लाहोर : पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बाजौर जिल्ह्यातील खार तालुक्यातील एका राजकीय पक्षाच्या मेळाव्यात मोठा बॉम्बस्फोट (Bomb Blast) झाला. या स्फोटात ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २०० हून अधिक जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी मेळाव्याला लक्ष्य करून हा स्फोट घडवला. पोलीस आणि स्थानिक नागरिक बचावकार्यात गुंतले आहेत. तर जखमींना घटनास्थळावरून रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
पाकिस्तानी वृत्तपत्र द डॉनने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी जमियत उलेमा-ए-इस्लाम-फजल (JUI-F) च्या राजकीय पक्षाच्या मेळाव्यात हा स्फोट झाला. मात्र, आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
बाजौर जिल्हा आपत्कालीन अधिकारी साद खान यांनी पाकिस्तानी इंग्रजी दैनिक ‘डॉन’ला माहिती देताना मृतांची आणि जखमींच्या संख्येची पुष्टी केली आहे. ते म्हणाले की, खारमधील जेयूआय-एफचे प्रमुख नेते मौलाना झियाउल्लाह जान यांचाही स्फोटात मृत्यू झाला. अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, जखमींना पेशावर आणि टाइमरगेरा येथील रुग्णालयात हलवले जात आहे. जखमींमध्ये स्थानिक पत्रकाराचा समावेश आहे.
स्फोटानंतरचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. जखमी आणि मृतांचा आकडाही वाढू शकतो. पाकिस्तानी न्यूज चॅनल समा टीव्हीशी बोलताना, जेयूआयएफचे वरिष्ठ नेते हाफिज हमदुल्ला यांनी जखमींसाठी आपत्कालीन वैद्यकीय उपाययोजना सुनिश्चित करण्याची सरकारला विनंती केली.
त्याचवेळी एका वरिष्ठ स्थानिक अधिकाऱ्याने सांगितले की, हा स्फोट कसा झाला याबाबत काहीही सांगता येणार नाही. माहिती गोळा केली जात असल्याचे अधिकाऱ्याने माध्यमांना सांगितले. या स्फोटानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला असून पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली.
तर प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, स्फोट इतका जोरदार होता की सुमारे ३ किलोमीटरपर्यंत परिसर हादरला. दरम्यान, या स्फोटाची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.