Thursday, July 10, 2025

भिवंडी निजामपूर महानगरपालिका क्षेत्रातील भुयारी गटार प्रकल्प डिसेंबरपर्यंत पूर्ण करणार

भिवंडी निजामपूर महानगरपालिका क्षेत्रातील भुयारी गटार प्रकल्प डिसेंबरपर्यंत पूर्ण करणार

मुंबई : भिवंडी निजामपूर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने व शहराच्या विकासाच्या दृष्टीने भुयारी गटार योजना राबविणे आवश्यक होते. यासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत भुयारी गटार (टप्पा-2) प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू असून हे काम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होईल, असे प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत सांगितले. सदस्य सुरेश धस यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती.


मंत्री श्री. सामंत म्हणाले की, मूळ योजनेची निविदा प्रक्रिया 2011 मध्ये सुरू करण्यात आली. तथापि भूसंपादनास विरोध झाल्याने प्रत्यक्ष योजना 2015 मध्ये सुरू झाली. सदर प्रकल्पावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून देखरेख होत असून कामाची गुणवत्ता नियमित तपासली जाते. तसेच आयआयटी मुंबई आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे या नामांकित संस्थांमार्फत त्रयस्थ तांत्रिक लेखापरीक्षण झालेले आहे. त्यांच्याकडून गुणवत्तापूर्ण काम झाले असल्याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच कंत्राटदारास देयकांची रक्कम प्रदान करण्यात आलेली असल्याचे मंत्री श्री.सामंत यांनी सांगितले. सद्यस्थितीत या योजनेचे 93 टक्के काम पूर्ण झालेले असून डिसेंबरपर्यंत उर्वरित काम पूर्ण होईल, असे ते म्हणाले. योजनेंतर्गत दुरूस्ती केलेल्या रस्त्यांवर अपघात वा जीवितहानी झाल्याची तक्रार महानगरपालिकेस प्राप्त नाही. तथापि ही माहिती चुकीची असल्यास त्याची चौकशी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री निरंजन डावखरे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांनी सहभाग घेतला.

Comments
Add Comment