श्रावण महिन्याची सुरुवात म्हणजे बाहेर बऱ्यापैकी पावसाला वेग आलेला असतो. हिरवाई दिसायला लागते. उत्साह, चैतन्य असे काहीसे वातावरण असते. अशा पार्श्वभूमीवर कोणी लौकिकप्राप्त कलाकार आपले संपूर्ण आयुष्य, जीवनप्रवास, कला साधना उलगडून सांगणार असेल, तर ते आपल्याला हवे असते. ‘प्रहार’ने हेच निमित्त घेऊन प्रत्येक सोमवारचे ‘श्रावणसरी’ हे पान वाचकांसाठी बहाल केलेले आहे. तिसऱ्या पुष्पात अभिनेत्री, नृत्यांगना आदिती सारंगधर हिच्याशी संवाद साधला आहे.
अनेक दिवस पावसाचा मुक्काम असल्याने हवेत बराच गारवा होता…धुंद, मंद संधिप्रकाशाची वेळ, सारेच तिच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत होते… ती आल्याची खबर आली आणि चलबिचल सुरू झाली. व्हाईट अँड व्हाईट… सफेद जीन्स, पांढरा इन केलेला… बाह्या दुमडलेला शर्ट आणि बेल्ट, फुलटू फटाक… संपादकांनी तिचं स्वागत केलं… त्याचवेळी तिने साऱ्यांकडे एक नजर फेकली… काहींनी झेलली… काही घायाळ… अशा भारलेल्या वातावरणात प्रश्नोत्तराचा नव्हे तर चक्क गप्पांचा फड रंगला… पण त्यातही तीच धाड धाड बोलत होती, उत्तरं देत होती… गमती जमती सांगत होती…बालपणीच्या, घरातल्या, रुईया कॉलेजातल्या, एकांकिका स्पर्धा व तिने काम केलेली प्रथितयश दिग्दर्शक निशिकांत कामत याने लिहिलेली, दिग्दर्शित केलेली आणि आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेली ‘मंजुळा’ ही एकांकिका.
तिच्यासाठी हे यश मोठेच, पण मुंबई विद्यापीठाने त्यासाठी एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी म्हणून दिलेले १२ मार्क आणि त्यामुळे पदवी परीक्षेत मिळालेत्या सेकंड क्लासचा झालेला फर्स्ट क्लास, याचा तिला भारी आनंद वाटला. घरात सारेच हुशार, म्हणजे आजोबांपासून वडील डॉक्टर, काका व्हीजेटीआय गोल्ड मेडलिस्ट, बहीण पर्यावरण संशोधक, आई आधी कामा हॉस्पिटलमध्ये परिचारिका व डॉक्टर बाबांबरोबर झालेलं लफडं? (हा तिचाच शब्द बरं का) व नंतर आई परीक्षा देऊन बँक ऑफिसर झाली हे सांगताना तिच्या डोळ्यांत दिसले ते आईबाबतचे कौतुक… असा तिच्या घरात प्रत्येकजण किमान मास्टर्स झालेला आणि (कुठलाही आव न आणता) मी घरात सर्वात ‘ढ’, हे सांगताना तिच्यात एक कमालीचा आत्मविश्वासही दिसला (जो अनेकांमध्ये, हुशार असले तरी नसतो). खरं म्हणाल तर अनेकांच्या आयुष्यात एक टर्निंग पॉइंट असतो. पण आदितीच्या जीवनात अनेक टर्निंग पॉइंट आल्याचे ती सांगते. प्रत्येक नवी गोष्ट ही तिच्यासाठी टर्निंग पॉइंटच होती असे तिने आवर्जून सांगितले. (इथेही तिचे वेगळेपण दिसले). तिच्या आईला वाटले हिने एखादी कला शिकायला हवी म्हणून ती कथ्थक शिकत होती. शामक डावरकडे नृत्याचे धडे तिने गिरविले…
सायकॉलॉजी हा तिचा आवडता विषय. त्यात चाईल्ड सायकॉलॉजिबाबत खास आकर्षण. म्हणून ती मामाच्या क्लिनिकमध्ये बसून असायची. मात्र तिच्याकडे नानाविध प्रश्न घेऊन येणाऱ्यांना आजही ती सहजपणे सल्ले देते. आपण ‘जॅक ऑफ ऑल बट मास्टर ऑफ नन’ आहोत हेही ती कोणतेही आढेवेढे न घेता सांगते आणि आपल्या ‘ढ’ पणाची ती सहजपणे अशी कबुली देते. एकांकिका, नाटक, चित्रपट आणि गाजलेल्या व प्रचंड गाजलेल्या अशा मालिका आणि त्यामुळे मिळालेली प्रसिद्धी, प्रेक्षकांचं भरभरून मिळालेलं प्रेम याबद्दल ती ऋतज्ञता व्यक्त करते. आपल्याला आता लोक ओळखतात पण स्वाक्षरी (ऑटोग्राफ) घ्यायला कोणी येत नसल्याची खंत वाटत असतानाच सोलापूरला एका नाट्यगृहाबाहेर दिलेली पहिली स्वाक्षरी आणि तो आनंदी क्षण तिला आजही आठवतो… आपलं प्रेम, लिव्ह इन रिलेशनशिपबाबतही ती बोलली. काहीतरी बिनसतंय असे वाटताच पार्टनरसोबत थोडा गॅप (दुरावा) घेऊन नंतर त्या दोघांनाही एकमेकांविषयी आस्था, प्रेम वाटू लागताच केलेलं लग्न. हे सर्व करताना बाळगायची सावधता, विश्वास, कमिटमेन्ट अशा साऱ्या गोष्टी तिने सहजपणे बिनधास्त, बेधडक आणि कशाचीही तमा न बाळगता कथन केल्या.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिने आईपणाची सांगितलेली व्याख्या, जी आजपर्यंत तरी कधी ऐकलेली नव्हती. एखादी बाई बाळंतीण झाल्यावर लोक भेटायला येतात तेव्हा आधी बाळाची चौकशी करतात, मात्र नऊ महिने मोठ्या कष्टाने त्या बाळाला पोटात वाढविणाऱ्या आईबद्दल कोणी विचारात नाही, ही बाब तिला फारच खटकते. म्हणून विचारपूस करायला येणाऱ्याने प्रथम आईची तब्येत विचारायला हवी आणि ही बाब ‘प्रहार’च्या सर्व वाचकांपर्यंत तुम्ही पोहोचवा, असे तिने आवर्जून बजावले. बाळाला वाढविताना आईने जास्तीत जास्त वेळ हा त्याला द्यायलाच हवा. कारण तुम्ही आता त्याच्यावर आभाळमाया बारसवलीत तर बाळ कधीच अंतर देणार नाही. पण त्याचे नको ते लाड करू नयेत असेही ती सांगते. तिनेही मुलगा मोठा होईपर्यंत त्याचे स्वतःच संगोपन केले. हे करताना कित्येक दिवस आपण झोपलो नव्हतो असे तिने सांगितले. तिच्या या बोलण्यातून आईपण भारी देवा… असेच वाटावे. एकूणच आदिती वादळासारखी आली, बरस बरस बरसली… आणि साऱ्यांनाच आपलंसं करून श्रावणसरींमध्ये चिंब भिजवून गेली…
ती तशी डॅशिंग, बिनधास्त दिसत असली तरी तिच्या स्वभावात आपलेपणा, केअरिंग वृत्ती नि बोलण्यात मोकळेपणा आहे. अशा ऐतिहासिक कल्याणचा वारसा जपलेल्या आदिती सारंगधरला ‘प्रहार’च्या कार्यालयात प्रत्यक्ष पाहिले तेव्हा ती कुणी मोठी अभिनेत्री आहे, असे जाणवलेच नाही. मूळ स्वभावातच बिनधास्तपणा असेल, तर अशी तारांकित व्यक्ती आणि पत्रकार, चाहते ही दरी क्षणभरात लुप्त होते. दैनिक ‘प्रहार’च्या श्रावणसरी या कार्यक्रमािनमित्त मराठीतील लाखो चाहत्यांना आपल्या अभिनयाची भुरळ घालणाऱ्या ‘आदिती सारंगधर’ या यंग ॲण्ड डॅशिंग, तसेच रिअल लाइफमध्ये तितक्याच केअरिंग नि समंजस मराठमोळ्या अभिनेत्रीच्या भेटीने प्रहारच्या संपादकीय विभागाला याचा प्रत्यय आला. पहिल्याच भेटीत ती सर्वांशी आय कॉन्टॅक्ट ठेवत आपलेपणा जपत होती. तिच्या मोकळ्या गप्पांतून हा आपलेपणा अधिक दृढ होत गेला आणि मग तिच्या स्वभावातले कंगोरे, एक एक पदर उलगडत गेले. तिची आवड-निवड, दृष्टिकोन यातून ती व्यक्त होत गेली.
मी मोकळ्या वातावरणात वाढलेली मुलगी आहे. माझ्या घरातले वेल एज्युकेटेड असल्याने फॉरवर्ड नेचरचे आहेत. त्यामुळे अफेअर वगैरे या गोष्टींबाबत घरच्यांना कधीच हरकत नव्हती. पैशांची कमतरता तिला कधीच भासली नाही. जे प्रोजेक्ट करावेसे वाटले, ते तिने केले आणि जे नाही करावेसे वाटले त्याला नकार दिला. बरे, हे सर्व सांगताना तिच्यातला मिश्कील स्वभाव वेळोवेळी उद्धृत होत होता. एका चौकटीत, चार भिंतींच्या आत घुटमळत राहणाऱ्यांपैकी आदिती नव्हती. तिला जे पटते, करावेसे वाटते, ते ते तिने केले. ती स्वतःचे अफेयर, लिव्ह इनबद्दल एवढेच नाही, तर आई-बाबांचे एकमेकांशी असलेल्या लग्नाआधीच्या प्रेमाबद्दलही बोलली. पण म्हणून ती वाहवत जाणाऱ्यांपैकी नाही. कुठे थांबावे, मुळात काय करावे आणि काय करू नये हे कळण्याइतका समंजसपणा तिच्या वागण्या-बोलण्यातून वारंवार डोकावत होता. वादळवाटमधल्या रमासारखी संवेदना तिच्या खऱ्या-खुऱ्या स्वभावात आहे.
आपल्या मुलाला ती “खूप वेळ देते”. कामामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घेते. त्याने अमूक एक करावे, अमूक एक करू नये एवढी सक्ती तिने कधीच केली नाही. उलट त्याने प्रत्येक गोष्ट करून पाहावी, मग त्याला त्यामागचे कारण कळेल, अशी विचारांची प्रगल्भता तिच्यात आहे. नुसतीच काळजी करत बसणे हा तिचा स्थायीभाव नाही. ती एक मॉडर्न ‘आई’ आहे. कुटुंब आणि अभिनय यांची सांगड कशी घालावी हे तिला अचूक माहीत. त्यामुळेच तिने अभिनयातील आपली सारी ‘लक्ष्य’ बरोब्बर सर केली. पेहराव, दिसण्यातून ती जरी ‘दामिनी’ भासत असली तरी तो निव्वळ फार्स. त्या दिसण्याआड तिच्यात आपलेपणा, पारदर्शकपणा ठासून भरला आहे.तिच्या मुलाला मागच्या वर्षीपर्यंत माहीत नव्हते की, ती ॲक्टर आहे. “आई तू काम काम करायला लाग ना मला तुला टीव्हीवर बघायचंय” ही कॉम्प्लिमेंट मुलाकडून येणं ही तिच्यासाठी कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठी गोष्ट असल्याचे ती जेव्हा सांगते, तेव्हा ती अभिनेत्री कमी आणि आई किती झालीय हे दिसून येते.
तिच्याच ‘वादळवाट’ मालिकेच्या शीर्षक गीतातील ओळींप्रमाणे ती भासत होती. तिच्या डोळ्यांत टिपूर चांदणे दिसत होते. थोडी सागर निळाई दिसत होती. विशेष म्हणजे बिनधास्त ‘वादळवाट’आडचा समंजस चेहरा आहे तो.
'शिट्टी वाजली रे' ला टक्कर द्यायला आला नवीन शो मुंबई: सध्या मराठी वाहिन्यांवर नवनवीन मालिका…
मुंबई: अनेकांना आपलं आरोग्य कसं आहे, आणि आपण किती वर्ष जगणार हे जाणून घेण्यासाठी अनेकजण…
सध्या आयपीएलचा सीझन रंगात आला आहे. संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून क्रिकेटप्रेमी टीव्ही किंवा मोबाईलसमोर ठाण मांडून…
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरसन यांचे मत मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI)…
मुंबई : शिक्षकांसाठी ड्रेसकोड ठरवण्याचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाकडून पुन्हा एकदा विचाराधीन आहे. प्रत्येक जिल्ह्याला…
काही दिवसांपूर्वी २६/११ चा मुंबई दहशतवादी हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणा याचं भारतात प्रत्यार्पण झालं. त्यानंतर…