
गोळीबाराचे कारण ऐकून तुमचाही थरकाप उडेल...
पालघर : रेल्वेतील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नियुक्त करण्यात आलेला आरपीएफ जवानच (RPF constable) प्रवाशांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पहाटे पाच वाजताच्या सुमारास जयपूर एक्स्प्रेसमध्ये (Jaipur Express) एका आरपीएफ जवानाने प्रवाशांशी झालेल्या बाचाबाचीतून गोळीबार केला. चेतन सिंह (Chetan Sinha) असं आरोपी आरपीएफ कॉन्स्टेबलचं नाव आहे. या गोळीबारामध्ये तीन प्रवासी तर एका पोलिसाचा मृत्यू आणि काही प्रवासी जखमी झाल्याने खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळतात जीआरपी पोलीस (GRP Police) आणि आरपीएफ पोलीस (RPF Police) घटनास्थळावर दाखल होऊन अधिक तपास करत आहेत. गोळीबारानंतर पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतलं आहे. सध्या ही ट्रेन मुंबई सेंट्रल इथे दाखल झाली आहे. जीआरपीच्या जवानांनी गोळीबार करणाऱ्या आरपीएफ कॉन्स्टेबलला ताब्यात घेऊन बोरीवलीला आणलं आहे. तर चार जणांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. मानसिक तणावातून आरपीएफ कॉन्स्टेबलने गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
नेमकं काय घडलं ?
राजस्थान ते मुंबई सेंट्रल या जयपूर एक्स्प्रेसमध्ये आज पहाटे पाचच्या सुमारास वापीहून बोरीवली, मीरा रोड स्टेशनदरम्यान गोळीबाराची घटना घडली. जयपूर एक्स्प्रेस राजस्थानमधून महाराष्ट्रातील पालघरमध्ये (Palghar) दाखल होताच B-5 डब्यात अचानक गोळीबाराचा आवाज झाला. गोळीबाराच्या आवाजाने डब्यात बसलेल्या प्रवाशांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.
आरपीएफ हवालदार चेतन सिंहचा ट्रेनच्या डब्यातील काही प्रवाशांसोबत वाद झाला होता. यावेळी संतापलेल्या चेतन सिंहने प्रवाशांचे दिशेने बंदूक उगारली. त्याच्या सहकाऱ्याने त्याला थांबवण्याचा आणि शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु रागाच्या भरात चेतन सिंहने त्याना जुमानले नाही आणि सहकाऱ्यावरही गोळीबार केला. या गोळीबारात त्याच्या सहकाऱ्यासह चार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.