
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधानांचे तोंडभरुन केले कौतुक
पुणे : आज टिळक स्मारक प्रतिष्ठानच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना लोकमान्य टिळक पुरस्कार (Lokmanya Tilak Purskar) प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात शरद पवार (Sharad Pawar), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) एकाच मंचावर उपस्थित होते. यावेळी भाषणादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भरभरुन कौतुक केले.
लोकमान्य टिळक लोकांच्या मनातील भावना अचूक ओळखायचे आणि आजच्या काळात सामान्य जनतेचं मन ओळखणारे मोदीजी हे राष्ट्रीय स्तरावरील नेते ठरलेले आहेत. लोकमान्य टिळक हे बहुआयामी नेतृत्व असून आपल्या कर्तृत्वाने ते लोकमान्य झाले होते. आदरणीय मोदीजींनी देखील गेल्या नऊ वर्षांमध्ये आपल्या देशासाठी केलेल्या कामांना लोकमान्यता मिळालेली आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
लोकमान्य टिळक हे प्रखर देशभक्त आणि राष्ट्रभक्त होते. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांचे नाव अग्रस्थानी आहे. ब्रिटीशांविरुद्ध लढताना त्यांच्या शब्दांना कमालीची धार येत असे. अशा लोकमान्य टिळकांच्या नावाचा पुरस्कार आदरणीय नरेंद्र मोदी यांना, आपल्या लोकप्रिय प्रधानमंत्री यांना मिळणार आहे त्याबद्दल मी सगळ्यांच्या वतीने मोदीजींचे अभिनंदन करतो. जागतिक नेता म्हणून नाव कमावलेले मोदीजी यांची यंदा पुरस्कारासाठी टिळक प्रतिष्ठान स्मारक ट्रस्टने निवड केली याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.
सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास
टिळकांनी स्वराज्यासाठी लढा दिला पण स्वातंत्र्यानंतर स्वराज्याचे सुराज्यात रुपांतर करण्यात आपल्याला किती यश आलं आहे, हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. पंतप्रधान मोदी यांनी देशाची सूत्रं हातात घेतल्यानंतर हेच मुख्य ध्येय ठेवून 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास'चा नारा आणि हे सुराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्या दिशेनेच त्यांची वाटचाल सुरु आहे. म्हणूनच त्यांच्या कार्याची पोचपावती आज या राष्ट्रीय सन्मानाने होत आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
प्रगतीचा ध्यास घेतलेले मोदीजी
जगभरातील नेते पंतप्रधान मोदींचं कौतुक करतात. जगभरातील लोक मोदींकडे खंबीर नेतृत्व म्हणून पाहतात. मोदींनी देशवासियांना आत्मनिर्भरतेचा नारा दिला, त्यांनी महाराष्ट्राचाही विकास केला. प्रगतीचा ध्यास घेतलेले मोदीजी आज बुलंद भारताचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. या पुरस्कारामुळे त्यांना लोकमान्य टिळकांच्या आशीर्वादाचं बळ, ताकद, ऊर्जा प्राप्त होणार आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे कौतुक केले.