
विरोधकांचा पुन्हा गोंधळ
नवी दिल्ली : मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरून लोकसभा आणि राज्यसभेत गोंधळ झाला असून दोन्ही सदनांचे कामकाज उद्यापर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. मणिपूरच्या मुद्द्यावरून राज्यसभेत आज दुपारी २ वाजता चर्चा सुरू झाली. पण या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवेदन द्यावं अशी मागणी करत विरोधकांना गोंधळ घातला. त्यानंतर कामकाज उद्यापर्यंत स्थगित करण्याचा निर्णय राज्यसभेचे अध्यक्ष जगदीश धनकड यांनी घेतला.
आज राज्यसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधकांनी कामकाज नियम २६७ अन्वये मणिपूरच्या हिंसाचाराच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी केली. त्यानंतर राज्यसभा अध्यक्षांनी ही मागणी मान्य करुन दुपारी २ वाजता यावर चर्चेसाठी वेळ दिला. केंद्र सरकारच्या वतीने मंत्री पियूष गोयल या प्रकरणावर निवेदन देण्यास उभे राहिले आणि विरोधकांनी त्याला विरोध केला. मणिपूरच्या मुद्द्यावर निवेदन करण्यासाठी पंतप्रधान सदनात का उपस्थित राहत नाहीत असा सवाल करत विरोधकांनी गोंधळ घातला.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाल्यापासून म्हणजे २० जुलैपासून संसदेच्या दोन्ही सदनांचे काम व्यवस्थित चाललेले नाही. मणिपूरच्या मुद्द्यावरून विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवेदन करावे अशी मागणी केली आहे. त्यासाठी गेल्या आठवड्यात विरोधकांनी केंद्र सरकारवर अविश्वास ठराव आणला आहे. लोकसभा अध्यक्षांनी विरोधकांचा अविश्वास ठराव मंजूर करून पटलावर घेतला आहे. आता या अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी कधीचा वेळ देण्यात येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.