
पंतप्रधान राष्ट्रीय कोषातून केली जाणार मदत
ठाणे : ठाण्याजवळ शहापूर (shahapur) तालुक्यातील सरलांबे इथं समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Mahamarg) तिसऱ्या टप्प्याच्या कामावेळी मोठी दुर्घटना घडली आहे. पुलाचं काम सुरु असताना गर्डर मशीन (Girder Machine) कोसळल्याने आत्तापर्यंत १७ जणांचा मृत्यू, तर चार ते पाच जण जखमी झाले आहेत. आणखी सहा जण गर्डर मशीनच्या खाली अडकल्याची शक्यता आहे. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून मृतांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, या दुर्घटनेतील मृत व जखमी व्यक्तींना पंतप्रधान राष्ट्रीय कोषातून मदत जाहीर करण्यात आली आहे.
दुर्घटनेबद्दल कळताच राज्याचे रस्ते विकास सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी घटनास्थळी भेट दिली. गर्डर मशीनखाली दाबले गेलेल्या कामगारांना बाहेर काढण्यास प्रथम प्राधान्य देत आहोत. ही दुर्घटना कशी झाली याची चौकशी केली जाईल. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना मदत देखील केली जाईल असे दादा भुसे म्हणाले. त्यानुसार या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना २ लाखांची मदत दिली जाणार आहे. पंतप्रधान राष्ट्रीय कोषातून प्रत्येकी २ लाखांची मदत करण्याची घोषणा करण्यात आली आहे. तर जखमींना उपचारांसाठी ५० हजार रूपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गर्डर मशीनला जोडणारी क्रेन आणि स्लॅब तब्बल शंभर फूट उंचावरुन मजूरांच्या अंगावर कोसळली. यामध्ये १७ मजुरांचा मृत्यू झाला आहे. मृतदेह शाहपूर उप जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहेत. तीन ते चार जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांना लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे. त्याआधीच काही तास ही दुर्देवी घटना घडली आहे.