
दर्यावर स्वार होण्यासाठी मच्छिमार सज्ज!
मालवण : देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरील राज्यात लागू असलेला दोन महिन्यांचा पावसाळी मासेमारी बंदी कालावधी आज सोमवार ३१ जुलै रोजी संपत आहे. मंगळवार १ ऑगस्ट पासून नव्या मासेमारी हंगामाची सुरुवात होत आहे. याच पार्श्वभूमीवर किनाऱ्यांवर मच्छीमारांची लगबग सुरू असून, मच्छिमार नव्या उत्साहात दर्यावर स्वार होण्यासाठी सज्ज झाला आहे.
समुद्री वातावरण, वारे आणि पाऊस यांचा अंदाज घेऊन नारळी पौर्णिमा उत्सवाला दर्याला श्रीफळ अर्पण केल्यानंतरच अनेक मच्छिमार मासेमारीला सुरवात करतात अशीही प्रथा आहे. मात्र शासकीय नियमानुसार १ ऑगस्ट पासून मासेमारी हंगामास सुरवात होणार आहे.
पारंपरिक मच्छीमार बांधव व संघटनांनी शासनाकडे किनारपट्टीवर एकाचवेळी मासेमारी बंदी असावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार देशाच्या संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर एकाचवेळी १ जून ते ३१ जुलै असा ६१ दिवसांचा सुधारीत बंदी कालावधी मागील काही वर्षांपूर्वी निश्चित करण्यात आला.
मुंबई, अलिबाग, डहाणू, वसई, उरण, नाव्हा शेवा, हर्णे, जयगड, रत्नागिरी, मालवण, वेंगुर्ले यांसारख्य राज्याच्या किनारपट्टीवरील लहान मोठ्या सुमारे ५० बंदरात मासेमारीची प्रत्यक्ष उलाढाल असते.
राज्यात लाखाहून अधिक कुटुंब मासेमारीवर अप्रत्यक्ष अवलंबून आहेत. शिवाय परराज्यातून देखील मोठ्या प्रमाणात खलाशी या ठिकाणी दाखल होत असतात.
केवळ महाराष्ट्रातून वर्षाकाठी चार ते पाच लाख हजार मॅट्रिक टन इतकी मासेमारी होत असते. परराज्यातील अनधिकृत पर्ससीन, एलईडी व हायस्पीड ट्रॉलर्सच्या मासेमारी विरोधातील नव्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी झाली, तरच अशा विध्वंसक मासेमारीला आळा बसणार आहे. स्वतंत्र अंमलबजावणी कक्ष स्थापन होऊन पुरेसा कर्मचारी, अधिकारी व अद्ययावत गस्तीनौका मिळाव्यात अशी आमची मागणी आहे, असे पारंपरिक मच्छीमार यांनी सांगितले.
"मासेमारीतील ज्या गोष्टी शासन नियमानुसार बेकायदेशीर ठरविल्या गेल्या आहेत. त्या रोखणे हे सरकारी यंत्रणेचे कर्तव्य आहे. राज्यातील सुमारे दोन लाख पारंपरिक मच्छीमारांना जगवायचे असेल, तर शासनाने पारंपरिक मच्छीमारांच्या म्हणण्यानुसार एलईडी व अनधिकृत पर्ससीन मासेमारी रोखण्यासाठी कठोर पावले उचलावीत, असे पारंपरिक मच्छीमार यांनी सांगितले आहे.