नवी दिल्ली : दिल्ली सेवा विधेयक आणि अविश्वास प्रस्तावावर (No confiedence Motion) मोदी सरकारला (Modi government) आता बिजू जनता दलाचा (BJD) पाठिंबा मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीजेडी दिल्ली सेवा विधेयकावर संसदेत (Parliament) मोदी सरकारला पाठिंबा देणार आहे. पक्षाचे राज्यसभा सदस्य सस्मित पात्रा यांनी आज ही माहिती दिली. आम आदमी पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
बीजेडीनेही विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावाला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बीजेडी लोकसभा आणि राज्यसभेत दिल्ली सेवा विधेयकाच्या समर्थनार्थ मतदान करेल. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएकडे स्वबळावर पूर्ण बहुमत नसले तरी ओडिशाच्या सत्ताधारी पक्षाच्या निर्णयामुळे केंद्रातील मोदी सरकारला राज्यसभेत अर्ध्या क्रमांकाच्या जवळ जाण्यास मदत होईल. बीजेडीचे राज्यसभेत नऊ खासदार आहेत. त्यामुळे दिल्ली सेवा विधेयकाच्या बाजूने आता किमान १२८ मते निश्चित झाली आहेत. बीजेडीच्या पाठिंब्यानंतर राज्यसभेत दिल्ली सेवा विधेयक मंजूर झाल्याचे निश्चित झाले आहे.
विरोधी पक्षाकडून मांडण्यात आलेल्या अविश्वासाच्या प्रस्तावावर पुढील आठवड्यात संसदेत चर्चा होणार आहे. पुढील आठवड्यातील ८ ऑगस्ट रोजी प्रश्न उत्तराच्या सत्रानंतर चर्चा होणार आहे. तर ९ ऑगस्ट रोजी देखील या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. तर १० ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे संसदेत विरोधकांना (Opposition) उत्तर देणार आहेत. विरोधी पक्षाने मणिपूरच्या मुद्द्यावर अविश्वास प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी देखील मंजुरी दिली होती. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांच्या आरोपांवर भाष्य करुन त्यांना चोख उत्तर देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra