Monday, December 2, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखHUM: ‘हम’ चॅरिटेबल ट्रस्ट

HUM: ‘हम’ चॅरिटेबल ट्रस्ट

सेवाव्रती: शिबानी जोशी

गेल्याच आठवड्यात आपण २६ जुलैला कारगील विजय दिवस साजरा केला. डोंबिवलीतल्या हम(HUM) या संस्थेने देखील या दिवसाचे औचित्य साधून  ठाणे व डोंबिवली इथे दोन कार्यक्रम आखले. जम्मू-काश्मीरमधल्या परिस्थितीची माहिती देणारी व्याख्याने आयोजित केली गेली आणि त्यामुळे हम या संस्थेविषयी लिहायचे ठरवले.  जम्मू आणि काश्मीर खोऱ्यातून कलम ३७० हटविले, त्यालाही येत्या ६ ऑगस्टला ४ वर्षे पूर्णं होतील. या अभूतपूर्व सुधारणेनंतर जम्मू आणि काश्मीर खोऱ्यातली सद्यस्थिती नक्की कशी आहे? याची उत्सुकता प्रत्येक भारतीय नागरिकाला असणार. तसेच हमच्या कार्यकर्त्यांनी त्यामुळे नेमक्या याच कालावधीत हम चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेने रा. स्व. संघाच्या ‘सेवा भारती’ आणि ‘भारतीय शिक्षा समिती’च्या सहयोगाने जम्मूसह पूंछ आणि राजौरी या दहशतग्रस्त भागात शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रात नेटाने काम सुरू केले. याच ‘हम’च काम आज जाणून घेऊ या. शिक्षण आणि सांस्कृतिक आदान-प्रदान हे दोन सेतू काश्मीरला भारताशी सांधून ठेवतील असा दुर्दम्य आशावाद संस्थेला आहे, त्यातूनच त्यांनी कामाला सुरुवात केली. या कार्यामधली खडतर आव्हाने आहेत ती माहीत असतानाही  कोणतंही वेगळं, ठोस काम हाती घेण्यासाठी  काहीतरी निमित्त घडावे लागते. तसंच एक निमित्त डोंबिवलीतल्या काही कार्यकर्त्यांच्या आयुष्यात आले. २०१७-१८ मध्ये  डोंबिवली येथील कार्यकर्ते मनोज नशिराबादकर  सेवाभारती आणि भारतीय शिक्षा समितीचे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून जम्मू-काश्मीरला रवाना झाले. त्यांचे जम्मू-काश्मीरमधील काम पाहून आपणही काही करावं असे इथल्या कार्यकर्त्यांना वाटले; परंतु कायमस्वरूपी जम्मू-काश्मीरला जाणे शक्य नसल्यामुळे नशिराबादकर यांनीच त्यांना डोंबिवलीहून जमेल तेवढे पूरक काम करण्याचा सल्ला दिला. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य हिस्सा आहे. त्यांना उर्वरित भारताशी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिकदृष्ट्या आपल्याशी सांधणं गरजेचे आहे. त्यासाठी  पूरक कार्य  इथे उभारावे  या विचारातून हम चॅरिटेबल ट्रस्टच्या स्थापनेची कल्पना मांडली गेली आणि २०१८ पासून कार्यवाही सुरू झाली.

२०१९ साली हम म्हणजे Hands United for Mission(HUM)  असे सार्थ नाव या ट्रस्टला दिले गेले. सीमावर्ती भागातील मुलांचे शालेय शिक्षण अव्याहतपणे सुरू राहावे आणि ते दर्जेदार असावे यासाठी काम, तिथल्या नागरिकांना  मुख्य प्रवाहाशी जोडणे, सीमावर्ती भागात अस्थिरतेशी सामना करणाऱ्या भागात शैक्षणिक उपक्रम राबविणे, सांस्कृतिक देवाण-घेवाण ही उद्दिष्ट ठेवून संस्था स्थापन करण्यात आली.

तसे तर हम चॅरिटेबल ट्रस्टची औपचारिक नोंदणी होण्यापूर्वीच कार्यकर्त्यांनी अभिनव उपक्रम राबवायला सुरुवात केली होती. डोंबिवलीतील पाडवा शोभायात्रा खूपच लोकप्रिय आहे. गुढीपाडव्याला शोभायात्रा काढण्याची सुरुवात झाली आहे. या शोभायात्रेत पाडव्यासह सर्वच भारतीय सण, उत्सवांची झलक दाखवली जाते. या यात्रेत जम्मू-काश्मीरमधल्या विद्यार्थ्यांनी बोलावले तर त्यांना महाराष्ट्रातल्या संस्कृतीची माहिती होईल आणि आपल्याला जम्मू-काश्मीरच्या संस्कृतीची चुणूक  पाहायला मिळेल या उद्देशाने २०१९ सालच्या नववर्ष स्वागतयात्रेत सहभागी होण्यासाठी जम्मू इथल्या २४ विद्यार्थिंनीना त्यांच्या शिक्षकांसह बोलावण्यात आले होते. त्यांच्या  मुक्कामात गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला भागशाळा मैदान, डोंबिवली  इथल्या जाहीर कार्यक्रमात या मुलींनी त्यांची पारंपरिक नृत्ये सादर केली तसेच स्वागत यात्रेत हम ट्रस्टच्या चित्ररथासोबत उपस्थित राहून उत्साहाचा अनुभव घेतला होता. या मुक्कामातील दोन दिवस या मुली डोंबिवलीतील विविध कुटुंबात राहिल्या. त्यामुळे इथल्या चालीरिती त्या अनुभवू शकल्या होत्या. एक दिवस मुंबई दर्शनाचा आनंद या मुलींनी लुटला. त्यानंतर दरवर्षी अशा तऱ्हेने विद्यार्थ्यांना शोभायात्रेसाठी निमंत्रित करण्याचे संस्थेने ठरवले आहे.

हमच्या कार्यकत्यांनी जुलै २०१९ मध्ये टिळक नगर विद्यामंदिर, एमआयडीसीच्या प्रांगणात संघटन मंत्री प्रदीप जी आणि समिती, भा.शि.स.जम्मू आणि श्री भारत भूषण उपाध्यक्ष भा.शि.सं. जम्मू यांना खास निमंत्रित करून त्यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण केले होते. जम्मू-काश्मीरविषयक राज्यघटनेतील कलम ३७० मध्ये केंद्र सरकारने सकारात्मक बदल केला हे एक ऐतिहासिक पाऊल होते. त्याच्या स्वागतासाठी डोंबिवली येथे २०१९ ला आयोजित मिरवणुकीमध्ये पदाधिकारी, कार्यकर्ते सामील झाले होते. सावरकरांवरील आदर दर्शवता यावा तसेच सावरकर विचार पोहोचावेत यासाठी संस्थेच्या सदस्य नंदिनी पित्रे यांनी ‘मी सावरकर’ हा कार्यक्रम बसवला होता, तो डोंबिवलीतील सुप्रसिद्ध सर्वेश हॉल इथे सर्वांसाठी खुला सादर करण्यात आला. यावेळी संस्थेच्या कार्याची व्याप्ती पाहून अनेक डोंबिवलीकरांनी सढळ हस्ते आर्थिक सहकार्याचा हात पुढे केला. मार्च २०२० पासून कोविडच्या उद्रेकामुळे सर्व सार्वजनिक व्यवहार ठप्प झाले. अनेक निर्बंध आले; परंतु त्यातूनही मार्ग काढत  ‘हम’ने लोकसंपर्क वाढविण्याच्या उद्देशाने निबंध, चित्रकला, वक्तृत्व, देशभक्तीपर गीत गायन इ. स्पर्धांचे ‘ऑनलाइन’ आयोजन केले. ज्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. जम्मू-कश्मीर कल, आज और कल या विषयावर बोलण्यासाठी जम्मू-काश्मीर स्टडी सेंटरच्या माजी पदाधिकारी श्रीमती शक्ती मुन्शी यांचा जाहीर कार्यक्रम जानेवारी २०२१ आयोजित केला होता. कोविडमुळे  जम्मू-काश्मीरमध्ये तर परिस्थिती (शिक्षणविषयक) फारच गंभीर होती. विद्यार्थ्यांना ज्ञान मिळण्याचे सर्व मार्ग बंद झाले होते. या परिस्थितीवर उपाय म्हणून हमने खारीचा वाटा उचलण्याचे ठरविले.

डोंबिवली येथील ज्येष्ठ शिक्षिका गोगटे व  बेहरे बाई या द्वयींनी पुढाकार घेऊन  १०वीच्या विषयांच्या सर्व मार्गदर्शनाचे व्हीडिओ रेकॉर्डिंग तयार केले व तिथल्या शालात पाठवले. कोविडमुळे  २०२१ च्या स्वागत यात्रेसाठी तिथल्या विद्यार्थिनींना आणणे योग्य नाही असा विचार करून हमचे  पदाधिकारी जम्मू येथे रवाना झाले. तेथील शाळांमध्ये गुढीपूजनाचे कार्यक्रम करून मराठी संस्कृती आणि परंपरांची माहिती नागरिकांना व विद्यार्थ्यांना करून दिली. पदाधिकाऱ्यांनी बरोबर नेलेले लेझिमही तिथे सादर केले होते. कारगील विजय दिवस संस्थेतर्फे दरवर्षी साजरा केला जातो. त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या गेल्या सभेला अरुण करमरकर यांनी उपस्थितांना संबोधित केले होत.

भारतीय विद्यामंदिर हिरानगर, जम्मू या शाळेत  चांगल्या वाचनालयाची सुविधा उपलब्ध नव्हती. तिथे आर्थिक मदतीतून ‘पुस्तकालयाची उभारणी करून दिली. यासाठी लागणारे फर्निचर, संगणक व पुस्तकही पुरवली. या पुस्तकालयाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव दिले गेले आणि  रा. स्व. संघाच्या कार्यकारिणीचे सदस्य असलेल्या इंद्रेशजी यांच्या हस्ते सावरकर पुस्तकालयाचे उद्घाटन करण्यात आले.

जम्मू इथे पर्यटनवाढ झाली, तर इतरांना जम्मू- काश्मीरची आर्थिक घडी सुधारेल तसेच पर्यटकांना निसर्गाचा आनंद घेता येईल, आदान-प्रदान वाढेल या हेतून जम्मू पर्यटनयात्रा सुरू केली. यात्रा कंपनी दाखवत नाहीत असे काही प्रकल्प, पर्यटन स्थळे, विद्याभारती संचालित  शाळांना भेटी दिल्या जातात. स्त्री सक्षमीकरणासाठी दुर्गम भागात प्रवास करून तिथल्या महिला, विद्यार्थिनींना  प्रशिक्षण दिले जात. किश्तवार जिल्ह्यातील  पाडर मसू या अति दुर्गम भागाचा कार्यकर्त्यांनी जेव्हा दौरा केला  व शाळांची माहिती घेतली होती, तेव्हा मसू इथली शाळा अगदीच खराब झाली असल्याचे त्यांच्या नजरेस पडले. खरंतर ती शाळा म्हणजे एक वर्ग खोली आणि गच्ची होती. पाऊस पडला तर ते मुलं खालच्या खोलीतून अभ्यास करत त्यामुळे ही शाळा आपण बांधून द्यायची असं ठरवले. गावातल्या लोकांनीही जमेल तेवढं श्रमदान केले आणि महाराष्ट्रातील सुजाण आणि संवेदनशील नागरिकांनी दिलेल्या आर्थिक मदतीतून तिथे शाळा उभी राहिली. कार्यकर्ते त्या ठिकाणी गेले की गावातील नागरिकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू पाहायला मिळतात आणि ते पाहून आपण करत असलेले काम सतपात्री होत असल्याचे समाधान कार्यकर्त्यांना मिळते.

