अभयकुमार दांडगे: मराठवाडा वार्तापत्र
मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली व परभणी जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांत मुसळधार पाऊस पडला. या जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने जमिनी खरडून गेलेल्या आहेत. नांदेड जिल्ह्यात दोन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी व नाल्यांना पूर आला तसेच यामध्ये चौघांचा बळी देखील गेला. विशेष म्हणजे मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे विदर्भाशी दोन दिवस संपर्क तुटला होता. नांदेड जिल्ह्यात तीन दिवसांचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आला होता. त्यामध्ये किनवट, माहूर व देगलूर तालुक्यात अतिवृष्टीनंतर मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. छत्रपती संभाजी नगर तसेच जालना जिल्ह्यात मात्र अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे. याचबरोबर धाराशिव व लातूर जिल्ह्यातही शेतकरी समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. नांदेड, हिंगोली तसेच परभणी जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे शहरातील सर्वच रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. रस्ते जलमय झाल्यामुळे वाहतूक खोळंबली होती. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी, आसना तसेच पैनगंगा या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. नांदेड जिल्ह्यातील आदिवासी बांधव असलेल्या किनवट तालुक्यातील दुधगाव येथील अनेक घरे पाण्याखाली गेली होती. खबरदारीचा उपाय म्हणून या तालुक्यातील सुवर्ण धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले होते. तेथील पाणी तेलंगणातील आदिलाबाद जिल्ह्यात जाते. जिल्हा प्रशासनाला तेलंगणातील जिल्हाधिकाऱ्यांसोबत सतत संपर्क ठेवावा लागला. सिंगलवाडी, सूना गुंडा या किनवट तालुक्यातील दोन गावांचा संपर्क ४८ तास तुटला होता.
नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील मांडवा नदीला आलेल्या पुरात अशोक दोनीवार हा तरुण वाहून गेला. एनडीआरएफचे पथक त्याचा शोध घेण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत होते. तसेच मुदखेड तालुक्यातील राजुरा येथील प्रदीप साहेबराव बोयाळे हा पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेला.त्याचाही शोध अद्यापही घेण्यात येत आहे. पावसाने पुन्हा हाहाकार माजविल्याने बळीराजा पुन्हा एकदा संकटात पडला आहे. लातूर जिल्ह्यातही अशीच संततधार होती. दोन दिवस लातूर जिल्ह्यात सूर्यदर्शन झाले नाही. सततच्या पावसामुळे कोवळी पिके हातची निघून गेली. यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा भविष्याची चिंता भेडसावत आहे. लातूर जिल्ह्यात संततधार असल्याने सुरुवातीला खरीप पिकाला जीवदान मिळाले; परंतु अति पावसामुळे मूग, उडीद, सोयाबीन आदी पिके पिवळी पडली आहेत. बहुतांश शेतात अद्यापही पाणी साचलेले आहे. काही शेतांना डबक्याचे स्वरूप आले आहे.
मराठवाड्यात सुरू असलेल्या अति मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागातील लोकांचा कामानिमित्त शहराकडे येण्याचा ओघ मंदावला आहे. नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यात वन्नाळी या गावातील सत्तर कुटुंबांचे जिल्हा परिषदेच्या शाळेत स्थलांतर करावे लागले. उमरी – मुदखेड मार्गावर असलेल्या रेल्वेच्या पुलाखालून पाणी वाहू लागल्याने हा रस्ता चार दिवस बंद होता. २७ व २८ जुलै रोजी मराठवाड्यातील नांदेड व हिंगोली जिल्ह्यात अति मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून याबाबतचा निर्णय घेण्यात आला. इयत्ता दहावी तसेच बारावी बोर्डाच्या व शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा वेळापत्रकाप्रमाणेच घेण्यात आल्या. विशेष म्हणजे नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात असलेले मोहपूर हे गाव गेल्या बारा दिवसांपासून अंधारात आहे. अतिवृष्टीमुळे या गावचा वीजपुरवठा बंद असल्याने आश्रम शाळा तसेच संपूर्ण गावात अंधाराचे साम्राज्य पसरलेले आहे. वीज वितरण कंपनीचे अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देत नसल्याने मोहपूर येथील ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्या ठिकाणी शासकीय आश्रम शाळा आहे. ही शाळा निवासी असल्याने जवळपास ४०० विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेतात आणि या गावची लोकसंख्या देखील साडेतीन हजारांच्या वर असल्याने येथील ग्रामस्थ अनंत अडचणीला सामोरे जात आहेत. मराठवाड्यात ४५० मंडळ आहेत. त्या अंतर्गत सुमारे ८७०० गावांचे पर्जन्यमान मोजण्यात आले. त्यापैकी १९० मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. ३३१० गावांमध्ये समाधानकारक पाऊस झाला आहे. उर्वरित चार हजार गावांमध्ये कमी अधिक पाऊस झाल्याने तेथील खरीप पेरण्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २३२ मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. तर जालना जिल्ह्यात २३९ मिमी, बीड जिल्ह्यात २३७ मिमी, लातूर जिल्ह्यात तीनशे मिमी, धाराशिव जिल्ह्यात २६० मिमी, नांदेड जिल्ह्यात ४९० मिमी, परभणी जिल्ह्यात २८० मिमी, हिंगोली जिल्ह्यात ३७० मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पात सध्या समाधानकारक पाणीसाठा निर्माण झाला आहे.
जायकवाडी प्रकल्पात २८.७९, निम्न दुधना प्रकल्पात २७.८७, येलदरी प्रकल्पात ५९.४०, सिद्धेश्वर प्रकल्पात ३२.९४, माजलगाव प्रकल्पात १६.२८, मांजरा प्रकल्पात २४.४८, पेनगंगा प्रकल्पात ५९.४९, मानार प्रकल्पात ३८.८४, निम्न तेरणा प्रकल्पात २९.३६, विष्णुपुरी प्रकल्पात ५२.२० पाणीसाठा उपलब्ध आहे. हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर तालुक्यात ओढ्याला पूर आल्यामुळे दोन दुचाकीस्वार पाण्यात वाहून गेले; परंतु तेथील नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले. मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली व परभणी जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून प्रशासनाच्या वतीने पंचनामे करण्यात येत आहेत. नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे लाखो हेक्टर शेती क्षेत्राचे नुकसान झाले आहे. पिकासह जमिनी पूर्णपणे खरडून गेलेल्या आहेत. अतिवृष्टीमुळे अनेकांच्या घरांची पडझड होऊन गोरगरिबांचे संसार उघड्यावर आले आहेत. शेतकऱ्यांची जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. शासनाने कोणतेही निकष न लावता नुकसानग्रस्त शेती क्षेत्राचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी, अशी मागणी या भागातील शेतकरी वर्गातून होत आहे. जालना जिल्ह्यात पावसाची रिमझिम सुरू आहे, तर बीड जिल्ह्यातही थोडाफार पाऊस झाल्याने पिकांना दिलासा मिळालेला आहे. पुढील वर्षी लोकसभेची निवडणूक होणार असल्यामुळे सर्वच पक्षाचे नेते ग्रामीण भागात दौरे करून दिलासा देण्याचा आव आणत आहेत.