Monday, May 12, 2025

ताज्या घडामोडीनाशिक

नागीण सापडेना; नागरिकांना झोप काही लागेना

नागीण सापडेना; नागरिकांना झोप काही लागेना

सर्पमित्राचे प्रयत्न मात्र सुरू!


नाशिक : सिडकोमधील केवल पार्क येथे नागिणीची पिल्ले आढळून आली असून सर्पमित्राने ती पकडली देखील आहेत. परंतु नागीण मात्र काही केल्या सापडत नसल्यामुळे येथील नागरिकांचा जीव अक्षरशः टांगणीला लागला आहे. मात्र नागिणीची शोध मोहीम अद्यापही सर्पमित्र घेताना दिसत असले तरी नागरिकांची झोप मात्र उडाली आहे. असेच काहीसे विदारक व भीतीदायक चित्र येथे बघायला मिळत असून नागिणीचा शोध लागत नाही तोपर्यंत नागरिक मात्र काही केल्या सुटकेचा निःश्वास सोडायला तयार नाहीत.


साप म्हटल्यावर आपल्या अंगावर काटा येतो. आणि तेच साप जर घरात सापडले तर त्याहून अधिक भीती असते. डीजीपी नगर २ येथील केवल पार्क भागात एका घरात नागाच्या कोब्रा जातीची विषारी ५ पिल्ले आढळली. सर्पमित्राने ती शिताफीने पकडल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला.


डीजीपी नगर २ मधील अष्टविनायक नगर, केवल पार्क येथे गजानन ताथे यांच्या रो हाऊसमध्ये सापाची पिल्ले असल्याचे सर्पमित्र तुषार गोसावी यांना नागरिकांनी कळविले होते. ते तत्काळ त्या घरी पोहचले. त्यांनी मोठ्या शिताफिने ही पिल्ले पकडली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.



अशी केली मोहीम फत्ते


सर्पमित्र गोसावी यांनी घराची पाहणी केली असता चेंबर जवळ डग मध्ये नागीण दिसली. मात्र तिच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी घुसीने केलेल्या बिळाच्या मार्गाने ती पसार झाली. नागीण शोधत असताना टॉयलेटच्या जाळीच्या मार्गाने किचनमध्ये शिरलेली तिची काही पिल्ले आढळली. नंतर दुसऱ्या दिवशी बेडरूममध्ये मिळालेली काही असे मिळून एकूण पाच पिल्ले शिताफीने पकडण्यात आली. कोब्रा जातीच्या विषारी नागाची ही पिल्ले आहेत. नागीण एकावेळी दहा ते बारा पिल्ले देते. त्यामुळे आणखी काही पिल्ले आहेत का? याचा शोध घ्यावा लागेल. अंडी देऊन नागीण तेथून निघून गेली असली तरी ती एक ते दीड महिने पिल्लांची रखवाली करीत असते.



नागरिकांनी खबरदारी घ्यावी


"पावसाळ्यात बिळात पाणी गेल्याने साप बाहेर येतात. तसेच ते भक्षाच्याही शोधात असतात. घरातही स्वच्छता असावी. साप घरात येऊ नये यासाठी उपाय योजना करावी. पुरेशी खबरदारी घ्यावी." - तुषार गोसावी, सर्पमित्र


नागरिकांनी परिसरात स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. उष्टे, खरकटं टाकणं टाळावं. त्याचप्रमाणे घुशी जर बिळ करत असतील तर ते ताबडतोब बंद केले पाहिजे. तसेच साप दिसल्यास तात्काळ सर्पमित्रांना फोन करून मदत घ्यावी.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment