
नितीन देसाई यांनी ऑडिओमध्ये केला चार बिझनेसमनचा उल्लेख
कर्जत : सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक (Art Director) नितीन देसाई यांच्या आत्महत्येमुळे (Nitin Desai Suicide) अख्ख्या मनोरंजनसृष्टीतून हळहळ व्यक्त होत आहे. त्यातच त्यांच्या आत्महत्येच्या कारणासंदर्भात एक महत्त्वाचा धागा हाती लागला आहे. आत्महत्या करण्याच्या आदल्या रात्री त्यांनी एक ऑडिओ क्लिप (Audio Clip) रेकॉर्ड केली होती. ज्यामध्ये त्यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करणार्या चार बिझनेसमनचा उल्लेख त्यांनी केला आहे.
काल रात्री १२ वाजता नितीन देसाई दिल्लीवरुन मुंबई विमानतळावर पोहोचले. तिथून गाडी घेऊन ते कर्जतच्या एन.डी स्टुडिओमध्ये रात्री २:३० वाजता पोहोचले. त्यानंतर तिथल्या एका मॅनेजरसोबत त्यांचं बोलणं झालं. यावेळी ते त्याच्याशी वॉइज रेकॉर्डरबद्दल बोलले. मी तुला सकाळी एक वॉइज रेकॉर्डर देईन, तो वॉइज रेकॉर्डर नंतर तू संबंधित व्यक्तीला दे, असं नितीन यांनी त्या मॅनेजरला सांगितलं.
त्यानंतर सकाळी मॅनेजरने नितीन देसाई यांचा एन.डी स्टुडिओमधील त्यांच्या रुममध्ये शोध घेतला. पण ते तिथे नव्हते. त्यानंतर तो मॅगा हॉलमध्ये गेला. मेगा हॉलमध्ये नितीन देसाई यांनी गळफास घेतल्याचे आढळले. तिथेच नितीन देसाई यांचा वॉइज रेकॉर्डर होता. त्या वॉइज रेकॉर्डरमध्ये काही वॉइज नोट्स आहेत. त्या वॉइज नोट्समध्ये जवळपास चार बिझनेसमनचा उल्लेख आहे. यामध्ये आर्थिक विवंचना केल्याचाही उल्लेख आहे.
एनडी स्टुडिओवर जप्ती
मिळालेल्या एका माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून त्यांच्या एनडी स्टुडिओवर जप्तीची टांगती तलवार होती. नितीन देसाई आणि त्यांच्या पत्नीने मुंबईतील एडलवाईस अॅसेट रिकन्स्ट्रक्शन या कंपनीकडून कर्ज घेतलं होतं. मात्र ठराविक मुदतीत त्याची परतफेड झाली नसल्याने कंपनीने त्यांची मालमत्ता जप्त करण्यासाठी कारवाई केली होती. या मालमत्ता जप्त करण्यासाठी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली होती. हे प्रकरण रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे दोन महिने प्रलंबित होते.
आवाजाची होणार तपासणी
वॉइज रेकॉर्डर हाती लागले असले तरी त्यातील आवाज हा नितीन देसाईंचाच आहे का, याविषयी तपासणी केली जाणार आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. नितीन यांच्या नातेवाईकांनी रेकॉर्डरमधील आवाज नितीन यांचाच असल्याचा दावा केल्यास एफ. आय. आर. ची (FIR) नोंद होऊन त्यासबंधी पुढील कारवाई केली जाऊ शकते.