Tuesday, April 22, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेMetro : मेट्रो मार्ग ५च्या ठाणे-भिवंडी दरम्यानचे काम प्रगतीपथावर!

Metro : मेट्रो मार्ग ५च्या ठाणे-भिवंडी दरम्यानचे काम प्रगतीपथावर!

एमएमआरडीएने मेट्रो मार्गिका ५च्या पहिल्या भागातील स्थानकांसाठी सर्व पूर्वनिर्मित घटकांची उभारणी केली पूर्ण

मुंबई : एमएमआरडीएच्या मेट्रो टीमने मेट्रो (Metro) मार्ग ५च्या ठाणे-भिवंडी दरम्यान प्रगतीपथावर असलेल्या मेट्रोच्या सर्व पूर्वनिर्मित घटकांची उभारणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. धामणकर नाका मेट्रो स्थानकावरील शेवटच्या प्लॅटफॉर्म स्तरावरील एल बीमच्या उभारणीसह या मार्गिकेच्या सर्व सहा स्थानकांसाठीच्या संपूर्ण घटकांच्या उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. सदर कामात एकूण १०९८ घटक उभारण्यात आले ज्यामध्ये स्पाइन, विंग्स, यू गर्डर्स, पिअर आर्म्स आणि एल बीम इत्यादी घटकांचा समावेश आहे. ही क्रिया पूर्ण करण्यासाठी टीमने ८० ते ५०० मॅट्रिक टन क्षमतेच्या क्रेनचा आणि पुलर हायड्रोलिक एक्सल ट्रेलरचा वापर केला. सध्यस्थितीत प्रकल्पातील स्थानकांसाठीचे ७३.३५ टक्के काम पूर्ण झाले आहे. तसेच या संरेखनातील मेट्रो ट्रॅक साठी उभारण्यात येणा-या ११.८८ किमी वायाडक्ट पैकी ९.८७ किलोमीटरच्या व्हायाडक्ट उभारणीचे काम आता पूर्ण झाले आहे. ज्यासाठी एकूण १२१८ पुर्वानिर्मित घटकांच्या उभारणीचे काम पूर्ण झाले असून, यामध्ये पिअर कॅप, यू गर्डर, आय गर्डर, बॉक्स गर्डर, पॅरापेट वॉल इ. चा समावेश आहे. यासोबतच ८०.५ टक्के मेट्रो ट्रॅक साठीचा व्हायाडक्ट आता पूर्ण झाला आहे.

अनेक आव्हानांवर मात करत पूर्ण केले काम, प्रकल्पग्रस्तांना निर्धारीत वेळेत दिली नुकसान भरपाई

सदर काम पूर्ण करण्यासाठी एमएमआरडीएला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला, ज्यासाठी नाविन्यपूर्ण उपाय आवश्यक आहेत. धामणकर नाका मेट्रो स्थानकाच्या एल बीम उभारणीसाठी वापरण्यात येणा-या क्रेनच्या सुरक्षित हालचालींसाठी समस्या येत होती, ज्यासाठी त्या भागातील पुनर्वसन अनिवार्य होते. या भागातील पुनर्वसन हे २ टप्प्यांत करण्यात आले. ज्यानुसार स्थानकाच्या उजव्या बाजूचे नंतर डाव्या बाजूचे अशी बांधकामे पाडून नागरिकांचे पुनर्वसन करून हे काम क्रिया यशस्वीपणे पार पाडले. या उपक्रमातून प्रकल्पग्रस्तांना एमयूटीपी धोरणानुसार निर्धारीत वेळेत भरपाई देण्यात आली. तसेच कशेळी, काल्हेर आणि अंजूरफाटा स्थानकांवर प्रीकास्ट घटकांच्या उभारणीसाठी खाजगी सीमा भिंती पाडल्या आणि काम पूर्ण झाल्यानंतर, सीमा भिंती पूर्ववत करण्यात आल्या. तसेच काही ठिकाणी उच्चदाब विद्युत वाहिनी लगतच्या उभारणीसाठी आणि विविध ठिकाणी अवजड वाहतुकीचा सामना करावा लागला. या आव्हानांवर मात करत प्रकल्पाची सुरळीत अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी काळजीपूर्वक नियोजन आणि समन्वय आवश्यक होते. या सर्व अडथळ्यांवर मात करत मेट्रो टीमने लक्ष्य साध्य करण्यासाठी त्यांची दृढनिश्चय दर्शविला.

मेट्रो मार्ग ५ हा मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा ठाणे-भिवंडी-कल्याण दरम्यान २४.९ किमीचा उन्नत मेट्रो मार्ग आहे. त्यापैकी एमएमआरडीएमार्फत ठाणे ते भिवंडी दरम्यान ११.८८ किमी लांबीचे बांधकाम करण्यात येत आहे. मेट्रो मार्ग ५ चा पहिला टप्पा ठाण्यातील कापूरबावडी येथून सुरू होऊन नैऋत्य ते ईशान्य दिशेकडे जाते आणि धामणकर नाका, भिवंडी येथे संपतो. बाळकुम नाका, कशेळी, काल्हेर, पूर्णा, अंजूरफाटा आणि धामणकर नाका ही मेट्रो मार्ग ५ च्या पहिल्या टप्प्यातील सहा स्थानके आहेत. मेट्रो मार्ग ५ चे संरेखन हे इतर मेट्रो मार्गिकांपेक्षा वैशिष्ट्यपूर्ण आहे कारण भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागात कशेळी ते अंजूरफाटा दरम्यान कशेळी खाडीच्या भागासह ५५० मीटरवर व्हायाडक्ट यामध्ये आहे.

“मुंबई मेट्रो मार्ग ५ च्या पहिल्या टप्प्यातील स्थानकांसाठीच्या पुर्वनिर्मित घटकांची उभारणी यशस्वीरित्या पूर्ण करून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. हा टप्पा मेट्रो मार्गिकेच्या पूर्णत्वासाठी महत्त्वाचा आहे. या नंतर आता फ्लोअरिंग, फॉल-सीलिंग, दर्शनी भाग यासारखी प्रमुख वास्तुशिल्प कामे तसेच स्थानकाच्या छताचे, पट-यांचे आणि सिस्टीमची कामे सुरू करण्यात येतील. या मार्गिकेचे आता ७८.८१ टक्के प्रगती पूर्ण झाली आहे. एमएमआरडीएची टीम सर्व प्रकल्प निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे.” असे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, भा.प्र.से. म्हणाले.

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -