरंच निर्माता, दिग्दर्शक, अभिनेते म्हणूनही त्यांनी कर्तृत्वाचा ठसा उमटवला होता. महाराष्ट्र शासनाच्या प्रत्येक उपक्रमाला त्यांचं मनापासूनचं सहकार्य असायचं. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या सुवर्णममहोत्सवाच्या आयोजनात त्यांनी सर्वस्व झोकून काम केलं. प्रजासत्ताकदिनी कर्तव्यपथावर होणा-या संचालनात महाराष्ट्राचा चित्ररथ तयार करण्यात त्यांची नेहमीच मदत व्हायची. हिन्दी चित्रपटसृष्टीसारख्या झगमगाटात राहूनही त्यांचं वागणं साधं, विनम्र होतं. त्यांच्या निधनानं भारतीय कलासृष्टीचं, महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं आहे. मी नितीन देसाईंच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, अशी प्रार्थना करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नितीन देसाई यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली आहे.

नितीन देसाई यांची एक्झिट चटका लावणारी – राज्यपाल

नितीन देसाई महाराष्ट्र आणि देशातील उत्तुंग प्रतिभा लाभलेले कला दिग्दर्शक होते. त्यांची विचारशक्ती आणि कल्पनेला मूर्त रुप देण्याची क्षमता अफाट होती. अनेक चित्रपट, महानाट्य व कॉर्पोरेट इव्हेंट्सच्या वेळी त्यांनी साकारलेले भव्य – दिव्य नेपथ्य व कला सजावट थक्क करणारी होती. मोठे स्वप्न पाहण्याचा व ते साकार करण्यासाठी झटण्याचा संदेश त्यांनी युवा पिढीला दिला. नितीन देसाई यांची एक्झिट सर्वांनाच चटका लावणारी आहे, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

हरहुन्नरी कलावंत अचानक जाईल, अशी कल्पनाही नव्हती – फडणवीस

प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या अकस्मात मृत्यूचे वृत्त अतिशय दुःखद आहे. चित्रपट आणि कला क्षेत्रात त्यांनी अतिशय बहुमूल्य योगदान दिले आणि त्यासाठी अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवान्वित करण्यात आले होते, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली. मी मुख्यमंत्री असताना मरीन लाईन्स येथे आयोजित ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ कार्यक्रम व्यवस्थेचे त्यांनी यशस्वी संयोजन केले होते. त्यांच्या कला दिग्दर्शनामुळे अनेक चित्रकलाकृतींनी वेगळी उंची गाठली. त्यांचा कलाकृतीला स्पर्श म्हणजे ‘मीडास टच’ होता. असा हा हरहुन्नरी कलावंत आपल्याला अचानक सोडून जाईल, अशी कल्पनाही केली नव्हती. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची ताकद प्राप्त होवो, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -