
मुंबई : घाटकोपर बेस्ट डेपोतील (Ghatkopar BEST Depo) बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अचानक संप पुकारला आहे. पगारवाढ आणि बेस्टच्या सुविधा मिळत नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांनी अचानक पुकारलेल्या या संपामुळे नोकरदार मुंबईकरांचे (Mumbai News) मात्र हाल होत आहेत.
बेस्टच्या घाटकोपर डेपो मधील कंत्राटी चालक आज सकाळपासून अचानक संपावर गेले आहेत. पगारवाढ, सुविधा, ओव्हर टाईम अशा विविध मागण्यांबाबत हे कंत्राटी कर्मचारी मागणी करत होते. या मागण्यांसाठी प्रज्ञा खजुरकर या सहकुटुंब आझाद मैदानात उपोषणाला बसल्या आहेत. त्यांना समर्थन देण्यासाठी आणि आझाद मैदानात त्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी या बेस्टच्या कंत्राटी कामगारांनीही हा संप केला आहे. मात्र याचा फटका चाकरमान्यांना बसला आहे. सकाळी सकाळी कार्यालयात निघालेल्या मुंबईकरांचे बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अचानक पुकारलेल्या संपामुळे गैरसोय होत आहे.
दरम्यान, संप पुकारल्यानंतर आज हे सर्व कंत्राटी कर्मचारी आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या पगार वाढीची मागणी प्रलंबित आहे. त्यांना साधारणतः सध्या १६ हजार रुपये वेतन मिळत आहे. हे सर्व कर्मचारी त्यांचे हे वेतन २५ हजार रुपयांपर्यंत वाढवावे अशी मागणी करत आहेत. मात्र त्यांची ही मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही.
तसेच, पगारवाढीसोबतच इतरही सुविधा मिळाव्यात अशी मागणीही या कंत्राटी कर्मचाऱ्यांची होती, मात्र अद्याप ही मागणीही पूर्ण झालेली नाही. याच मागण्यांसाठी घाटकोपर डेपोमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन पुकारले आहे.