आणखी एक वेगळी गोष्ट  पुढे घडली ती म्हणजे सामंत पती-पत्नीच  सहकार्य.  आयआयटी मुंबईतून डॉक्टरेट केलेले डॉक्टर सामंत आणि नागपूर विद्यापीठातून एमएससी केलेल्या त्यांच्या सुविद्य पत्नी रूपाली सामंत यांनी  हमच्या कामामध्ये भाग घेण्याची तयारी दर्शविली. त्यासाठी मागील वर्षी ते दोघे प्रथम जम्मूला जाऊन काय काम करता येईल याची पाहणी करून आले. भारतीय शिक्षा समितीच्या दशमेश नगर, हिरानगर, नान्सू उधमपूर, अशा एकूण चार शाळांना त्यांनी भेटी दिल्या. त्यांच्या लक्षात आले की, तिथल्या सायन्स टिचर्सना ट्रेनिंग देणे महत्त्वाचे आहे. त्यानुसार दर आठवड्यात शाळांमधील शिक्षकांसाठी दोघेही अल्टरनेट ऑनलाइन ट्रेनिंग घेतात. इंटरनेटच्या उपलब्धतेनुसार यामध्ये  अडथळेही येतात. असे असले तरी खूप मेहनतीने हे वर्ग घेतले जातात. गेली ३० वर्षे ज्या जम्मू-काश्मीरमध्ये  ७ वाजल्यानंतर घराबाहेर पडणे शक्य नव्हते, पण आज आकाश दर्शन हा विषय जम्मूमधल्या भारतीय शिक्षा समितीमुळे तिथल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे. जम्मूमधल्या उधमपूर दडवारा आणि दशमेशनगर इथल्या तीन शाळांमध्ये रात्रभर जागून आकाशाचे खगोलशास्त्रीय दर्शनाचे कार्यक्रम पार पाडले. हमच्या उद्दिष्टांमध्ये सांस्कृतिक आदान-प्रदान  हे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. यासाठीच  हमने सुरू केला आहे एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प चलो जम्मू-कश्मीर. या अंतर्गत २३ एप्रिल  ते ०२ मे २०२२ दरम्यान पहिली व एक ते सहा मे दुसरी सहल पूर्ण झाली. ज्यामध्ये हमच्या जम्मूमधील प्रकल्पांना भेटी आणि निसर्गरम्य कश्मीरचा आनंद असा प्रवास पूर्ण झाला. दरवर्षी अशा चार ट्रिप्स नेण्याची संस्थेची योजना आहे. मोठा मुला-मुलींच्या शिक्षणाबाबत तर हम काम करतच आहे. पण छोट्या ज्युनियर केजीतील मुलांना शाळेत जाण्याची आवड निर्माण होण्यासाठी  हिरानगरच्या शाळेत छान छान खेळणी पाठवली आहेत. काश्मीर हा भारताचा अविभाज्य प्रांत आहे आणि त्या ठिकाणी आपण पोहोचलो पाहिजे ही भावना मनात आल्यावर ती प्रत्यक्षात उतरवणारे संस्थेचे अध्यक्ष सुनील देशपांडे आणि त्यांच्या साथीला सतीश लिमये, संगीता फाटक, नेहा जोशी, गौरी जोशी, नंदिनी पित्रे, रवींद्र वर्तक यांचे कार्यकारी मंडळ आणि या कामाचे गांभीर्य जाणणारे अनेक कार्यकर्ते डोंबिवलीत ‘हम साथ साथ है’ असं म्हणत एकच ब्रीद घेऊन काम करत आहेत ‘जोडो जम्मू-काश्मीर’.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -