
यशोमती ठाकूर यांना सुरक्षा देणार असल्याची देवेंद्र फडणवीसांची माहिती
मुंबई : देशाच्या महानायकांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे जनतेच्या व राजकारण्यांच्या प्रचंड रोषाचा सामना करत असलेले शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्यावर २९ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र तरीही या प्रश्नासंदर्भात आज विधानसभेत (VidhanSabha) गदारोळ झाला. गेले काही दिवस भिडेंच्या वक्तव्यामुळे राज्यातील वातावरण तापत असल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यासंबंधी विधानसभेत बोलताना माहिती दिली.
देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरावती राजापेठ पोलीस ठाण्यात संभाजी भिडेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड विधान १५३ (अ), ५००, ५०५ (२), ३४ तसेच म.पो.का सह कलम १३५ अन्वय २९ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच माध्यमांमध्ये जे विविध व्हिडिओ फिरत आहेत त्यांचे व्हॉईस सॅम्पल घेऊन त्याची तपासणी करण्यात येईल. जितेंद्र आव्हाड यांनी जी तक्रार केली आहे ती अमरावती पोलिसांकडे पाठवली आहे. संभाजी भिडे हे हिंदुत्वासाठी काम करतात पण त्यांना महापुरुषांवर वादग्रस्त विधानं करण्याचा अधिकार नाही असंही यावेळी फडणवीस म्हणाले.
अमरावतीच्या आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांना देण्यात आलेल्या धमकीमुळे विधानसभेत त्या आक्रमक झाल्या होत्या. उद्या काही बरंवाईट झाल्यास त्याला जबाबदार कोण?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावर देवेंद्र फडणवीसांनी यशोमती यांना सुरक्षा दिली जाईल व धमकी देणार्या व्यक्तीला लवकरात लवकर अटक केली जाईल, असे स्पष्ट केले.