विशेष: राजश्री बोहरा, डोंबिवली
ज्या देशात सीतेलाही अग्निपरीक्षा देऊनसुद्धा स्वतःचे पावित्र्य सिद्ध करण्यासाठी धरतीत स्वतःला जिवंत गाडून घ्यावे लागले, त्याच निष्ठुर समाजात राहणाऱ्या आपण या समाजद्वेषापासून दूर कशा काय राहणार???
आज थेट मी विषयालाच सुरुवात केली. अलंकारिक शब्दांची मांडणी करून विषयाचे गांभीर्य शब्द सौंदर्याकडे घेऊन जायचे नाही मला. एकीकडे स्त्री शक्तीचे गोडवे गात जगणारा हा समाज आज एकविसाव्या शतकातही कोडगा कसा काय? हेच मुळात कोडं आहे. म्हणण्यापुरते स्त्रीदाक्षिण्य वगैरे, मुळात गाभा किडकाच आहे अद्याप. कितीही नारे लावा, कितीही समाज प्रबोधन करा, असूर वृत्ती आजही जैसे थे…
आजची स्त्री स्वतंत्र आहे, सुशिक्षित आहे, कर्तृत्ववान आहे, प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे, असा कितीही ढोल बडवला तरी फक्त बोलाची कढी आणि बोलाचा भात हे मात्र खरे. एवढ्या करोडोंच्या लोकसंख्येतील कितीशा महिला आहेत त्यात? अगदी बोटावर मोजण्याइतक्याच. मग ज्या सामान्य आणि किरकोळ आयुष्य जगणाऱ्या महिला आहेत त्या फक्त समाजात गर्दी करण्यापुरत्याच आहेत का? खूपच मोठी विषण्णता आहे ही. दिवसागणिक पुरुष प्रवृत्तीतील निर्घृणता वाढतच चालली आहे. रोज नवा उत्पात. रोज नवनवीन युक्त्या स्त्रीला झुकवण्यासाठी, हरवण्यासाठी. पुरुषाची बुद्धी जणू खुंटलीच गेली आहे. अर्थात सगळेच पुरुष यात येत नाहीत, पण केवळ बघ्याची भूमिका घेऊन समाजात वावरणारे हे पांढरपेशी पुरुष या वृत्तीला विरोधही करत नाहीत, हे चुकतंय.
विविध समाजमाध्यमांतून स्त्रियांवरील पांचट विनोद वाचणारे, लिहिणारे आणि फिदीफिदी त्यावर हसणारे कसला असुरी आनंद घेतात कोण जाणे. जिथे तिथे आपल्या पत्नीला, आईला बहिणीला कमीपणा दाखवून आपलीच अक्कल गाजवणारा एक तरी पुरुष आहेच की अवती भोवती…
स्त्री आता प्रत्येक क्षेत्रात पोहोचली आहे. घर, कार्यक्षेत्र, नातेसंबंध साऱ्याच जबाबदाऱ्या पुरुषाच्या सोबतीने किंबहुना एक पाऊल पुढे टाकून सांभाळत आहे. पण त्या प्रत्येक क्षेत्रात कार्य करणाऱ्या जवळपास प्रत्येक स्त्रीला किती मानसिक तणावातून, हेळसांडीतून जावे लागते हे दिसत नाही का सोबतच्या प्रत्येक पुरुषाला? नक्कीच दिसते पण त्यातून तिला सहकार्य करणारे कमी आणि खिजवणारेच जास्त आहेत. विकृत मनोवृत्ती बळावली आहे. हापापलेल्या नजरा फक्त भक्षण करायला तडफडत असतात. मग देतात तिला त्रास आणि नाहीच आली आपल्या जाळ्यात, तर सहज धजावतात तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायला. कधी काय तर, लव्ह जिहादमधून स्त्रीची हत्या, कधी शिक्षिकेची हत्या, कधी रस्त्यावर मृतदेह, कधी खून, कधी बलात्कार, रोज नवनवीन भयानक बातम्या…
अरे काय सैतानाची औलाद जन्म घेऊ लागली का आपल्या समाजात? शिवाजी महाराजांचे स्वराज्य गेलं कुठे? महाराणा प्रताप, पृथ्वीराज चव्हाण, गुरू गोविंद सिंग, यांच्या कार्यकर्तृत्वाने घडलेला हा देश हरवला कुठे? मणिपूरमध्ये घडलेल्या या अत्याचाराने संपूर्ण देश बिथरला आहे.
अरे! बंद करा ही अमानुष वागणूक. मनापासून द्या स्त्रीला सन्मान. जिच्या उदरातूनच जन्म घेतला. जिच्या हृदयातून अमृत प्यायलात तिच्याकडे कृतज्ञतेने पाहा. स्त्रीवरील पांचट, मिश्किल विनोद पाठवणाऱ्या मित्रांना समज द्या, आई-बहिणीवरून शिव्या घालणाऱ्याची जीभ कापून टाका. गलिच्छ नजरेने पाहणाऱ्या पुरुषाला जागेवरच अंध करा, अतिप्रसंग करणाऱ्याला जागेवर ठेचून मारा… वासनेने स्पर्श करणाऱ्याचे हात छाटून टाका.
हे वाचणारे तथाकथित सभ्य पुरुष नक्कीच चिडतील आणि पुन्हा मलाच प्रतिउत्तर देऊ लागतील. पण लक्षात घ्या, हे समाजबदलाचे आवाहन मी तुम्हालाच केले आहे. टोपलीत एखादे फळ नासले, तर ते बाजूला काढावे लागते. नाही तर सर्व फळांना ते नासवते. म्हणूनच भावांनो, तुम्ही एकत्र या आणि सहकार्य करा, ही समाजातील घाण काढून टाकायला.
स्त्री आजही झटते आहे, तुमच्यासोबत जगणे सुखाचे आणि संरक्षणाचे होण्यासाठी. स्वतःचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करत आहे. स्वतःला कठोर बनवत आहे. तुम्ही तिच्यावर हसण्यापेक्षा तिला साथ द्या पुढे येण्यासाठी. खूप काही नाही पण किमान आपल्या घरात, कुटुंबात, ऑफिसमध्ये आपल्या अवतीभोवती असणारी प्रत्येक स्त्री आपल्यामुळे दुखावली जाणार नाही, याची काळजी घ्या. सुसंवाद ठेवा, विचारपूस करा. सांत्वन करा आणि महत्त्वाचे म्हणजे आदर करा. एवढ्याने खूप मोठा बदल घडू लागेल. अनेकांनी सुरुवात केली सुद्धा. आता तुमची वेळ आहे. बदला थोडे. तुम्ही बदललात, तरच तुमच्याभोवतीचा समाज बदलेल आणि त्या बदललेल्या समाजात तुमच्याच मुली, आया, बहिणी आनंदाने आपले जीवन जगू शकतील.