
मुंबई : दक्षिण मुंबईतील भुलाभाई देसाई रोडवर दारुच्या नशेत असलेल्या SUV कारचालकाने एका व्यक्तीला उडवल्याची घटना घडली आहे. या घटनेत त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी गावदेवी पोलिसांनी २६ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली. रौनक समीर गणात्रा असं या आरोपी वाहनचालकाचं नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रौनक गणात्रा हा दारुच्या नशेत गाडी चालवत होता. त्या नशेतच त्याने दोन गाड्यांना धडक दिली, ज्यामुळे अंकुश कुमार या २२ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा जखमी झाला आहे. ही घटना दादर व्हिला बिल्डींगजवळ घडली. सध्या पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. गावदेवी पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम आणि मोटार वाहन अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.