
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज सकाळी पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील एका कार्यक्रमात बोलताना केलेलं वक्तव्य चांगलंच चर्चेत आलं आहे. माजी आमदार स्व. बाबुराव पाचरणे यांच्या स्मारक उद्घाटनासाठी अजित पवार आले होते. त्यावेळी, बोलताना अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यामुळे महिन्याभरापूर्वीच त्यांनी केलेल्या बंडाची चर्चा सुरु झाली आहे. विरोधी पक्षाचा राजीनामा देत सरकारला पाठिंबा दिलेल्या अजित पवारांनी 'साहेब आणि मी काही वेगळे नाहीत' असं वक्तव्य केल्याने त्यांच्या बंडाविषयीच्या अनेक तर्क वितर्कांना उधाण आले आहे.
अजित पवार म्हणाले, मी आज इकडे येण्यासाठी सकाळी साडे पाच वाजताच निघालो होतो, लवकरच कार्यक्रम आटोपून पुढे जावं असं मनात होतं. तर, दादा तुम्ही सकाळी ७ वाजता कार्यक्रमाला जाता, पण तिथं लोकं कशी येतात? असं मला अनेकजण विचारतात. त्यावर, आपण लोकांना कशा सवयी लावतो, त्यावर ते अवलंबून असतं. आपल्याला पवारसाहेबांनी सकाळपासून कामाची सवय लावल्याचं अजित पवार यांनी म्हटलं. अजित पवार यांच्या बोलण्यातून काकांचा वारंवार उल्लेख होतो, हेच यातून स्पष्ट झाले आहे.
पुढे ते म्हणाले, बाबूरावांचं स्वप्न होतं की आपण आमदारकी लढवली पाहिजे. अगदी सुरुवातीच्या काळात, पोपटरावांनाही आठवत असेल की प्रचाराच्या वेळेस पोपटराव हे साहेबांचे उमेदवार आणि बाबूराव माझा उमेदवार असा प्रचार झाला. त्यावेळी म्हटलं, साहेब आणि मी काही वेगळे आहोत का?. आम्ही तेव्हाही वेगळे नव्हतो आणि आताही वेगळे नव्हतो, काळजी करू नका, असे अजित पवारांनी म्हटले. त्यावेळी, उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ झाल्याचं पाहायला मिळालं.
बंडाचा नेमका अर्थ काय?
अजित पवारांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादीतील फुटीवर चर्चा सुरू झाल्या आहेत. या बंडाला उद्या महिना पूर्ण होणार आहे. त्यातच हे वक्तव्य केल्यानंतर झालेल्या लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदानाच्या वेळी दादा आणि काका एकाच मंचावर दिसले. त्यामुळे महिन्याभरात झालेल्या अनेक राजकीय उलथापालथी पाहता अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील बंड नेमकं काय? हे कोडं अनुत्तरीतच राहिल्याचं बोललं जात आहे.