अमेरिकेतील मेजर लीग क्रिकेट टी २० स्पर्धेत ‘मुंबई इंडियन्स न्यूयॉर्क’(MI new york)ने विजेतेपद पटकावले. अमेरिकेतील ग्रांड प्रेयरी स्टेडियममध्ये झालेल्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्स न्यूयॉर्क संघाने सिएटल ओर्कासला ७ विकेट राखून धूळ चारली.
सिएटल ओर्कासने २० षटकांत ९ विकेट गमावून १८३ धावा केल्या. मुंबई इंडियन्स न्यूयॉर्कने १६ षटकांतच ३ विकेट गमावून विजयी लक्ष्य गाठले.मुंबई इंडियन्स न्यूयॉर्ककडून निकोलस पूरनने ५५ चेंडूंत १३७ धावांची शानदार कप्तानी खेळी खेळली. पूरनने मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात चौकार, षटकार लगावले. अंतिम सामन्यात खेळल्या गेलेल्या त्याच्या ऐतिहासिक खेळीत १० चौकार आणि १३ षटकार समाविष्ट होते. सिएटल ओर्कासकडून खेळताना क्विंटन डी कॉकने सर्वाधिक ८७ धावा जमवल्या. मुंबई इंडियंस न्यूयॉर्क कडून खेळताना गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि राशिद खान यांनी प्रत्येकी ३ विकेट मिळवल्या.
मुंबई इंडियन्स न्यूयॉर्कच्या विजयावर आनंद व्यक्त करताना नीता अंबानी म्हणाल्या की, येथील वातावरण क्रिकेटच्या सणासारखे वाटत आहे. ‘मेजर लीग क्रिकेट’ हे या भागात क्रिकेटच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहे. मुंबई इंडियन्स खासकरून संयुक्त अरब अमीरात पासून अमेरिका आणि दक्षिण आफ्रीकापर्यंत पोहचले आहे.